राष्ट्रीय आरोग्य विमा योजना हा केंद्र सरकारने सुरू केलेला आरोग्य विमा कार्यक्रम आहे. या कार्यक्रमांतर्गात सरकारने गरीब आणि निराधार व्यक्तींना आरोग्य विमा उपलब्ध करून देण्यासाठी काही आरोग्य विमा योजना सुरू केल्या आहेत. यात राष्ट्रीय स्वास्थ्य विमा योजना, केंद्र सरकारची आरोग्य योजना, रोजगार राज्य विमा योजना, सार्वत्रिक आरोग्य विमा योजना, आम आदमी विमा योजना आणि जनश्री विमा योजना आदींचा समावेश आहे.
राष्ट्रीय स्वास्थ्य विमा योजना (Rashtriya Swasthiya Bima Yojana)
दारिद्र्य रेषेखालील नागरिकांसाठी केंद्र सरकारने राष्ट्रीय स्वास्थ्य विमा योजना (RSBY) सुरू केली आहे. अतिशय गरीब असलेल्या लोकांना चांगल्या आरोग्य सेवा मिळाव्यात असा या योजनेचा उद्देश आहे. या योजनेअंतर्गत रुग्णालयात दाखल झालेल्या व्यक्तीला उपचारासाठी 30 हजार रुपये मिळतात. एका कुटुंबात पाच व्यक्ती असतील तर त्या पाचही व्यक्तींना या योजनेचा लाभ घेता येतो. या पाच जणांमध्ये ती व्यक्ती, त्याच्यावर अवलंबून असलेले तीन लोक आणि पत्नी यांचा समावेश असतो. अवघ्या 30 रूपयांत नावनोंदणी करून दारिद्र्यरेषेखालील कुटुंबियांना या योजने अंतर्गत आरोग्य विमा मिळतो.
राष्ट्रीय स्वास्थ्य विमा योजनेचे फायदे
गरिबातील गरीब व्यक्तीला राष्ट्रीय स्वास्थ्य विमा योजनेमुळे (RSBY) आरोग्य सेवेचा लाभ घेता येतो. तसेच एखादा आजार झाल्यानंतर तुम्हाला सरकारी रुग्णालयात दाखल व्हायचे आहे की खाजगी रुग्णालयात दाखल व्हायचे याचा निर्णय तुम्ही घेऊ शकता. तुमच्यावर रुग्णालयाकडून उपचारासाठी करण्यात आलेला खर्च त्यांना राष्ट्रीय स्वास्थ्य विमा योजनेद्वारे मिळतो. या विम्याचा हप्ता सरकारद्वारे (केंद्र सरकार 75 टक्के आणि राज्य सरकार 25 टक्के) भरला जातो. लाभार्थ्याची ओळख व विमा सेवा देताना सुलभता यावी, यासाठी आरोग्य स्मार्ट कार्ड वितरीत करण्यात आली आहेत
उपचार घेताना काही पैसे भरावे लागतात का?
RSBY शी संलग्न असणाऱ्या कोणत्याही रुग्णालयात राष्ट्रीय स्वास्थ्य विमा घेतलेल्या व्यक्तीला कोणतेही पैसे न देता उपचार घेता येतात. केवळ रुग्णालयात दाखल करताना त्या व्यक्तीसोबत योजनेचे स्मार्ट कार्ड असणे गरजेचे असते. या स्मार्ट कार्डमध्ये व्यक्तीचा फोटो आणि त्याच्या बोटांचे ठसे असतात. याद्वारे व्यक्तीची ओळख पटवली जाते. त्यामुळे रुग्णालयात दाखल झाल्यावर कोणतेही पैसे भरण्याचे टेन्शन त्यांना राहात नाही. या योजनेंतर्गत भारतातील कोणत्याही रुग्णालयात उपचार करून घेता येतात.
कामगार राज्य विमा योजना (Employment State Insurance Scheme) ESIS
कामगार राज्य विमा कायदा, 1948 अनुसार, कामगार व त्यांच्या कुटुंबियांच्या आरोग्य रक्षणासाठी केंद्रीय श्रम व रोजगार मंत्रालय विभागातर्फे कामगार राज्य विमा योजना राबविली जाते. या योजने अंतर्गत कामगारांना आजारपण, प्रसूती, काम करत असताना अपंगत्व किंवा मृत्यू आल्यास रोख स्वरूपात मदत दिली जाते. तसेच कौशल्य विकास प्रशिक्षण, राजीव गांधी श्रमिक कल्याण योजना, व्यावसायिक पुनर्वसन आणि अटल विमाधारक कल्याण योजने अंतर्गत मिळणारे फायदे या कामगारांना दिले जातात. 10 किंवा त्यापेक्षा जास्त कामगार असलेल्या कारखाने व आस्थापनांना ही योजना लागू करणे बंधनकारक आहे. प्रत्येक महिन्याला 21 हजार रुपयांपर्यंत वेतन मिळवणारे कर्मचारी या योजनेचा लाभ घेण्यास पात्र आहेत.
केंद्र सरकारच्या आरोग्य योजना (Central Government Health Scheme)
