स्मार्टफोन घेतला की सगळ्यात आधी लक्षं जातं ते वेगवेगळ्या ॲपकडे. मोबाईल कंपन्या अनेक ॲप सुरुवातीपासूनच देतात. अनेक ॲप आपण आवर्जून चेक करतो, मात्र ज्या ॲपची चर्चा आपण इथे करणार आहोत त्याकडे बहुतेक वेळी सहज दुर्लक्ष होतं. एक अत्यंत बहुगुणी असं ॲप आहे जे आपल्याला स्वतःचा वेळ आणि स्वतःची दिवसभराची कामं मॅनेज करायला उपयुक्त ठरू शकते. खर्च आणि गुंतवणुकीच्या सवयींमध्ये नियमितता आणण्यासाठीही हे ॲप वापरता येते. हे ॲप आहे - कॅलेंडर (calendar app). अनेक कंपन्यांनी कॅलेंडरची ॲप आणली आहेत. त्यांच्यातील फीचर मात्र थोडीफार वेगवेगळी असू शकतात.
स्मार्टफोन येण्याच्या कितीतरी आधीपासून घरोघरी भिंतीवर कॅलेंडर हे तारीख, वार, पंचांग इत्यादी दाखवतं. मात्र स्मार्टफोनमधली कॅलेंडर ॲप हे केवळ तारीख आणि वारच दाखवतात असं नाही तर खूप वेगवेगळ्या प्रकारे आपण त्यांचा उपयोग करू शकतो. आपल्या फायनान्शिअल प्लॅनिंगसह (financial planning) रोजच्या लाईफच्या प्लॅनिंगसाठी त्यांचा वापर करता येतो.
ॲपचे तीन महत्त्वाचे उपयोग
वेळेचे प्लॅनिंग (Day planning) – दिवसाचे नियोजन आपण आधीच करू शकतो. त्यात प्रत्येक तास मिनिट असो किंवा ढोबळमानाने काही तास असोत. आपल्याला दिवसातील मोठा काळ घेणाऱ्या प्रत्येक गोष्टीची नोंद ठेवता येते. आवश्यक कामांव्यतिरिक्त उरणाऱ्या वेळेचा अंदाज आपल्याला येतो आणि तिचा सदुपयोग करता येतो.
टास्क (Tasks) – हाती घेतलेलं अवघड काम, त्याला लागणारा वेळ आणि त्यासंबंधी आठवण करून देण्याचे काम कॅलेंडर ॲप करू शकतं. नियोजन सुलभ होतं.
रिमाईंडर (Reminders) – फोन, विजेची बिले, गुंतवणुकीचे प्लॅनिंग (investment planning), क्रेडिट कार्डची रक्कमा भरणं असो की महत्वाच्या पेमेंटचं कारण असो, रिमाइंडर लावून ठेवण्याने वेळेवर आर्थिक गोष्टी पूर्ण करता येतात. लेट फी वाचवण्यासारख्या गोष्टींसाठी हे अत्यंत उपयुक्त ठरतं.
कॅलेंडर ॲप वापरण्याचे फायदे
तुम्ही दिवसात कोणत्याही वेळी, कोठेही असा, एखादी अपॉइंटमेंट ठरली तर त्याच क्षणी हे ॲप उघडून तुम्ही तिची नोंद करू शकता. त्यामुळे अपॉइंटमेंट चुकत नाही आणि आपली कामे वेळेवर होतात. बहुतांश कॅलेंडर ॲप ही आपल्या अपॉनमेन्ट इत्यादी गोष्टी शेअर करू देतात. त्यामुळे इतरांना ऑफिस मिटिंग इत्यादीची आठवण देण्यासाठीही ही सुविधा वापरता येते. स्वतःची वेगवेगळी कॅलेंडर तयार करण्याची सुविधाही ही अनेक कॅलेंडर ॲप देतात. उदाहरणार्थ - स्वतःचा फिटनेस आणि इतर छंदांसाठी स्वतंत्र कॅलेंडर तयार करून ते आपले कुटुंब आणि जवळच्या मित्रांशी शेअर करता येतं किंवा ऑफिसच्या कामाचं वेगळे कॅलेंडर करून ते केवळ सहकाऱ्यांशी शेअर करता येतं. थोड्याशा काळजीपूर्वक उपयोगाने आपली माहिती केवळ संबंधित लोकांपर्यंतच पोहोचेल हे सुनिश्चित करता येतं.
वेगवेगळ्या देशात कामकाज चालत असेल तर मल्टिनॅशनल कार्यालयातील कर्मचाऱ्यांना अनेक देशांतील स्थानिक सुट्ट्यांचे, कार्यालयीन वेळांचे कॅलेंडरही आपल्या ॲपमध्ये ठेवता येतं. त्यामुळे इतर ठिकाणांच्या सुट्यांचे दिवस आणि कामकाजाच्या वेळा आपल्यासमोर राहतात. वेळेत योग्य निर्णय घेणं, सर्व प्रकारचा अपव्यय टाळणं शक्य होतं.
कॅलेंडर ॲप कसा वापरायचा
कॅलेंडरचा उपयोग करताना ते नियमित पाहण्याच्या सवयी लावून घ्यायला हव्यात. दिवसातील ठराविक वेळी कॅलेंडर चेक करणं ही चांगली सवय आहे. अनेकजण संध्याकाळी दुसऱ्या दिवसाच्या अपॉइंटमेंट चेक करतात. सकाळीही कॅलेंडर पाहून स्वतःच्या दिवसाचं नियोजन करतात. आपला बराचसा वेळदेखील त्यामुळे वाचवू शकतो. ईमेलमध्येही नोंद करून ठेवण्याची सुविधा आहे. प्रत्येकवेळी ईमेल वा अन्य ठिकाणी न जाता मोबाईल ॲपमधील कॅलेंडरवर नोंद असलेली, त्या तारखेची संभाव्य घडामोड दिसू शकते. मोबाईल कॅलेंडरमध्ये एरवीसह अन्य सुट्यांची नोंदही असल्याने नियोजनाचा अंदाज येतो.
हातातल्या कॅलेंडरचा असा प्रभावीपणे आपण वापर करू शकतो. याचा फायदा तुम्हाला तुमच्या रोजच्या जगण्यात होऊ शकतो.