भारतीय क्रिकेटपटू विराट कोहली आज जगभरात प्रसिध्द झालाय. जगातील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक म्हणून आज त्याची ओळख आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद 10,000 धावा पूर्ण करणारा खेळाडू म्हणून तो ओळखला जातो. एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके काढण्याचा विक्रम देखील त्याच्या नावावर आहे.
T20I क्रिकेटमध्ये भारतासाठी सर्वाधिक धावा करणारा खेळाडू देखील विराटच आहे. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक द्विशतक ठोकणारा भारतीय क्रिकेटपटू देखील विराटच आहे. 2017 आणि 2018 मध्ये ICC चा ‘क्रिकेटर ऑफ द इयर’ हा पुरस्कार देखील त्याला मिळाला आहे. खरे तर विराट कोहलीच्या या काही निवडक कामगिरी आहेत.त्याच्या पुरस्कारांची, कामांची लिस्ट करणे खरे तर अवघड असे काम आहे. सध्याच्या काळात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याने आपला दबदबा कायम ठेवला आहे.
त्याच्या या यशाबद्दल नेहमीच चर्चा होत असते, परंतु विराट कोहली हा आयपीएलमध्ये सर्वाधिक कमाई करणाऱ्यांपैकी एक खेळाडू आहे यात खरे तर आश्चर्य वाटण्यासारखे काहीच नाही. या लेखात विराट कोहलीचा पगार, संपत्ती, जीवनशैली आणि त्याचं घर, याबद्दल जाणून घेऊयात.
एक प्रमुख भारतीय क्रिकेटपटू म्हणून ओळखला जाणाऱ्या विराट कोहलीचे उत्पन्नाचे अनेक स्त्रोत आहेत. त्याच्या उत्पन्नाची काही स्त्रोत खालीलप्रमाणे:
ब्रांड एंडोर्समेंट: विराट हा भारतातील सर्वात महागडा खेळाडू आहे. तो Adidas, Audi, PepsiCo आणि इतर अनेक ब्रँड्सच्या जाहिराती करतो आणि त्यासाठी मोठ्या प्रमाणात मानधन देखील आकारतो. जाहिराती हा त्याच्या उत्पन्नाचा महत्त्वपूर्ण स्त्रोत आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. मिडिया रिपोर्टनुसार विराट कोहली एका इंस्टाग्राम पोस्टसाठी 8.9 कोटी रुपये घेतो.
BCCI सोबत करार: भारतीय क्रिकेटपटू म्हणून कोहलीसोबत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) करार केला आहे. त्याला सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमध्ये त्याच्या ग्रेडनुसार पगार मिळतो. सध्या, कोहली A+ श्रेणीमध्ये आहे. मिडिया रिपोर्टनुसार BCCI त्याला वर्षाला 7 करोड रुपये मानधन देते. तसेच एका टेस्ट मॅचसाठी त्याला 15 लाख रुपये मानधन दिले जाते.
IPL: विराट कोहली इंडियन प्रीमियर लीग (IPL) मधील रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) संघाचा कर्णधार आहे. एक खेळाडू म्हणून तो संघातून पगार घेतो आणि कर्णधार म्हणून त्याला अतिरिक्त बोनसही मिळतो.
2008 मध्ये RCB ने विराट कोहलीला 19 वर्षांखालील खेळाडूंच्या गटातून अवघ्या 12 लाख रुपयांमध्ये साइन केले होते. विराट कोहलीने भारताला U19 विश्वचषक ट्रॉफी जिंकून दिली आहे. त्याचा पगार पुढील तीन सिजनमध्ये तेवढाच, म्हणजे 12 लाख रुपये इतका राहिला. मात्र, 2011 मध्ये त्याचे वेतन 8.2 कोटी रुपये इतके करण्यात आले होते. 2012, 2013 आणि 2014 च्या इंडियन प्रीमियर लीग सीजन पर्यंत तो 8.2 कोटी रुपये इतके मानधन घेत होता.पुढे 2013 मध्ये तो RCBचा कर्णधार बनला.
पुढे 2015 ते 2017 च्या IPL सिजनमध्ये त्याने 12.5 कोटी रुपये इतके मानधन घेतले. विराट कोहलीची दमदार कामगिरी बघता 2018 मध्ये आरसीबीने त्याला 18 कोटी रुपये मानधन दिले. 2021 पर्यंत तो एवढेच मानधन घेत होता. अहवालानुसार, 2022 मध्ये, आरसीबीने त्याला 15 कोटी रुपये मानधन दिले आणि सध्या 2023 च्या आयपीएल सिजनमध्ये देखील तो तेवढीच कमाई करतो आहे.
आयपीएलच्या आजवरच्या सीझनमध्ये खेळून विराटने किती संपत्ती जमा केली याचा हिशोब केला तर तब्बल 173 कोटी 20 लाख रुपये त्याने कमावले आहे असे दिसून येते.
गुंतवणूक: कोहलीने विविध व्यवसाय उपक्रम जसे की Wrogn या कपडे व्यवसायात आणि Stepathlon नावाच्या एका आरोग्य आणि फिटनेस कंपनी मध्ये गुंतवणूक केली आहे.
बक्षीस रक्कम: कोहलीने त्याच्या संपूर्ण कारकिर्दीत अनेक पुरस्कार जिंकले आहेत, ज्यात सामनावीर, मालिकावीर आणि इतर कामगिरीसाठी त्याला बक्षीस स्वरूपात रक्कम मिळालेली आहे.ही रक्कम देखील कोट्यावधींच्या घरात आहे.
एकूणच, विराट कोहलीचे उत्पन्नाचे स्रोत वैविध्यपूर्ण आहेत, ज्याचा एक महत्त्वाचा भाग समर्थन आणि त्याच्या BCCI सोबतच्या केंद्रीय करारातून येतो.
विराट कोहलीची संपत्ती
स्पोर्ट्सकीडाच्या रिपोर्टनुसार $112 दशलक्ष (अंदाजे रु. 927 कोटी) संपत्तीसह विराट कोहली 2022 मध्ये जगातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत 61 व्या क्रमांकावर होता. विराट कोहली आणि त्याच्या पत्नीने, अनुष्का शर्माने अलीकडेच अलिबागमध्ये 19 कोटींचा एक भव्य व्हिला खरेदी केला आहे.त्यांच्या मालकीचे मुंबईत 35 कोटी किमतीचे एक अलिशान घर देखील आहे. तसेच गुरूग्राममध्ये देखील त्याचे एक घर असून, तयची किंमत 80 कोटी इतकी आहे.