Mutual Fund Investment: म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करणारे गुंतवणूकदार हे साधारणपणे इक्विटी स्कीम्समध्ये गुंतवणूक करण्यास प्राधान्य देतात. यातही त्यांचा गुंतवणुकीचा कालावधी हा कमीतकमी 5 वर्षांचा ठरलेला असतो. पण हा 5 वर्षांचा कालावधी खरंच कमी आहे का? काही जणांसाठी हा खूप मोठाही ठरू शकतो. पण इक्विटी म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्यासाठी हा कालावधी नक्कीच कमी असू शकतो.
आज आपण म्युच्युअल फंडमधील अशा काही स्कीम्सबद्दल जाणून घेणार आहोत. ज्या स्कीमने/योजनांनी गुंतवणूकदारांना मागील 5 वर्षांत तब्बल दुप्पट परतावा दिला आहे. याचबरोबर आपण हे सुद्धा आकडेवारीमधून तपासणार आहोत की, खरंच इक्विटीमधील गुंतवणूक 5 वर्षात दुप्पट होऊ शकते का?
या स्किमने दिला 5 वर्षात दुप्पट परतावा
म्युच्युअल फंडमधील वेगवेगळ्या स्कीम्समधून 38 योजनांनी 5 वर्षांत दुप्पट परतावा दिल्याचे दिसून आले आहे. यामध्ये स्मॉल कॅप, ईएलएसएस, लार्ज ॲण्ड मिड कॅप, फ्लेक्सी कॅप, फोकस फंड, मिड कॅप, कॉन्ट्रा फंड, मल्टी कॅप फंड असे वेगवेगळ्या प्रकारच्या स्कीमचा समावेश आहे. यामध्ये लार्ज कॅप फंडने मात्र गुंतवणूकदारांना दुप्पट परतावा दिला नसल्याचे दिसून आले. यासाठी अभ्यासासाठी रेग्युलर आणि ग्रोथ या दोन पर्यायांचा विचार करून त्यातील लार्ज कॅप, मिड कॅप, लार्ज ॲण्ड मिड कॅप, फ्लेक्सी कॅप, फोकस फंड, स्मॉल कॅप फंड, ईएलएसएस आणि मल्टी कॅप स्कीमचे निरीक्षण केले. हा अभ्यास इकॉनॉमिक टाईम्सने केला आहे.
मिड कॅप फंडाची चांगली कामगिरी
म्युच्युअल फंडच्या वेगवेगळ्या प्रकारच्या योजनांची आकडेवारी तपासल्या नंतर असे दिसून आले की, एकूण 12 मिड कॅप फंडांनी 5 वर्षांत गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट करून दिले. त्यानंतर 10 स्मॉल कॅप फंड, 4 फ्लेक्सी कॅप फंड, 3 मल्टी कॅप फंड, 3 ईएलएसएस फंड, 3 लार्ज ॲण्ड मिड कॅप फंड आणि फोकस, व्हॅल्यू व कॉन्ट्रा यामधील प्रत्येक एका स्कीमने गुंतवणूकदारांना 5 वर्षात दुप्पट परतावा दिला आहे.
क्वांन्ट ॲक्टीव्ह स्मॉल कॅप फंडने दिला तिप्पट परतावा!
क्वांन्ट ॲक्टीव्ह या स्मॉल कॅप फंडने CAGR (Compunded Annual Growth Rate-CAGR)च्या परताव्यानुसार सर्वाधिक 25.68 टक्के परतावा दिला आहे. या परताव्याने गुंतवणूकदारांच्या रकमेत तिप्पट वाढ झाल्याचे दिसून आले आहे. CAGR म्हणजे चक्रवाढ पद्धतीने वार्षिक वाढणारा दर. जर एखाद्या गुंतवणूकदाराने जून 2018 मध्ये या स्कीममध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते तर, आज म्हणजे जून 2023 मध्ये त्याची व्हॅल्यू (मूल्य) 3.13 लाख रुपये असती.
अशाप्रकारे क्वांटच्या टॅक्स प्लॅन स्कीमने 22.46 टक्के परतावा देत दुसरा क्रमांक तर ॲक्सिस स्मॉल कॅप फंडने 21.21 टक्के रिटर्न देत या यादीत तिसरा क्रमांक मिळवला आहे. सर्वांत खाली एचडीएफसी फ्लेक्सी कॅफ फंडने मागील 5 वर्षात 14.93 टक्के रिटर्न दिले आहेत.
Source: www.economictimes.com
(डिसक्लेमर : म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी सेबी अधिकृत आर्थिक सल्लागारांचा सल्ला घ्यावा. या बातमीद्वारे वाचकांना फक्त माहिती दिली जात आहे. 'महामनी' म्युच्युअल फंड खरेदी-विक्रीचा सल्ला देत नाही.)