Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Popati Party: पोपटी पार्टीनिमित्त 70 लाखांची उलाढाल होते, यंदा पर्यटकांची संख्या 30 टक्क्यांनी वाढली!

Popati Party and Tourism Business

Popati Party: भारतात, हिवाळा हा फिरण्याचा सीझन म्हणून पाहिला जातो. त्यात थंडीत महाराष्ट्रात विविध पार्ट्या होत असतात. त्यात रायगड जिल्ह्यात होणारी पोपटी पार्टी खूप प्रसिद्ध आहे. या पार्टीच्यानिमित्ताने पर्यटन व्यवसायाला चालना मिळते. स्थानिक शेतकऱ्यांना याचा लाभ मिळतो. लाखोंमध्ये पैशांची उलाढाल होते. तर, या पोपटी पार्टीबद्दल अधिक जाणून घ्यायचे असेल तर लेख पूर्ण वाचा.

Tourism is getting a boost due to the Popati party: गुलाबी थंडीने वातावरण मस्त झाले आहे, अशावेळी मित्र - मैत्रिणी किंवा कुटुंबियांसमवेत थंडीची मज्जा घेण्यासाठी फिरायला जायला कोणाला आवडणार नाही. यातच या हिवाळ्याच हुर्डा पार्टी आणि पोपटी पार्टीला उधाण आलेला असतो. त्यामुळे आपोआपच पर्यटकांची पावले अलिबाग, रायगडच्या दिशेने जातात.

हिवाळ्यात धान्य पिकून त्याची कापणी झालेली असते, अनेक भाज्या या काळात येतात. पार्टी करण्याची परंपरा महाराष्ट्रात आहे. भरिताची वांगी मोठ्या प्रमाणात येत असल्याने खानदेशात भरीत पार्टी केली जाते. तर, ज्वारी अर्थात हुर्डा या पश्चिम महाराष्ट्र आणि काही प्रमाणात मराठवाड्यात पिकत असल्याने हुर्डा पार्टी केली जाते. तसेच हरभरा, गूळ, मटण अशीही पार्टी कोल्हापूर, साताऱ्यात होते. तर रायगड जिल्ह्यात या काळात पोपटी अर्थात पावटे पिकलेले असतात. पावटे मुबलक प्रमाणात असल्यामुळे त्याचे विविध पदार्थ बनवतात. पोपटी पार्टीत पोपटी महत्त्वाचा पदार्थ असल्यामुळे याला पोपटी पार्टी म्हणतात.

पोपटी म्हणजे काय (What is Popati?)

हिवाळ्यात मुबलक प्रमाणात भाज्या पिकतात, यामुळे या भाज्यांना एकत्र करून बांडी बनवली जाते. बांडी म्हणजे मातीचे भांडे. आताच्या भाषेत सांगायचे तर वन पॉट मील! हे वन पॉट मील मातीच्या मडक्यात बनवली जाते. यात विविध भाज्या, कंद, चिकन, अंडी आणि पोपटी घालून त्यात मीठ, मिरेपूड इतर मसाले घालून एकत्र थर रचतात. मग जमिनीत एक खड्डा खणतात त्यात लाकडाचे किंवा कोळशाचे निखारे ठेवतात त्यात हे भांडे ठेवतात, वरुन पुन्हा निखारे ठेवतात. मग काही तासांनी ही पोपटी शिजते.मग संध्याकाळी उशिरा, थंडीमध्ये गरमा-गरम पोपटीचा आनंद घेतला जातो.

पोपटी ही केवळ मांसाहारी नसते, तर शाकाहारी पोपटीही बनवतात. ज्यात केवळ भाज्या आणि मसाले असतात. पोपटीमध्ये कांदे, बटाटे, पावट्याच्या शेंगा, हरभऱ्याच्या शेंगा, तुरीच्या शेंगा, काटेरी वांगी, कोनफळ, कंद, शेवग्याच्या शेंगा, कणगी, नवलकोल, भुईमूग, भांबुर्डीचा पाला, खारबट्टीचा पाला अशा अनेक भाज्या घातल्या जातात. रायगडमधील गावागावात अशी पोपटी बनवली जाते. याला बांडीदेखील म्हणतात. अनेक मराठी ख्रिस्ती अशाप्रकारची बांडी उत्तर कोकणात हिवाळ्यामध्ये करतात, असे टूर मॅनेजर मिनल शेटकर यांनी सांगितले.

