जागतिक पातळीवर कच्चे तेल आणि कच्च्या रबराच्या किंमतीत घसरण होत असली तरी रबरापासून टायर्स बनवणाऱ्या कंपन्यांचे शेअर्स मात्र गुरूवारी (दि.6 जानेवारी, 2023) तेजीत असल्याचे दिसून आले. गेल्या काही दिवसांपासून चीनकडून कमी मागणी आणि पुरवठा अधिक होत असल्यामुळे कच्च्या रबराच्या किमती मोठ्या प्रमाणात घसरल्या आहेत. गेल्या दोन वर्षांत या किमती निचांकी स्तरावर आल्या आहेत.
रबर आणि क्रूड ऑईलच्या दरात घसरण झाल्यामुळे सर्वांचे लक्ष टायर क्षेत्राकडे वळले आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांनी टायर कंपन्यांच्या शेअर्समध्ये उत्साह दाखवत जोरदार खरेदी केल्याचे, मुंबईतील गुंतवणूक सल्लागार asksandipsabharwal.com या वेबसाईटचे संदीप सभरवाल यांनी सांगितले. कोरोनाकाळातील दोन वर्षांच्या खडतर परिस्थितीनंतर टायर इंडस्ट्रीमधून रबराची मागणी वाढली, परिणामी रबराच्या किमतीत वाढ झाली. पण मधल्या काळात पुन्हा मागणी कमी झाली आणि आवक वाढली, त्यामुळे कच्च्या/नैसर्गिक रबराच्या किमती दोन वर्षांच्या निचांकी पातळीवर पोहोचल्या आहेत.
टायर इंडस्ट्रीसाठी RSS-4 प्रकारचा रबर वापरला जातो. त्याची किंमत सध्या मार्केटमध्ये 137.5 रुपये प्रति किलो आहे. गेल्या दोन महिन्यात या किमती सुमारे 8 टक्क्यांनी कमी झाल्या आहेत. चीनमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने रबराच्या किमतीवर परिणाम झाला होता. तसेच देशाबाहेरील मार्केटमध्ये रबराचे उत्पादन पुरेसे असल्यामुळे तिथेही रबराच्या किमती कमी झाल्या आहेत.
टायर इंडस्ट्रीमध्ये चालू आर्थिक वर्षात म्हणजे 2022-23च्या तिसऱ्या तिमाहीत रबराची मागणी वाढेल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. पण तसे मात्र झाले नाही. या कालावधीत गाड्यांच्या विक्रीत फारशी वाढ न झाल्याने त्याचा फटका टायरच्या मागणीवर झाला. तसेच कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांचा फटका या उद्योगाला चांगलाच बसला आहे.
चीनमधील कोरोना रबर उद्योगाला फटका!
गेल्या काही महिन्यांपासून रबराचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होत असल्याने आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये रबराच्या किमती घसरत आहेत. त्यात चीनमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने तिथून रबराची मागणी कमी होऊ लागली आहे. बरेच कारखाने बंद केले जाऊ लागले आहेत. चीन हा रबराची मागणी असणारा सर्वांत मोठा देश आहे.
जास्तीच्या पावसामुळे रबराच्या उत्पादनावर परिणाम!
भारतात गेल्या वर्षी रबराची मागणी 13 टक्क्यांनी वाढली होती. पण उत्पादनात फक्त 8 टक्क्यांना वाढ झाली होती. 2021-22 मध्ये 12.38 लाख टन अशी रेकॉर्डब्रेक रबराची मागणी वाढली होती. पण या आर्थिक वर्षातील निकाल काही वेगळेच सांगत आहेत. यावर्षी मागणी कमी आहे आणि पुरवठा अधिक झाला आहे. भारतीय रबर बोर्डने 2023 या आर्थिक वर्षात 8.5 लाख टन रबरचे उत्पादन करण्याचा अंदाज बांधला होता. तो आता 8 लाख टनवर आणला आहे.
इंडियन रबर डीलर्स फेडरेशनचे अध्यक्ष जॉर्ज वेली यांच्या मते, गेल्या दोन महिन्यात पाऊस मोठ्या प्रमाणात झाल्याने त्याचा परिणाम रबराच्या उत्पादनावर झाला आहे. भारतात सर्वाधिक रबराचे उत्पादन केरळमध्ये होते; त्यानंतर त्रिपुरामध्ये होते. याशिवाय संपूर्ण जगात रबराचे सर्वाधिक उत्पादन थायलंडमध्ये होते. तिथेही पावसामुळे रबराच्या उत्पादनावर परिणाम झाला आहे.
उत्पादन कमी तरीही किमती चढ्याच दराने!
रबर उद्योगात संशोधन करणारे जॉम जेकॉब (Jom Jacob) यांच्या म्हणण्यानुसार, गेल्या काही दिवसांपासून रबराच्या किमतीत घसरण सुरू आहे. कच्च्या रबराचे उत्पादन कमी झाल्याने त्याची मागणी वाढत आहे. पण त्याचा किमतीवर तितकासा परिणाम झालेला दिसून येत नाही. कारण गेल्या 5 महिन्यात उत्पादन कमी असून, तसेच कोरोनामुळे मंदीचे वातावरण असूनही त्याच्या किमतीत घसरण झालेली नाही.