चालू आठवड्यात शेअर बाजार टायर कंपन्यांनी (Tyre Companies) गाजवलंय. अगदी 5 जानेवारीचा आढावा घ्यायचा झाला तरी जे के टायर (J K Tyre) 6.7%, टीव्हीएस श्रीचक्रा (TVS Srichakra) 9%, अपोलो टायर्स (Apollo Tyres) 5.5% आणि सियाट (Ceat Tyres) 4.2% इतका भरघोस परतावा टायर कंपन्यांनी गुंतवणूकदारांना दिला आहे.
काही दिवसांच्या सलग रॅलीनंतर 6 जानेवारीला या शेअरमध्ये थोडी नफारुपी विक्री दिसून आली . आणि अपोलो टायर शेअर जवळ पास 3% खाली आला.
पण, मागच्या सहा महिन्यांचा आढावा घेतला तर घेतला तरी टायर कंपन्यांनी मजबूत वाढ अनुभवली आहे. यामध्ये अपोलो टायर 76% तर सियाट 62% नी वाढले. या वाढी मागची कारणं समजून घेऊया.
टायर कंपन्यांचे शेअर का वधारले?
यामागे तीन महत्त्वाची कारणं आहेत.
- नैसर्गिक रबराच्या किमती उतरल्या : रबराच्या किमती मागच्या दोन वर्षांतल्या नीच्चांकी स्तरावर आहेत . चीनमध्ये रबराच्या मागणीला उतरती कळा आली आहे. आणि पुरवठा मात्र जास्त होतोय. त्यामुळे किमती उतरल्यात. आणि याचा फायदा टायर कंपन्यांना स्वस्त रबर मिळण्यात होतोय.
- कच्च्या तेलाच्या किमतीत घट : जगभरात कच्च्या तेलांच्या किमतीत घट होऊन ब्रेंट क्रूड किमती 80 अमेरिकन डॉलर प्रती बॅरलवर स्थिरावल्या आहेत. त्यामुळे वाहतूक आणि उत्पादनाचा खर्च कमी झाला आहे. यातून टायर कंपन्यांचा नफा वाढणार आहे.
- कंपन्यांची कार्यक्षमता वाढली : हे कारणंही महत्त्वाचं आहे. कच्चा माल स्वस्त झालाय. त्याचप्रमाणे टायर कंपन्यांची दैनंदिन उत्पादनाची कार्यक्षमता वाढली आहे. टायर कंपन्यांनी आपला भांडवली खर्च कमी करण्यात यश मिळवल्यामुळे त्यांची नफ्याची मार्जिन आगामी तिमाही निकालांमध्ये वाढलेली असणार आहे.
शिवाय मागचं वर्षभर टायर कंपन्यांचे शेअर मंदीत होते. त्यातून उभारी घेऊन आता शेअरनी उसळी मारली आहे. पण, यात एका स्मॉलकॅप कंपनीने लक्ष वेधून घेतलं आहे.
‘हा’ स्मॉलकॅप टायर शेअर चर्चेत का?
हा असा टायर शेअर आहे ज्याने या आठवड्यात आतापर्यंत 19% वाढ पाहिली आहे. टीव्हीएस श्रीचक्र असं या कंपनीचं नाव असून आज (6 जानेवारी) इतर टायर कंपन्यांच्या शेअरची पडझड झालेली असतानाही टीव्हीएस श्रीचक्रने 2.88% परतावा गुंतवणूकदारांना दिलाय.
मागच्या सहा महिन्यांत या शेअरने तब्बल 111% परतावा दिला आहे. आणि मागच्या वर्षीच्या तुलनेत शेअरमध्ये 80% वाढ झाली आहे.
सध्या देशातल्या टायर इंडस्ट्रीचा आकार 75,000 लाख कोटी इतका आहे. पण, येत्या तीन वर्षांत तो 1 लाख कोटींपर्यंत जाऊ शकतो.