कंपन्यांनी लाभांश जाहीर केल्यानंतर भागधारकांना मात्र या लाभांशातून मोठी कमाई होते. किर्लोस्कर इंडस्ट्रीज (Kirloskar Ind), जगसनपाल फार्मा (Jagsonpal Pharma) आणि पॉलीप्लेक्स कॉर्पोरेशन (Polyplex Corporation) या तीन कंपन्यांनी आपल्या गुंतवणूकदारांसाठी 110 टक्क्यांपर्यंत लाभांश जाहीर केलाय. यापैकी 2 समभागांमध्ये गेल्या वर्षभरात गुंतवणूकदारांना (Investors) तब्बल 100 टक्क्यांपर्यंत परतावा मिळालाय. झी बिझनेसनं याविषयीचं वृत्त दिलंय. या तिन्ही कंपन्यांचे शेअर आणि लाभांश याविषयी थोडक्यात माहिती घेऊ...
Table of contents [Show]
किर्लोस्कर इंडस्ट्रीज
कॅपिटल गुड्स सेक्टरमधली ही एक कंपनी आहे. या किर्लोस्कर इंडस्ट्रीजनं गुंतवणूकदारांना प्रति इक्विटी शेअर 11 रुपये डिव्हिडंड म्हणजेच लाभांश देण्याची घोषणा केलीय. कंपनीच्या स्टॉकची फेस व्हॅल्यू 10 रुपये आहे. अशाप्रकारे गुंतवणूकदारांना लाभांशाच्या माध्यमातून 110 टक्के उत्पन्न मिळणार आहे. गेल्या वर्षभरात या समभागानं 100 टक्के परतावा दिलाय.
एकूण नफा वाढला
बाजाराला दिलेल्या माहितीत किर्लोस्कर इंडस्ट्रीजनं सांगितलं, की मार्च 2023च्या तिमाहीत कंपनीचा एकूण नफा 44 कोटी रुपये होता. तर मागच्या वर्षीच्या मार्चच्या तिमाहीत तो 12 लाख रुपये इतका होता. मार्चच्या तिमाहीत कंपनीचं एकूण उत्पन्न 1575 कोटी रुपये होतं. मागच्या वर्षीच्या मार्च तिमाहीत ते 1037 कोटी रुपये इतकं होतं. एबिट्डातही (EBITDA) वाढ झाली आहे. ती 105 कोटींवरून 222 कोटींवर गेल्याचं सांगण्यात आलंय.
जगसनपाल फार्मास
औषधनिर्माण क्षेत्रातली ही एक महत्त्वाची कंपनी आहे. जगसनपाल फार्मानं आपल्या गुंतवणूकदारांना प्रति इक्विटी शेअर 5 रुपये लाभांश देण्याची घोषणा केलीय. कंपनीच्या शेअरचं दर्शनी मूल्य 5 रुपये आहे. अशाप्रकारे गुंतवणूकदारांना लाभांशातून 100 टक्के उत्पन्न मिळणार आहे. मागच्या वर्षभराच्या कालावधीत या समभागानं 15 टक्के इतका परतावा दिलाय.
जगसनपाल फार्माचा नफा
जगसनपाल फार्मानं याबाबत माहिती दिली. मार्च 2023च्या तिमाहीत कंपनीचा एकूण नफा 5.6 कोटी रुपये इतका होता. मागच्या वर्षीच्या याच कालावधीत तो 31 लाख रुपये होता. मार्चच्या तिमाहीत कंपनीचं एकूण उत्पन्न 55.4 कोटी रुपये होतं. मागच्या वर्षीच्या मार्चच्या तिमाहीत ते 51.2 कोटी रुपये होतं. एबिट्डातही (EBITDA) वाढ नोंदवण्यात आली. ती 70 लाखांवरून 5.4 कोटी रुपयांपर्यंत वाढल्याचं सांगण्यात आलंय.
पॉलीप्लेक्स कॉर्पोरेशन
पॅकेजिंग क्षेत्रातली ही एक कंपनी आहे. पॉलीप्लेक्स कॉर्पोरेशननं गुंतवणूकदारांना प्रति इक्विटी शेअर 3 रुपये लाभांश जाहीर केलाय. कंपनीच्या शेअरचं दर्शनी मूल्य 10 रुपये आहे. अशा प्रकारे गुंतवणूकदारांना 30 टक्के लाभांशातून उत्पन्न मिळणार आहे. मात्र मागच्या वर्षभरात या समभागानं 32 टक्के नकारात्मक परतावा दिलाय.
पॉलीप्लेक्स कॉर्पोरेशनचा नफा
पॉलीप्लेक्स कