प्रवाशांना उत्तम प्रवास अनुभव घडवण्यासाठी भारतीय रेल्वेनं वंदे भारत एक्स्प्रेस (Vande Bharat Express) सेवा सुरू केली. या माध्यमातून प्रवाशांना अत्याधुनिक सुविधांसह (Advanced facilities) जलद प्रवासाचा अनुभव घेता येतो. टप्प्याटप्प्यानं या रेल्वेचा विस्तार आता होतोय. मिळालेल्या माहितीनुसार ऑगस्ट 2023पर्यंत जवळपास 120 अॅडव्हान्स्ड अशा वंदे भारत एक्स्प्रेस गाड्यांचं उत्पादन होणार आहे. नव्या सेमी-हाय स्पीड ट्रेन (Semi high speed train) तयार करण्याचे प्रयत्न सध्या सुरू करण्यात आले आहेत. लातूरमध्ये कोच कारखाना सुरू करण्यासाठी तसंच याठिकाणी लवकरात लवकर काम सुरू व्हावं, या दृष्टीकोनातून केंद्र सरकारनं 600 कोटी रुपये मंजूर केलेत.
Table of contents [Show]
120 प्रगत गाड्यांसाठी निविदा प्रक्रिया
प्राथमिक स्तरावर 120 प्रगत अशा नव्या गाड्यांसाठी निविदा प्रक्रिया सुरू असून ती अंतिम टप्प्यात आलीय. लवकरच या कराराला अंतिम स्वरूप दिलं जाणार आहे. रशिया आणि इंडियन रेल विकास निगम लिमिटेडच्या (RVNL) कंसोर्टियमबरोबर करार प्रक्रिया सुरू आहे. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी कारखान्याची पाहणी केली. त्यासोबतच रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत कामाच्या प्रगतीचा आढावादेखील घेतला.
तीन कारखान्यांतून उत्पादन
सरकारनं देशात 400 नव्या निळ्या आणि पांढर्या रंगाच्या गाड्या सुरू करण्याचं नियोजन केलंय. त्या अनुषंगानं नॅशनल ट्रान्सपोर्टरनं उत्पादन सुरू केलंय. आर्थिक वर्ष 2023-24मध्ये तीन कारखान्यांमधून या नव्या अल्ट्रा मॉडर्न ट्रेन तयार करण्यात येणार आहेत. चेन्नईतली इंटिग्रल कोच फॅक्टरी (ICF), रायबरेलीतली मॉडर्न कोच फॅक्टरी आणि लातूरमधली रेल कोच फॅक्टरी या ठिकाणी हे उत्पादन होणार आहे. आर्थिक वर्ष 2023-24मध्ये रेल्वेनं एकूण 67 ट्रेन किंवा 1,072 डबे तयार करण्याचं नियोजन केलंय.
संसदीय स्थायी समितीत चर्चा
वंदे भारत एक्स्प्रेसच्या उत्पादनासंबंधी रेल्वेवरच्या संसदीय स्थायी समितीनं चिंता व्यक्त केली होती. रेल्वे प्रवाशांचा विचार करता गाड्यांचं उत्पादन वेगात होणं गरजेचं असल्याचा सूर उमटला होता. मागच्या काही महिन्यांपासून वंदे भारत एक्स्प्रेसनं वेग पकडला आहे. आता गाड्यांचं किंवा कोचचं उत्पादन वाढणार आहे. अत्याधुनिक अशा सोयीसुविधा प्रवाशांना यामाध्यमातून मिळतात. भारतीय रेल्वेद्वारे चालवली जाणारी ही एक इलेक्ट्रिक मल्टी-युनिट ट्रेन आहे. वेगवान अशी वंदे भारतची ओळख आहे. या ट्रेनची चाचणी घेतली गेली त्यावेळी तिचा कमाल वेग183 किमी प्रतितास (114 mph) नोंदवला गेला होता. अर्थात यात रेल्वे ट्रॅकत्या वेगाची क्षमता, रहदारीच्या मर्यादा यामुळे सर्वच मार्गांवर हा वेग लागू होत नाही. तो 110पर्यंत खालीदेखील येतो.
सध्याचं वंदे भारत एक्स्प्रेसचं जाळं
देशभर सध्या विविध मार्गांवर वंदे भारत एक्स्प्रेस धावत आहे. एकूण 14 मार्ग आहेत. नवी दिल्ली-वाराणसी, नवी दिल्ली-श्री वैष्णो देवी माता कटरा, गांधीनगर राजधानी-अहमदाबाद-मुंबई सेंट्रल, अंब अंदौरा-नवी दिल्ली, म्हैसूर-पुराची तलैवर डॉ. एमजीआर चेन्नई सेंट्रल, नागपूर-बिलासपूर, हावडा-नवी जलपायगुडी, सिकंदराबाद-विशाखापट्टणम, मुंबई-साईनगर शिर्डी, मुंबई-सोलापूर, हजरत निजामुद्दीन-राणी कमलापती, सिकंदराबाद-तिरुपती, चेन्नई-कोइम्बतूर आणि अजमेर-दिल्ली कॅंट वंदे भारत एक्स्प्रेस ट्रेन.