या आठवड्यात दलाल स्ट्रीट गजबजून जाऊ शकते कारण एकूण 1000 कोटींपेक्षा जास्त किंमतीचे दोन आयपीओ बाजारात आणले जात आहेत. अहमदाबादमध्ये मुख्यालय असलेली ऍग्रोकेमिकल कंपनी धर्माज क्रॉप गार्ड लिमिटेड आणि इंजिनीअरिंग सिस्टिम्स अँड सोल्युशन्स पुरवणाऱ्या युनिपार्ट्स इंडिया लिमिटेड या कंपन्यांचे आयपीओ या आठवड्यात दाखल होत आहेत.
धर्माज क्रॉप गार्ड लिमिटेडचा आयपीओ (IPO of Dharmaj Crop Guard Limited)
अहमदाबादमध्ये मुख्यालय असलेली ऍग्रोकेमिकल कंपनी धर्माज क्रॉप गार्ड लि.ने इनिशियल पब्लिक ऑफरच्या (आयपीओ) माध्यमातून 251 कोटी रुपये उभारण्याचे नियोजन केले आहे. या ऑफरमध्ये विद्यमान भागधारकांकडून 14.83 लाख इक्विटी शेअर्सची ऑफर-फॉर-सेल (ओएफएस) तसेच प्रत्येकी 10 रुपये दर्शनी मूल्य असलेल्या जास्तीत जास्त 216 कोटी रुपयांपर्यंतच्या नवीन इक्विटी शेअर्स जारी करणे यांचा समावेश आहे. या ऑफरची किंमत 216-237 रुपये प्रति शेअर असून या ऑफरचा सब्सक्रिप्शन पीरियड 28 ते 30 नोव्हेंबर पर्यंत चालणार आहे. 6 डिसेंबर 2022 रोजी गुंतवणूकदाराच्या डिमॅट खात्यात शेअर्सचे वाटप करण्यात येणार आहे. धर्माज क्रॉप गार्ड आयपीओमध्ये किरकोळ गुंतवणूकदारांसाठी किमान ऑर्डर आकार 60 शेअर्स आहे कारण एका लॉटमध्ये ६० शेअर्स असतील. 8 डिसेंबर 2022 रोजी धर्माज क्रॉप गार्ड आयपीओ एक्सचेंजवर लिस्ट करेल. धर्माज क्रॉप गार्ड कीटकनाशके, बुरशीनाशके, तणनाशके, वनस्पती वृद्धी नियामक, सूक्ष्म खते यासारख्या अनेक कृषी रासायनिक फॉर्म्युलेशन्सची निर्मिती करते. कंपनी बी2 सी आणि बी 2 बी या दोन्ही क्लायंट बेससह एक उदयोन्मुख कंपनी आहे.
युनिपार्ट्स इंडिया लिमिटेडचा आयपीओ (IPO of Uniparts India Limited)
दुसरीकडे आयपीओच्या माध्यमातून पैसा उभा करण्यासाठी इंजिनीअरिंग सिस्टिम्स अँड सोल्युशन्स पुरवणाऱ्या युनिपार्ट्स इंडिया लिमिटेड या कंपनीनं सुरुवातीची कागदपत्रं 'सेबी'कडे सादर केली आहेत. रेड हेरिंग प्रॉस्पेक्टसच्या (डीआरएचपी) मसुद्यानुसार, सार्वजनिक ऑफरच्या माध्यमातून ८३६ कोटी रुपये उभारण्याची कंपनीची योजना आहे. प्रारंभिक भाग विक्री ही प्रवर्तक समूहाच्या कंपन्या आणि सध्याच्या गुंतवणूकदारांच्या 15,731,942 इक्विटी शेअर्सची ऑफर फॉर सेल (ओएफएस) आहे. ओएफएसमध्ये शेअर्स देणाऱ्या प्रवर्तक समूह कंपन्यांमध्ये मेहेर सोनी 2018, सीजी-एनजी नेवाडा ट्रस्ट, करण सोनी 2018. सीजी-एनजी नेवाडा ट्रस्ट, पामेला सोनी आणि गुंतवणूकदार अशोका इन्व्हेस्टमेंट होल्डिंग्ज लिमिटेड आणि अंबादेवी मॉरिशियस होल्डिंग्स लिमिटेड या कंपन्या आहेत.
पब्लिक ऑफरिंगची किंमत प्रति शेअर 548 ते 577 रुपये आहे. आयपीओ ३० नोव्हेंबरपासून सुरू होईल आणि पुढील आठवड्यात 2 डिसेंबरला संपेल. युनिपार्ट्स इंडिया लिमिटेडच्या आयपीओचे प्रत्येक लॉटमध्ये 25 शेअर्स आहेत आणि 7 डिसेंबर 2022 पर्यंत वाटप निश्चित केले जाईल. युनिपार्ट्स इंडिया लिमिटेडच्या प्रारंभिक सार्वजनिक ऑफरचा आकार 794 ते 836 कोटी रुपये दरम्यान आहे आणि कंपनीच्या शेअर्सची विक्री बीएसई आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज (एनएसई) या दोन्हीवर केली जाईल.