Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Vedanta's struggle : स्वस्त लॅपटॉप, मोबाइलचं स्वप्न भंगणार? 'वेदांता'चा ड्रीम प्रोजेक्ट अडचणीत

Vedanta's struggle : स्वस्त लॅपटॉप, मोबाइलचं स्वप्न भंगणार? 'वेदांता'चा ड्रीम प्रोजेक्ट अडचणीत

Vedanta's struggle : स्वस्तात मिळणाऱ्या लॅपटॉप, टीव्ही तसंच मोबाइल घेण्याचं स्वप्न भंगणार, अशीच चिन्ह दिसत आहेत. कारण अब्जाधीश असलेले उद्योगपती आणि वेदांता ग्रुपचे प्रमुख अनिल अग्रवाल यांचा ड्रीम प्रोजेक्ट सध्या मोठा संघर्ष करत आहे. महाराष्ट्रातून हा प्रकल्प गुजरातमध्ये हलवल्यानंतर या प्रकल्पाला अधिकच समस्यांना तोंड द्यावं लागत आहे.

वेदांता ग्रुपचे मालक अनिल अग्रवाल यांनी गुजरातमध्ये 19 अब्ज डॉलरचा चिपमेकिंग प्लांट (chipmaking plant) उभारलाय. मात्र हा प्रकल्प आर्थिक कारणावरून झगडतोय. आर्थिक प्रोत्साहन (Financial incentives) मिळवण्यासाठी हा प्रकल्प धडपडत असल्याचं वृत्त ब्लूमबर्गनं दिलंय. फॅब्रिकेशन युनिट ऑपरेटर किंवा लायसन्स मॅन्युफॅक्चरिंग-ग्रेड तंत्रज्ञानाशी अद्याप वेदांतानं करार केलेला नाही. यापैकी एकाला आर्थिक सहाय्य आवश्यक आहे. एक मजबूत तंत्रज्ञान भागीदार आम्ही शोधलाय, अशी माहिती वेदांतान ब्लूमबर्गला दिलीय. चिप किंवा सेमीकंडक्टरच्या बाबतीत भारताला स्वयंपूर्ण बनवण्याचा हा प्रकल्प असून यामुळे देशात स्वस्तात लॅपटॉप, टीव्ही आणि मोबाइल मिळणं खरं तर अपेक्षित होतं. मात्र सध्या याबाबत अनिश्चित वातावरण तयार झालंय.

19 अब्ज डॉलर गुंतवणुकीचा देशातला पहिला प्रकल्प

साधारणपणे 1 लाख रुपयांना मिळणारा लॅपटॉप 40,000 रुपयांना मिळू शकणार होता. 10 वर्षांपूर्वी अब्जाधीश उद्योगपती अनिल अग्रवाल यांनी हे स्वप्न प्रत्यक्षात आणायचं ठरवलं होतं. आज ते प्रत्यक्षात उतरण्यासाठीचे प्रयत्नही सुरू झाले होते, मात्र आता या प्रकल्पावर संकटांचे ढग दाटून आलेत. वेदांता ग्रुपची उपकंपनी वेदांता रिसोर्सेस लिमिटेडनं तैवानच्या हॉन हाय प्रिसिजन इंडस्ट्री कंपनीच्या (फॉक्सकॉन) सहकार्यानं भारतात सेमीकंडक्टर प्लांट उभारण्याची घोषणा केली होती. सुमारे 19 अब्ज डॉलर गुंतवणुकीचा हा देशातला पहिला सेमीकंडक्टर प्लांट गुजरातमध्ये उभारला जाणार आहे.

टेक्नॉलॉजी पार्टनरपासून फंडिंगपर्यंत अडचणींचा सामना

अनिल अग्रवाल यांच्या या ड्रीम प्रोजेक्टसाठी कंपनीला आता टेक्नॉलॉजी पार्टनरपासून फंडिंगपर्यंत अडचणींचा सामना करावा लागतोय. सरकारकडून अपेक्षित असलेल्या आर्थिक मदतीबाबतही अद्याप परिस्थिती स्पष्ट झालेली नाही. 7 महिन्यांपूर्वी वेदांत रिसोर्सेसनं होन हाई यांच्या भागीदारीत सेमीकंडक्टर प्लांट उभारण्याची घोषणा केली होती. परंतु यासाठी तयार केलेला उपक्रम अद्याप फॅब्रिकेशन युनिट ऑपरेटर किंवा परवानाधारक उत्पादन श्रेणी तंत्रज्ञान भागीदाराशी टाय-अप केलेला नाही.

तज्ज्ञांसह प्रचंड पैशांची गरज

सेमीकंडक्टर प्लांट उभारणं ही एक क्लिष्ट प्रक्रिया आहे. हे काम सोपं नाही. गुंतागुंतीच्या या क्षेत्रात कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक केली जाते. अशाप्रकारचे प्रकल्प चालवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर तज्ज्ञ लोकांचीदेखील आवश्यकता आहे. मात्र या दोन्ही गोष्टी सध्या कंपनीकडे नाहीत.

दोन्ही कंपन्यांकडून मोठी गुंतवणूक

वेदांता ग्रुप सध्या खाण क्षेत्रात काम करत आहे, तर फॉक्सकॉन आयफोन असेंबलिंगच्या कामाची जबाबदारी सांभाळत आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत सेमीकंडक्टर बनवण्याचं कौशल्य दोघांकडेदेखील नसल्याचं दिसतंय. मात्र तरीदेखील दोन्ही गट मोठ्या गुंतवणुकीसह भारतातल्या संधीचा फायदा घेऊन देशातला पहिला सेमीकंडक्टर प्रकल्प उभारण्याचा प्रयत्न करत आहेत.

बनवायचीय भारताची स्वत:ची सिलिकॉन व्हॅली

भारतात सुरू होणाऱ्या या प्रकल्पाच्या माध्यमातून लॅपटॉप, टीव्ही आणि मोबाइलच्या किंमती कमीच नाही तर जवळपास अर्ध्यावर येतील. हा प्रकल्प सुरू झाल्यास एक लाख रुपयांचा लॅपटॉप केवळ 40,000 हजार रुपयांना मिळणार आहे. आमची कंपनी यावर मागच्या 10 वर्षांपासून काम करत आहे. आम्हाला भारताची स्वत:ची सिलिकॉन व्हॅली बनवायची आहे. त्यासाठी हे पाऊल टाकल्याचं अनिल अग्रवाल यांनी संयुक्त उपक्रमाची घोषणा करतेवेळी दिलेल्या मुलाखतीत सांगितलं होतं.