तुमच्या कुटुंबाच्या आर्थिक सुरक्षेसाठी टर्म इन्शुरन्स अत्यंत महत्त्वाचा आहे. घरातील कमावत्या व्यक्तीने टर्म इन्शुरन्स पॉलिसी घेणे अत्यंत गरजेचे आहे. तुमच्या मृत्यू पश्चात कुटुंबाला मोठी रक्कम मिळून मुलांचे शिक्षण, घरखर्च, विवाह, कर्ज असे मोठे खर्च तुम्ही जगातून निघून गेल्यानंतरही कुटुंबीय भागवू शकतात. सर्वसाधारणपणे 50 हजार मासिक उत्पन्न असलेल्या व्यक्तीला 1 कोटींचा टर्म इन्शुरन्स मिळू शकतो. उत्पन्न कमी असले तरी तुम्ही कमी रकमेचा कव्हर निवडू शकता. मात्र, हा इन्शुरन्स घेताना अनेक प्रश्न लोकांच्या मनात असतात.
या लेखामध्ये जीवन विमा म्हणजेच टर्म इन्शुरन्सबाबत विचारले जाणारे सर्वात महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे आम्ही देणार आहोत. अद्याप तुम्ही टर्म प्लॅन घेतला तर लवकरात लवकर टर्म प्लॅन घेऊन कुटुंबियांना आर्थिकदृष्ट्या सुरक्षित करा.
प्रश्न 1. सिगारेट ओढणे, दारू पिणे अशा जीवनशैली असेल तर प्रिमियम किती जास्त लागतो?
सर्वप्रथम विमा खरेदी करताना तुम्ही जीवनशैलीबाबत सर्व माहिती खरी द्यायला हवी. सिगारेट ओढत असाल, मद्यपान करत असाल तर विमा काढताना खोटी माहिती देऊ नका. अन्यथा भविष्यात तुमचा क्लेम नाकारला जाऊ शकतो. प्रिमियम वाचवण्याच्या हेतूने खोटी माहिती देऊ नका. तुम्हाला काही व्यसन असेल तर त्यानुसार प्रिमियममध्ये वाढ होते. प्रत्येक कंपनीनुसार ही रक्कम वेगवेगळी असू शकते.
प्रश्न 2. अपघात विमा आणि टर्म विम्यातील फरक काय?
अपघात विमा पॉलिसीचे फायदे फक्त अपघाती मृत्यू झाल्यानंतरच मिळतात. मात्र, टर्म इन्शुरन्स पॉलिसीमध्ये नैसर्गिक किंवा अपघाती यापैकी कोणत्याही कारणाने मृत्यू झाल्यास फायदा मिळतो. हृदयविकाराचा झटका, आग, पाण्यात बुडून यासह इतर अनेक कारणांची पॉलिसी धारकाचा मृत्यू झाल्यास क्लेम करता येतो.
प्रश्न 3. टर्म पॉलिसीचा प्रिमियम फिक्स्ड असतो की भविष्यात वाढतो?
सर्वसामान्य टर्म पॉलिसीचा प्रिमियम फिक्स्ड असतो. मात्र, पॉलीसीवर आकारलेल्या करातील बदलामुळे प्रिमियममध्ये थोडा फरक पडू शकतो. तसेच, तुम्ही पॉलीसीसोबत घेतलेले रायडर, जीवनशैली, तुम्ही जोखमीचे काम करत असाल तर कंपनी प्रिमियम वाढवू शकते.
प्रश्न. 4. टर्म पॉलिसीमध्ये मॅच्युरिटी बेनिफिट असतात का?
तुम्ही जर प्युअर टर्म पॉलिसी घेत असाल तर तुम्हाला पॉलिसी मॅच्युअर झाल्यानंतर भरलेले प्रिमियम किंवा इतर कोणतेही बेनिफिट मिळत नाहीत. मात्र, प्रिमियमही कमी आकारला जातो. प्रिमियम माघारी मिळेल असे बेनिफिट असलेल्या पॉलिसीही बाजारात उपलब्ध आहेत. मात्र, त्यासाठी तुम्हाला जास्त प्रिमियम द्यावा लागतो. मात्र, प्युअर टर्म प्लॅन काढलेले तुमच्यासाठी योग्य राहील.
प्रश्न 5. टर्म पॉलिसी घेतल्यावर करातून सूट मिळते का?
टर्म इन्शुरन्सच्या रकमेवर तुम्हाला करातून सूट मिळते. 80C नुसार तुम्ही प्रिमियम भरल्याचे बिल्स दाखवून करातून सुटका मिळवू शकता. समजा, तुम्ही वार्षिक 20 हजार रुपये प्रिमियम भरत असाल तर या रकमेवर तुम्हाला आयकर भरावा लागणार नाही. दीड लाखापर्यंतच्या रकमेवर 80C कलमानुसार कर लागणार नाही.
प्रश्न 6. टर्म पॉलिसीमध्ये रायडर म्हणजे काय?
टर्म विमा पॉलिसीद्वारे तुम्हाला ठराविक रकमेचे संरक्षण मिळते. मात्र, त्याव्यतिरिक्त तुम्हाला गंभीर आजार, अपघाती मृत्यू, यापासून संरक्षण मिळू शकते. मात्र, त्यासाठी अतिरिक्त प्रिमियम भरावा लागेल. समजा, तुम्ही 50 लाखांची टर्म पॉलिसी खरेदी केली आहे. मात्र, भविष्यात गंभीर आजाराचा खर्च भागवण्यासाठी संरक्षण हवे असेल तर तुम्ही 10 लाखांचा क्रिटिकल इलनेस रायडर घेतला तर तुम्हाला त्यासाठी अतिरिक्त प्रिमियम भरावा लागेल. भविष्यात जेव्हा कधी तुम्हाला गंभीर आजार होईल, त्यावेळी विमा कंपनी उपचारासाठी 10 लाख रुपये तुम्हाला देईल.