भारतात अभियांत्रिकीचे शिक्षण देणाऱ्या अनेक दर्जेदार संस्था आहेत. त्यामध्ये सरकारी आणि खासगी संस्थांचाही समावेश आहे. या प्रत्येक संस्थांमधून मोठ्या प्रमाणात विद्यार्थी अभियांत्रिकीचे शिक्षण घेऊन बाहेर पडतात. भारतामध्ये इंजिनिअरिग क्षेत्रात आयआयटी(IIT) संस्था या दर्जेदार शिक्षणासाठी नावाजलेल्या आहेत. दरम्यान, भारतातील महत्त्वाच्या इंजिनिअरिंग सस्थांपैकी 7 सर्वोत्कृष्ट संस्थांची माहिती आपण जाणून घेऊयात..
Table of contents [Show]
- नॅशनल इन्स्टिट्यूशनल रँकिंग फ्रेमवर्कनुसार टॉप संस्था-
- इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मद्रास - तामिळनाडू
- इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी दिल्ली
- इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मुंबई
- इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी कानपूर
- इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी रुरकी
- इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी खरगपूर
- इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी गुवाहाटी
नॅशनल इन्स्टिट्यूशनल रँकिंग फ्रेमवर्कनुसार टॉप संस्था-
भारतातील शैक्षणिक संस्थांची रँकिंग प्रतिवर्षी जाहीर करण्यात येते. नॅशनल इन्स्टिट्यूशनल रँकिंग फ्रेमवर्क (NIRF) आणि शिक्षण मंत्रालयाच्या माध्यमातून देशभरातील विद्यापीठे, महाविद्यालये, संशोधन संस्था, अभियांत्रिकी महाविद्यालये, व्यवस्थापन, फार्मसी कॉलेज, वैद्यकीय, दंत, महाविद्यालय, यासह इतर विविध अभ्यासक्रमाचा समावेश असलेल्या शैक्षणिक संस्थाना श्रेणी देण्यात येते. 2023 या शैक्षणिक वर्षात NIRF ने दिलेल्या अभियांत्रिकी संस्थांच्या रँकिंग मध्ये पुढील 7 संस्थांचा अग्रक्रम लागतो. त्यामध्ये IIT मद्रासही पहिल्या स्थानावर आहे. त्यानंतर IIT दिल्ली आणि IIT मुंबईचा समावेश आहे.
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मद्रास - तामिळनाडू
NIRF ने दिलेल्या अभियांत्रिकी संस्थांच्या रँकिंग मध्ये भारतात सर्वोत टॉप अभियांत्रिकी संस्था म्हणून आयआयटी मद्रासचा (Indian Institute of Technology Madras) क्रमांक लागतो. तामिळनाडू स्थित भारत सरकारच्या या इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेश घेण्यासाठी देशभरातील विद्यार्थी प्रयत्न करत असतात. आयआयटीमध्ये प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांना JEE Advanced परीक्षा उत्तीर्ण होणे गरजेचे आहे. ही भारत सरकारने स्थापन केलेली सर्वोच्च संस्था आहे. या संस्थेत बीटेक साठी साधारणात 2.1लाखाच्या पुढे फी आकारली जाते.
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी दिल्ली
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी दिल्ली (IIT Delhi) ही भारतातील 23 IIT पैकी एक संस्था आहे. 1961 मध्ये कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग म्हणून या संस्थेची स्थापना झाली होती. त्यानंतर या संस्थेला इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी दिल्ली असे नामकरण करण्यात आले. या आयआयटीला डीम्ड विद्यापीठाचा दर्जा देण्यात आला असून सद्यस्थितीत ही देशातील क्रमांक दोनची अभियांत्रिकी संस्था आहे. या संस्थेतून स्थापनेपासून आतापर्यंत 48000 हून अधिक जणांनी अभियांत्रिकीसह विविध अभ्यासक्रमातून पदवी प्राप्त केली आहे. या संस्थेत अभियांत्रिकीसाठी साधारणात 2.55 लाख रुपयांच्या पुढे फी आकारली जाते
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मुंबई
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ही मुंबई शहरातील पवई येथे आहे. भारतातील तांत्रिक संस्थामधील ही एक नावाजलेली संस्था आहे. अभियांत्रिकीच्या शिक्षणासाठी ही संस्था देशात तिसऱ्या क्रमांकावर आहे. या संस्थेची स्थापना 1958 मध्ये झाली. कंप्युटर सायन्स आणि अभियांत्रिकी यांसारख्या अभ्यासक्रमासाठी भारतीय विद्यार्थ्यांची IIT Mumbai ही सर्वोच्च पसंतीची निवड मानली जाते. या संस्थेत 4 वर्षाचा अभियांत्रिकीचा अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी एकूण 8.5 ते 10 लाख रुपये फी आकारली जाते.
