मागील 15 दिवसांपासून टोमॅटोच्या (Tomato) वाढलेल्या दराने जनता हतबल झाली आहे. एरव्ही कांद्यामुळे सरकारचे वांदे होत होते. मात्र यंदा टोमॅटोने जनतेसोबत सरकारलाही घाम फोडला आहे. देशातील काही बाजारपेठेत टोमॅटोचे दर 120 ते 160 रुपये प्रति किलोवर पोहोचले होते. त्यामुळे सरकार विरोधात जनतेतून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, देशातील टोमॅटोच्या वाढत्या किमती लवकरच कमी होतील, असे मत केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाने व्यक्त केले आहे.
टोमॅटो 120 रुपये प्रतिकिलोच्या पुढेच
अनेक पाककृतींमध्ये वापरल्या जाणाऱ्या टोमॅटोच्या किमती भारतात अनेक ठिकाणी गगनाला भिडल्या आहेत. मध्यप्रदेशातील भोपाळमध्ये टोमॅटोने सर्वाधिक 160 रुपये प्रति किलोचा दर गाठला आहे. तसेच दिल्ली- 120, मुंबई- 125,तर हैदराबादमध्ये टोमॅटो 150 रुपये किलोने विकला जात असल्याने ग्राहकांच्या डोळ्यात पाणी आले आहे. जम्मू आणि चेन्नईसारख्या शहरांमध्ये टोमॅटोचे दर सुमारे 120 रुपये प्रति किलोवर पोहोचले आहेत.
पावसामुळे आवक घटली, दर वाढले-
देशभरात मान्सून दाखल झाला आहे. काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात पावसाला सुरुवात झाली आहे. टोमॅटो उत्पादनात अग्रसेर असलेल्या महाराष्ट्र, गुजरात राज्यातील टोमॅटो पिकाला बिपरजॉय चक्रीवादळचा फटका बसल्याने टोमॅटोच्या उत्पन्नाला फटका बसला परिणामी बाजारपेठेतील टोमॅटोची आवक घटल्याने भाव कडाडले आहेत. या आठवड्यात फक्त टोमॅटो किमती वाढल्या आहेत. मात्र अवकाळी पावसामुळे टोमॅटोच्या किमती वाढल्या असल्याची माहिती वाणिज्य मंत्री गोयल यांनी एएनआय वृत्तसंस्थेला दिली आहे.
हिमाचल कर्नाटकातील टोमॅटोची आवक-
सध्या टोमॅटोची आवक कमी असल्याने टोमॅटोचे दर हे 100 रुपयेच्या पुढे गेले आहेत. मात्र लवकरच हिमाचल प्रदेश आणि कर्नाटकातील काही ठिकाणांहून टोमॅटोची आवक सुरू होणार आहे. त्यानंतर टोमॅटोचे भाव कमी होतील, असे आश्वासन गोयल यांनी दिले आहे. तसेच गेल्या वर्षीच्या किंमतींची तुलना केली तर यावर्षीच्या दरामध्ये फारसा फरक नाही. टोमॅटो व्यतिरिक्त बटाटे आणि कांद्याचे भाव सध्या नियंत्रणात असल्याचेही गोयल म्हणाल. तसेच निर्यातीला देखील बंदी कायम राहिल असेही ते म्हणाले.