गेल्या काही महिन्यांपासून दुचाकीसह चारचाकी खरेदी करणाऱ्यांच्या संख्येत प्रचंड वाढ दिसून आली. मात्र 1 जूनपासून वाहनांच्या किंमतीमध्ये वाढ होणार असल्याने ग्राहकांमध्ये नाराजी आहे. इलेक्ट्रिक दुचाकींना दिल्या जाणाऱ्या अनुदानात कपात केल्यामुळे किमतीत वाढ होऊ शकते. आघाडीची कार उत्पादक Honda ने यापूर्वीच कारच्या किमती वाढवल्या आहेत. मार्च महिन्यात SUV सेगमेंट कार New Citroen C3 ची किंमत 18000 रुपयांनी वाढवण्यात आली आहे.
कारच्या किमती 1% वाढणार
सेडान सिटी आणि Amaze च्या किमती जून महिन्यापासून 1% वाढवणार असल्याचे, Honda Cars India ने सांगितले आहे. महागाईमुळे कंपनी किमती वाढवणार आहे. Honda City आणि Honda Amaze च्या किमती जूनपासून 1%पर्यंत वाढवण्याची कंपनीची योजना आहे. अमेझची सध्या किंमत ६.९९ लाख ते ९.६ लाख रुपये आहे. तेव्हा 6.99 लाख रुपयांच्या अमेझ कारची किंमत सुमारे 7000 रुपयांनी वाढेल.
इलेक्ट्रिक स्कुटर्सच्या किंमती वाढणार
केंद्र सरकारने 1 जून 2023 रोजी किंवा त्यानंतर नोंदणी केलेल्या इलेक्ट्रिक दुचाकींना लागू असलेल्या FAME-II (फास्टर अॅडॉप्शन ऑफ मॅन्युफॅक्चरिंग ऑफ इलेक्ट्रिक व्हेइकल्स इन इंडिया) योजनेअंतर्गत दिले जाणारे अनुदान कमी केले आहे. यासोबतच, इलेक्ट्रिक दुचाकींसाठी मागणी प्रोत्साहन म्हणून दिले जाणारे अनुदान कमी करण्यात आले आहे. प्रोत्साहन मर्यादा 40% वरुन एक्स-फॅक्टरी किमतीच्या 15% पर्यंत कमी करण्यात आली आहे. सरकारने दिलेल्या अनुदानात कपात केल्यास इलेक्ट्रिक दुचाकीची किंमत २५ ते ३५ हजार रुपयांनी महागणार आहे.
Citroen C3 ची किंमत वाढली
भारतात Citroen C3 हॅचबॅकची किंमत जानेवारी 2023 मध्ये 27500 रुपयांनी एकदा वाढविण्यात आली होती. त्यानंतर दुसऱ्यांदा मार्चमध्ये पुन्हा 18,000 रुपयांनी वाढवण्यात आली. अशाप्रकारे एका वर्षातच Citroen C3 ची किंमत 45500 रुपयांनी वाढली. सध्याच्या किमतींनुसार, Citroen C3 च्या लाइव्ह व्हेरियंटची (बेस मॉडेल) किंमत 5.98 लाख एक्स-शोरूम वरून 6.16 लाख रुपये एक्स-शोरुम झाली आहे.