केंद्र सरकारच्या आरोग्य योजनेद्वारे केंद्रीय कर्मचाऱ्यांना सर्वसमावेशक आरोग्य सेवा पुरवली जाते. यात सध्याचे कार्यरत कर्मचाऱ्यांबरोबरच, वेगवेगळ्या प्रदेशात राहणाऱ्या पेन्शनधारकांचा समावेश होतो. केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी 1954 मध्ये या योजनेची सुरुवात केली होती. या योजनेद्वारे केंद्रीय कर्मचाऱ्यांना दवाखाना, रुग्णालयात दाखल झाल्यानंतरचे बिल, रुग्णालयातील विशेष तज्ज्ञ डॉक्टरांकडून सल्ला, इसीजी, एक्स-रे, रक्त तपासणी याबरोबरच औषधं दिली जातात.
आम आदमी विमा योजना (Aam Aadmi Bima Yojana)
ग्रामीण भागात राहाणाऱ्या, ज्यांच्याकडे घर-शेतजमीन नाही अशा व्यक्तींना विम्याचे संरक्षण देणारी ही योजना आहे. 2 ऑक्टोबर 2007 पासून ही योजना सुरू करण्यात आली. 18 ते 59 वयोगटातील भूमिहीन कुटुंबातील रोजगार करणारा कुटुंबप्रमुख किंवा त्या कुटुंबातील कमावती व्यक्ती या योजनेचा लाभ घेऊ शकते.
आम आदमी विमा योजनेचे फायदे
विम्याच्या अंतिम मुदतीपूर्वी सदस्याचा नैसर्गिक मृत्यू झाल्यास कुटुंबाला 30 हजारापर्यंत रक्कम मिळते. तसेच अपघाती निधन झाल्यास कुटुंबाला 75 हजार रुपये मिळतात किंवा अपघातामुळे कायमचे अंपगत्व किंवा दोन्ही डोळे व दोन्ही पाय निकामी झाल्यास भरपाई म्हणून 37,500 रूपये इतकी रक्कम मिळते.
सार्वत्रिक आरोग्य विमा योजना (Universal Health Insurance Scheme)
या योजने अंतर्गत गरीब कुटुंबातील कोणतीही व्यक्ती रुग्णायलात दाखल झाल्यास त्याच्यावर 30 हजारापर्यंतचे उपचार मोफत केले जातात. या योजने अंतर्गत विमा उतरवलेल्या व्यक्तीचे अपघाती निधन झाल्यास त्याच्या कुटुंबाला 25 हजार रुपये दिले जातात आणि अपघातात त्याची नोकरी गेल्यास सदर व्यक्तीला भरपाई म्हणून प्रत्येक दिवसाला 50 रुपये देण्याची सुविधा आहे. या योजने अंतर्गत प्रत्येक व्यक्तीसाठी 200 रूपये, घरात पाच व्यक्तींसाठी 300 रूपये आणि सात व्यक्तींसाठी 400 रुपये प्रीमियम आकारला जातो.
जनश्री विमा योजना (Janashree Bima Yojana)
दारिद्र्य रेषेखालील असंघटित कामगारांसाठी भारतीय आयुर्विमा महामंडळातर्फे जनश्री विमा योजना राबवली जाते. ही योजना 18 ते 60 वयोगटातील दारिद्रय रेषेखालील व्यक्तींसाठी व दारिद्रय रेषेच्या किंचीत वर असणाऱ्या व्यक्तींसाठी आहे. यासाठी वार्षिक प्रिमीयम 200 रूपये आकारला जात असून त्यापैकी केंद्र सरकारच्या सामाजिक सुरक्षितता निधीमधून 100 रूपये, राज्य सरकारकडून 50 रूपये आणि लाभार्थ्याकडून 50 रूपये घेतले जातात.
जनश्री विमा योजनेचे फायदे
जनश्री विमा धारकाचा नैसर्गिक मृत्यु ओढवल्यास त्याच्या वारसदारास 30 हजार रूपये आणि अपघाती मृत्यु झाल्यास 75 हजार रूपये दिले जातात. अपघातामुळे कायमस्वरुपी अपंगत्व आल्यास 75 हजार रूपये आणि अंशत: अपंगत्व आल्यास 37 हजार 500 रूपये दिले जातात.
आयुष्यमान भारत
आयुष्यमान भारत योजने अंतर्गत देशातील व शहरांतील गरीब कुटुंबियांचा आरोग्य विमा काढला जातो. या मुख्य योजने अंतर्गत केंद्र सरकार राष्ट्रीय आरोग्य संरक्षण योजना आणि कल्याण केंद्र या योजनेद्वारे देशातील सर्व गरीब कुटुंबांना पाच लाख रुपयांपर्यंतचा आरोग्य विमा प्रदान करते. या योजनेस पात्र असणारी कोणतीही गरीब व्यक्ती खाजगी किंवा शासकीय रुग्णालयात 5 लाखांपर्यंत मोफत उपचार करून घेऊ शकते.
वर नमूद केलेल्या सर्व राष्ट्रीय आरोग्य विमा योजना या दारिद्रय रेषेखालील कुटुंबांना सर्वोत्तम वैद्यकीय सेवा पुरवण्यासाठी तयार करण्यात आल्या आहेत.
 
     
     
                 
                                             
                                             
                                             
                                             
                                            