FD Interest Rate Hike: आरबीआयने रेपो दरामध्ये वाढ न करण्याचा निर्णय घेतल्यानंतर अनेक बँकांनी आपल्या मुदत ठेवींच्या व्याजदरात वाढ केली. युनिटी स्मॉल फायनान्स बँकेने तर एक स्पेशल एफडी स्कीम आणली आहे. या स्कीम अंतर्गत ग्राहक 701 दिवसांसाठी पैसे एफडीमध्ये ठेवू शकतात. यावर ज्येष्ठ नागरिकांना 9.45 टक्के तर सर्वसामान्य ग्राहकांना 8.98 टक्के व्याज दिले जात आहे.
युनिटी स्मॉल बँक फायनान्स बँकेच्या (Unity Small Finance Bank Limited-Unity Bank) मुदत ठेवींच्या अजून काही विशेष योजना आहेत. या योजनांतर्गत बँक ग्राहकांना स्पेशल रेट ऑफर करत आहे. 1001 दिवसांसाठी म्हणजे जवळपास पावणे तीन वर्षांच्या मुदत ठेवींवर बँक ज्येष्ठ नागरिकांना 9.50 टक्के व्याज देत आहे. तर सर्वसामान्य नागरिकांना 9 टक्के व्याजदर देत आहे. बँकेने 9 ऑक्टोबरपासून हे नवीन दर लागू केले आहेत.
या व्यतिरिक्त बँकेने 181 ते 201 दिवस आणि 501 दिवसांच्या एफडीसाठी स्पेशल इंटरेस्ट रेट (व्याजदर) जाहीर केला आहे. बँका या कालावधीसाठी ज्येष्ठ नागरिकांना 9.25 टक्के आणि सर्वसामान्य नागरिकांना 8.75 टक्के व्याज देत आहे. युनिटी बँक ही शेड्युल्ड व्यावसायिक बँक आहे. ही सेंट्रम फायनान्शिअल सर्व्हिसेस लिमिटेड आणि रेसिलाईंट इनोव्हेशन्स प्रायव्हेट लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने चालवली जात आहे.
बचत खात्यावर 7 टक्के व्याज
मुदत ठेवींबरोबरच बँकेने बचत खात्यांवरही आकर्षक व्याजदर जाहीर केले आहेत. ज्यामध्ये 1 लाखापेक्षा जास्तीच्या रकमेवर बँक 7 टक्क्यापर्यंत व्याज देत आहे. तर बचत खात्यात 1 लाखापर्यंत रक्कम असेल त्यावर 6 टक्के व्याज दिले जात आहे.