Increase Revenue From Toll: मोदी सरकारने गेल्या नऊ वर्षांत केलेल्या विकासकामांमुळे भारतातील रस्त्यांचे जाळे 59 टक्क्यांनी वाढून, अमेरिकेनंतर भारत जगात दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. तसेच गेल्या नऊ वर्षांत टोलमधून मिळणारा महसूल 4,770 कोटी रुपयांवरून 41,342 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. वर्ष 2030 पर्यंत टोल महसूल 1.30 लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचवण्याचा सरकारचा मानस आहे, अशी माहिती केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिली.
अमेरिकेनंतर भारत दुसऱ्या क्रमांकावर
भारतात रस्ते, पूल, उड्डाणपूल, मेट्रो, रेल्वे यासारखी वाहतूकीची आणि दळणवळणाशी संबंधित विकास कामे मोठ्या प्रमाणात सुरु आहे. सध्या देशातील रस्त्यांचे जाळे (रस्त्यांचे विकास कार्य) सुमारे 1,45,240 किमी आहे, तर 2013-14 या आर्थिक वर्षात ते केवळ 91,287 किमी होते. अशा प्रकारे, गेल्या नऊ वर्षांत देशातील रस्त्यांच्या जाळ्यात 59 टक्के वाढ झाली आहे. मोदी सरकारच्या नऊ वर्षांच्या कामगिरीवर आयोजित एका परिषदेत बोलतांना गडकरी यांनी काही महत्वाची माहिती सांगितली. गडकरी म्हणाले की, आज भारताचे रस्त्यांचे जाळे जगात अमेरिकेनंतर दुसऱ्या क्रमांकावर पोहोचले आहे. यादरम्यान भारताने रस्ते बांधणीच्या क्षेत्रात सात जागतिक विक्रमही पूर्ण केले आहे.
महसूलात वाढ
देशाअंतर्गत टोल मधून मिळणाऱ्या महसूलातही वाढ झालेली आहे. गेल्या नऊ वर्षांत टोलमधून मिळणारा महसूल 4,770 कोटी रुपयांवरून 41,342 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. तर 2030 पर्यंत टोल महसूल 1.30 लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचवण्याचा सरकारचा मानस आहे.
FASTag प्रणालीचा उपयोग
FASTag प्रणालीच्या आधी टोल भरतांना टोल नाक्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागायच्या, टोल संकलनासाठी FASTag प्रणालीचा वापर केल्यामुळे टोल प्लाझावर वाहनांची प्रतीक्षा वेळ (Waiting time for vehicles) 47 सेकंदांवर आली आहे. ही वेळ 30 सेकंदावर आणण्यासाठी सरकार आणखी काही पावले उचलत आहे.