पोपटी हा प्रकार केवळ गावात आणि अलिबागमधील स्थानिकांमध्येच रूढ होता. मात्र अलिबागमध्ये पर्यटन वाढत गेले, ज्यामुळे हा प्रकार इतरांना समजला. यात अनेक रिसॉर्ट, कृषी पर्यटन व्यावसायिक आणि होम स्टेज यांनी हिवाळ्यात येणाऱ्या पर्यटकांच्या मेन्युमध्ये पोपटी देण्यासु सुरुवात केली. हा वेगळा प्रकार पर्यचकांना आवडला, त्यामुळे आता जवळपास सर्वच ठिकाणी पोपटी दिली जाते. एवढेच नाही तर आता खास पोपटी पार्टी अरेंज केली जाते आणि यानिमित्ताने पर्यटकांना आकर्षित केले जाते. यामुळे अलिबागमध्ये खास पोपटीसाठी पर्यटक दरवर्षी मोठ्या प्रमाणात अलिबागला जातात. मागील 7 ते 8 वर्षांपासून हा प्रकार प्रसिद्ध झाला आहे.

पोपटी पार्टीमध्ये शेकोटी भोवती बसून, नाच-गाण्यांचा आनंद लुटतात. तर आजकाल पोपटीसह बार्बेक्युचाही आनंद लुटला जातो. विविध पारंपरिक खेळ खेळले जातात. सध्या कॅम्पिंग स्पॉट ते फाईव्ह स्टार हॉटेल सर्वत्र पोपटी सर्व्ह केली जाते.

पोपटी पार्टी आणि पर्यटन व्यवसाय (Popati Party and Tourism Business)

पोपटीच्या निमित्ताने अलिबागमध्ये साधारण 3 लाखांपर्यंच पर्यटक येतात. यात कुटुंबियांचे ग्रुप्स, मित्र-मैत्रिणींचे ग्रुप्स जास्त असतात. करोनाकाळात पोपटी पार्टी झाल्या नव्हत्या त्यामुळे मागील वर्षी साधारण 15 ते 20 टक्के पर्यटक कमी आले होते. मागील चार ते पाच वर्षांमध्ये कॅम्पिंग व्यवसाय वाढल्यामुळे, त्या ठिकाणीही पोपटी पार्टीची मागणी मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे पोपटी पार्टीला सुगीचे दिवस आले आहेत.या पार्ट्यांमुळे स्थानिक शेतकऱ्यांच्या भाज्या मोठ्या प्रमाणात विकल्या जातात, स्थानिक महिलांना आणि पुरुषांना बांडी बनवण्याचे काम मिळते. यामुळे अलिबाग आणि रायगडमध्ये आर्थिक उलाढाल होते. साधारण 70 ते 80 लाखांची उलाढाल यानिमित्ताने होते, असे स्थानिक व्यावसायिक मुंकुंद साटम यांनी ही माहिती महामनीला दिली.

यंदा, ख्रिसमसपासूनच पोपटी पार्टीला सुरुवात झाली आहे. प्री-बुकींग आणि येणारा ओढा पाहता यावेळी पोपटी पार्टीसाठी येणाऱ्या पर्यटकांची संख्या, मागील वर्षाच्या तुलनेत साधारण 30 टक्क्यांनी अधिक आहे. महाबळेश्वर, लोणावळा यानंतर अलिबाग हे महाराष्ट्रातले सर्वाधिक फुटफॉल असलेले पर्यटन स्थळ आहे. त्यात पोपटी पार्टीनिमित्त याला चालना मिळते, असे शेटकर यांनी म्हटले.