सध्या आपण जी आधुनिक जीवनशैली स्वीकारली आहे; ती स्वीकारल्यानंतर आपल्या सर्वांसाठी आरोग्य विमा घेणे अत्यावश्यक बनले आहे. अनेक धोके लक्षात घेऊनही आपण जी लाईफस्टाईल जगत आहोत, ती जगत असताना अचानक अपंगत्व आले आणि त्यामुळे तुम्हाला तुमची नोकरी सोडावी लागली तर तुम्हाला मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागू शकते. अशावेळी सर्व आरोग्य विमा तुमच्या मदतीला येऊ शकत नाहीत. म्हणजेच एकाच विम्यामध्ये सर्व प्रकारच्या घटना कव्हर होऊ शकत नाहीत. अशावेळी तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या अपंगत्व विम्याची निवड करू शकता.
अपंगत्व विमा म्हणजे काय?
अपंगत्व विमा म्हणजे, एखाद्या अपघातामुळे कोणत्याही प्रकारचे अपंगत्व आल्यास त्यापासून तुम्हाला आर्थिक संरक्षण मिळते. जसे की, तुम्ही अपंगत्व विमाची निवड केली आहे आणि एका दुर्घटनेत तुम्हाला अपंगत्व आल्यास तुम्हाला विम्याची रक्कम, त्यासोबत तुमच्या उपचारांवर होणारा वैद्यकीय खर्च हा तुम्हाला विम्यामधून मिळेल. तसेच तुम्ही कोणत्या प्रकारचा विमा खरेदी करता यावर त्याचे इतर फायदे अवलंबून आहेत. तर आपण आता अपंग विम्याचे विविध प्रकार पाहू.
अपंगत्व विम्याचे प्रकार
अपंगत्व विमा निवडताना आपल्या गरजा आणि धोके लक्षात घेऊन त्यानुसार कव्हर (भरपाई) देणारा विमा निवडणे योग्य असते. कारण बाजारात अनेक प्रकारचे विमा उपलब्ध आहेत. एकाच विम्यामध्ये सर्व बाबी कव्हर असण्याची शक्यताही कमी असते. त्यामुळे आपले धोके आणि भविष्यातील आर्थिक गरजा जो प्रकार पूर्ण करेल तो समजून घेऊन विम्याचा प्रकार निवडणे फायदेशीर ठरू शकते. अपंगत्व विम्याचे दोन प्रकार आहेत.
अल्पकालीन अपंगत्व विमा : अल्पकालीन अपंगत्व विमा वेटिंग पीरिअडसह मिळतो. त्याचा कालावधी शून्य ते चौदा दिवसांदरम्यानचा असतो. अल्पकालीन अपंगत्व विम्यावर मिळणारे फायदे जास्तीत जास्त दोन वर्षांसाठी लागू असतात. अल्पकालीन अपंगत्व विम्याअंतर्गत, जन्मापासूनच झालेल्या जखमा किंवा अपघातामुळे किंवा आजारामुळे आलेल्या जखमा कव्हर आहेत.
दीर्घकालीन अपंगत्व विमा : दीर्घकालीन अपंगत्व विम्याने आजीवन कव्हरेज मिळते. बरेचजण या प्रकाराची निवड करतात. कारण या विम्यात तुमच्या दुखापती आणि मानसिक आजार, हृदय व रक्तवाहिन्यांसंदर्भातील आजार, कर्करोग आणि इतर तत्सम गंभीर आजारांचा समावेश तर आहेच. पण त्याचबरोबर तुम्हाला गंभीर दुखापत झाली आणि नोकरी सोडावी लागली तर तुमचे आर्थिक नुकसान यातून भरून निघण्याची तरतूद आहे. याचा वेटिंग पीरिअड काही आठवड्यांपासून महिन्यापर्यंत असू शकतो.
अपंगत्व विम्यासाठी कोण पात्र आहे?
अपंगत्व विमा काढण्याचे किमान वय 18 वर्षे आणि कमाल 70 वर्ष आहे. विमा कंपनींच्या पॉलिसीनुसार विमा कव्हरमध्ये व नियमांमध्ये थोडेफार बदल असू शकतात.
पॉलिसीमधून वगळण्यात आलेल्या गोष्टी
अपंगत्व पॉलिसीमधून पूर्वीचा जुना आजार वगळण्यात आला आहे. तसेच पॉलिसीधारकाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्यास, युद्धात किंवा तुरूंगात शिक्षा भोगत असताना आलेले अपगंत्व या पॉलिसीमध्ये कव्हर होत नाही.
विमा सेटलमेंट प्रक्रिया
अपंगत्व विम्याचा लाभ घेण्यासाठी विमाधारकाच्या कुटुंबियांनी त्वरित दावा दाखल करणे आवश्यक आहे. दावा दाखल करताना अर्जासोबत हॉस्पिटलचे अंतिम बिल, डिस्चार्ज कार्ड, तसेच आवश्यक कागदपत्रे सादर करणे आवश्यक असते. प्रत्येक विमा कंपनीचा दावे निकाली काढण्याचा कालावधी वेगवेगळा असू शकतो. अपघातानंतर 7 ते 30 दिवसांच्या आत नुकसान भरपाईची रक्कम मिळते.