Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Bank Holiday's In 2023: पुढील वर्षी 24 बँक हॉलिडे, जाणून घ्या कोणत्या दिवशी बँक बंद राहणार

Bank Holidays in year 2023

Bank Holiday's In 2023: केंद्र सरकारने घोषीत केलेल्या राष्ट्रीय स्तरावरील सार्वजनिक सुट्या आणि रिझर्व्ह बँकेच्या वेळापत्रकानुसार वर्ष 2023 मध्ये 24 बँक हॉलिडेज आहेत. या दिवशी बँका बंद राहणार असल्याने गैरसोय टाळण्यासाठी ग्राहकांना नियोजन करावे लागेल.

वर्ष 2023 मध्ये 24 बँक हॉलिडेज आहेत. त्यातच बँकांना दुसरा आणि चौथा शनिवार सुट्टी असल्याने गैरसोय टाळण्यासाठी ग्राहकांना बँकिंग कामाचे आधीच नियोजन करावे लागणार आहे. राज्य सरकारकडून नुकताच सार्वजनिक सुट्ट्यांचे परिपत्रक जारी करण्यात आले. त्यानुसार महाराष्ट्रात बँकांना 24 दिवस सुट्टी राहणार आहे.

राष्ट्रीय पातळीवर प्रजासत्ताक दिन (26 जानेवारी), स्वातंत्र्य दिन ( 15 ऑगस्ट) आणि महात्मा गांधी जयंती (2 ऑक्टोबर) या तीन सरकारने निश्चित केलेल्या राष्ट्रीय सुट्ट्या दरवर्षी लागू असतात. 1881 च्या कायद्याच्या अंतर्गत, राज्य सरकार, केंद्र सरकार आणि केंद्रशासित प्रदेश आपल्या अख्तयारीतील बँक सुट्ट्यांची यादी करतात. दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी भारतात बँक व सरकारी कार्यलयांना सुट्टी असते, त्यामुळे त्या दिवशी बँका बंद असतात. पण या व्यतिरिक्त राज्यातील सर्व बँक व सरकारी कार्यालये राष्ट्रीय उत्सव व सणाच्या निमित्ताने बंद असतात.

जानेवारी महिन्यात बँका 26  जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त सार्वजनिक सुट्टीनिमित्त बंद राहतील. फेब्रुवारी महिन्यात महाराष्ट्रात 18 फेब्रुवारी आणि 19 फेब्रुवारी असे दोन बँक हॉलिडे आहे. 18 फेब्रुवारी रोजी महाशिवरात्री आणि 19 फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज जयंती (तारखेनुसार) निमित्त राज्य सरकारने सार्वजनिक सुट्टी घोषीत केली आहे. त्यामुळे बँका या दोन्ही दिवशी बंद राहतील.

मार्च महिन्यात 7 मार्च रोजी होळी, 22 मार्च रोजी गुढीपाडवा आणि 30 मार्च 2023 रोजी रामनवमीनिमित्त बँक होलिडे जाहीर करण्यात आला आहे. एप्रिल 2023 मध्ये 4 बँक हॉलिडे आहेत. यात 4 एप्रिल रोजी महावीर जयंती, 7 एप्रिल 2023 रोजी गुड फ्रायडे, 14 एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती आणि 22 एप्रिल रोजी रमझान ईदची बँकांना सुट्टी असेल.  

मे महिन्यात 1 मे रोजी महाराष्ट्र दिन आणि 5 मे 2023 रोजी बुद्ध पौर्णिमेनिमित्त बँका बंद राहणार आहेत. जून महिन्या बकरी ईद निमित्त 28 जून बँकांना सुट्टी असेल. त्यानंतर जुलै महिन्यात 29 तारखेला मोहरमनिमित्त बँक हॉलिडे आहे.  

ऑगस्ट महिन्यात  15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनाची आणि 16 ऑगस्ट रोजी पारशी नववर्षनिमित्त बँकांना सुट्टी असेल. सप्टेंबर महिन्यात गणेश चतुर्थीनिमित्त 19 सप्टेंबर 2023 रोजी बँकांना सुट्टी असेल. 2 ऑक्टोबर रोजी  महात्मा गांधी जयंती आणि 24 ऑक्टोबर 2023 रोजी दसरा असल्याने बँकांना सुट्टी असेल.

नोव्हेंबर महिन्यात दुसरा आणि चौथा शनिवार वगळता बँकांना तीन दिवस सार्वजनिक सुट्टी आहे. 12 नोव्हेंबर रोजी लक्ष्मी पूजन, 14 नोव्हेंबर रोजी दिवाळी पाडवा आणि 27 नोव्हेंबर रोजी गुरुनानक जयंती बँकांना सुट्टी असेल. नंतर थेट 25 डिसेंबर 2023 रोजी नाताळानिमित्त बँकांना सुट्टी असेल.