Table of contents [Show]
स्पॅम फिल्टरचा वापर
भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (Telecom Regulatory Authority of India) या स्पॅम कॉल्सच्या नियंत्रणावर मागील काही काळापासून काम करीत होतं. सर्वसामान्यांच्या तक्रारीही मोठ्या प्रमाणात वाढत होत्या. त्यावर ट्रायनं कठोर भूमिका घेतलीय. टेलिकॉम कंपन्यांना यासंबंधीत आदेश देण्यात आलेत. टीव्ही नाइननं यासंबंधीचं वृत्त दिलंय. कंपन्यांनी आर्टिफिशिअल इंटेलिजन्ससह (Artificial intelligence) स्पॅम फिल्टर्स बसवावेत, असं ट्रायनं सुचवलं आहे. अर्थात यासाठी वेळही देण्यात आलीय. 1 मेपर्यंत आर्टिफिशिअल इंटेलिजन्ससह स्पॅम फिल्टर्स (Spam filters) बसवणं गरजेचं आहे. अनावश्यक कॉल्सचा लोकांना त्रास होता कामा नये, हा यामागचा हेतू आहे.
नेटवर्कवरच ब्लॉक होणार स्पॅम कॉल
आर्टिफिशिअल इंटेलिजन्सच्या या पद्धतीनं स्पॅम कॉल हे नेटवर्कवरच ब्लॉक (Block) केले जाऊ शकतात. त्यामुळे अशा कॉल्सच्या माध्यमातून लोकांना त्रास देणाऱ्यांना चाप बसणार आहे. ट्रायनं यासंबंधी नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. यानुसार, आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच कृत्रिम बुद्धीमत्तेनं सुसज्ज स्पॅम फिल्टर नेटवर्कवरच कॉल्स थांबवणार आहेत. त्यामुळे हे कॉल सर्वसामान्यांच्या फोनपर्यंत पोहोचणारच नाहीत. आजच जग हे अत्यंत वेगवान झालं आहे. प्रत्येकजण हा कोणत्या ना कोणत्या कामात असतो. त्याच्याकडे अनावश्यक बाबींसाठी वेळ नसतो. अशा कामाच्या वेळी स्पॅम कॉल्स वेळ वाया घालवतात. कधी मीटिंग, रुग्णालय किंवा कधी ट्रॅफिकमध्ये अडकलो असताना असे कॉल्स आले, तर ते रिसीव्ह करता येत नाहीत. मात्र ते त्रासदायक ठरतात. अशावेळी स्पॅम फिल्टर सेवा हे कॉल्स ब्लॉक करण्याचं काम करणार आहे. हे कॉल्स येण्याच्या आधीच डिसकनेक्ट होतील.
बँका, इतर सेवा देणाऱ्या संस्थांना स्वतंत्र क्रमांकाची सिरीज
1 मेपासून ही सेवा सुरू करण्यास ट्रायनं कंपन्यांना सांगितलंय. यासाठी टेलिकॉम कंपन्यांना एक कॉमन प्लॅटफॉर्म वापरावा लागणार आहे. आज घडीला देशात विविध टेलिकॉम कंपन्या आहेत. या सर्व कंपन्या सर्व नेटवर्कवरचे अनावश्यक किंवा स्पॅम कॉल्स ब्लॉक करण्यात मदत करेल. 1 मेपर्यंतच ही मुदत असणार आहे. सार्वजनिक सेवा देणाऱ्या संस्था यात बँका त्याचप्रमाणे आधार किंवा इतर अत्यावश्यक सेवा देणाऱ्यांना मेसेज किंवा कॉल्ससाठी स्वतंत्र सिरीजचे क्रमांक दिले जाणार आहेत. म्हणजेच 1 मेनंतर या संस्थांमार्फत येणारे कॉल्स किंवा मेसेजेस एका विशेष अशा सिरीजच्या क्रमांकावरून येतील. त्यामुळे सर्वसामान्यांना ते लगेत लक्षात येईल, त्याचा त्रास त्यांना होणार नाही. इतर सर्व क्रमांक ब्लॉक केले जाणार आहेत.
‘या’ सेवेचाही होतोय वापर
अनावश्यक कॉल्स आणि मेसेजेसला कंटाळलेले लोक डू नॉट डिस्टर्ब म्हणजेच डीएनडीचा वापर करतात. त्यासाठी मेसेज अॅप ओपन करून FULLY BLOCK असं कॅपिटल लेटरमध्ये टाइप करून ते 1909 या क्रमांकावर पाठवावं लागतं. किंवा 1909 याच टोल-फ्री क्रमांकावर फोन करून आपला क्रमांक डू-नॉट डिस्टर्बच्या लिस्टमध्ये समाविष्ट करता येतो. मात्र आता थेट नेटवर्कवरूनच असे क्रमांक ब्लॉक केले जाणार असल्यानं सर्वसामान्यांना ही प्रक्रिया करण्याची गरज पडणार नाही.