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी कानपूर
उत्तर प्रदेशातील कानपूरच्या (IIT Kanpur) आयआयटीचा भारतातील सर्वोत्कृष्ट अभियांत्रिकी संस्थामध्ये चौथा क्रमांक लागतो. ही संस्था 1959 मध्ये स्थापन करण्यात आली, पहिल्या भारतीय तंत्रज्ञान संस्थांपैकी एक म्हणून या संस्थेची ओळख आहे.
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी रुरकी
उत्तराखंड राज्यातील आयआयटी रुरकी (IIT Ruraki) ही देखील दर्जेदार अभियांत्रिकी शिक्षणासाठी प्रसिद्ध संस्था म्हणून ओळखली जाते. या संस्थेत उच्च तंत्रज्ञान शिक्षण आणि अभियांत्रिकी विभागाने देशाला तांत्रिक मनुष्यबळ आणि ज्ञान उपलब्ध करून देण्यात आणि संशोधनात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. ही संस्था जगातील सर्वोत्तम तंत्रज्ञान संस्थांमध्ये गणली जाते. 21 सप्टेंबर 2001 या संस्थेला IIT म्हणून मान्यता प्राप्त झाली आहे. या संस्थेत विद्यार्थ्यांना बी.टेक, बी आर्किटेकसाठी शिक्षण दिले जाते.
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी खरगपूर
पश्चिम बंगालमधील खरगपूर (IIT Kharagpur) येथील आयआयटी ही संस्था 1951 मध्ये स्थापन करण्यात आली असून ही भारतातील पहिली आयआयटी म्हणून ओळखली जाते. 2019 मध्ये याला भारत सरकारकडून या संस्थेला इन्स्टिट्यूट ऑफ एमिनन्सचा दर्जा देण्यात आला. IIT खरगपूर हे भारतातील सर्वात प्रतिष्ठित शैक्षणिक संस्थांमधील एक संस्था म्हणून गणली जाते. या संस्थेत अभियांत्रिकी आणि आर्किटेक्चरच्या विविध विद्याशाखा आहेत.
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी गुवाहाटी
आसाम राज्यातील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी गुवाहाटी (Guwahati) ही 1994 मध्ये स्थापन करण्यात आली. सध्या संस्थेमध्ये अकरा विभाग, सात आंतर-विद्याशाखीय शैक्षणिक केंद्रे आणि पाच शाळा आहेत. अभियांत्रिकीचे शिक्षण देण्यामध्ये देशात या संस्थेचा सातवा क्रमांक लागतो. IIT गुवाहाटी ही भारतातील एकमेव शैक्षणिक संस्था आहे ज्या संस्थेला 2014 मध्ये लंडन-आधारित टाइम्स हायर एज्युकेशन (THE) ने प्रसिद्ध केलेल्या टॉप 100 जागतिक विद्यापीठांमध्ये स्थान मिळाले आहे. इन्स्टिट्यूशनल रँकिंग फ्रेमवर्क (NIRF) द्वारे घोषित ‘इंडिया रँकिंग 2023’ मध्ये देशातील सर्वोत्कृष्ट अभियांत्रिकी संस्थांमध्ये IIT गुवाहाटीने 7 वे स्थान कायम राखले आहे.