छोट्या पेमेंटसाठी सहजपणे वापरल्या जाणाऱ्या युनिफाईड पेमेंट इंटरफेसवरुन डिसेंबर महिन्यात 782 कोटी व्यवहारांची नोंद झाली. यातून तब्बल 12.8 लाख कोटींची उलाढाल झाली असून एका महिन्यात इतक्या प्रचंड उलाढालीने आजवरचा रेकॉर्ड मोडला.
नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या आकडेवारीनुसार (NPCI)डिसेंबर महिन्यात 782 कोटी व्यवहारांची नोंद झाली. यातून तब्बल 12.8 लाख कोटींची उलाढाल झाली. नोव्हेंबर 2022 च्या तुलनेत यूपीआय व्यवहारांच्या संख्येत डिसेंबरमध्ये 7% वाढ झाली. यातील एकूण उलाढालीची रक्कम 8% ने वाढली आहे. वार्षिक आधारावर विचार केला तर डिसेंबर 2021 च्या तुलनेत यंदा डिसेंबरमध्ये यूपीआय व्यवहारांमध्ये 71% आणि उलाढालीमध्ये 55% वाढ झाली. थर्टीफस्टच्या दिवशी काही थर्डपार्टी प्लॅटफॉर्म्सवर यूपीआय डाऊन झाले होते. त्यामुळे अनेक ग्राहकांना व्यवहार पूर्ण करता आले नाहीत.
यापूर्वी ऑक्टोबर 2022 मध्ये यूपीआय व्यवहारांनी 700 कोटींचा टप्पा ओलांडला होता. ऑक्टोबर महिन्यात नवरात्री, दसरा, दिवाळी या उत्सवांचा हंगाम होता. या काळात ग्राहकांची प्रचंड खरेदी केले. यामध्ये बड्या ई-कॉमर्स कंपन्यांनी फेस्टिव्हल सेल आयोजित केले होते. ऑक्टोबर महिन्यात यूपीआयने 700 कोटी व्यवहार झाले. ज्यातून तब्बल 12 लाख कोटींची उलाढाल नोंदवण्यात आली होती.
एनपीसीआयने दर महिन्याला 100 कोटी यूपीआय व्यवहारांचे लक्ष्य ठेवले आहे. यूपीआयच्या वापर वाढावा आणि ही यंत्रणा लोकाभिमुख करण्यासाठी एनपीसीआयकडून प्रयत्न केले जात आहे. पुढील तीन ते पाच वर्षात हे उद्दिष्ट पूर्ण करण्याचा एनपीसीआयचा प्रयत्न आहे.
वर्षभरात यूपीआय व्यवहारांत दुपटीने वाढ
अर्थव्यवस्था कॅशलेसच्या दिशेने आगेकूच करत असल्याचे यूपीआयच्या ताज्या आकडेवारीने अधोरेखीत केले आहे. वर्ष 2022 मध्ये यूपीआयमधून 7404 कोटी व्यवहार रजिस्टर्ड झाले. यात 125 लाख कोटींची उलाढाल झाली. कोरोना टाळेबंदीच्या काळात ऑनलाईन खरेदी करणाऱ्या बहुतांश ग्राहकांनी यूपीआयच्या माध्यमातून आर्थिक व्यवहार केले होते. वर्ष 2021 मध्ये यूपीआयमधून 380 कोटी व्यवहार झाले होते. यातून 71.54 लाख कोटींची उलाढाल झाली होती. 2016 मध्ये यूपीआयने सेवा सुरु केली होती. ऑक्टोबर 2019 मध्ये पहिल्यांदाच यूपीआयच्या व्यवहारांनी 100 कोटींचा टप्पा ओलांडला होता. त्यानंतर वर्षभरात हे प्रमाण दुपटीने वाढले . ऑक्टोबर 2020 पासून देशात दर महिन्याला सरासरी 200 कोटी व्यवहार होऊ लागले.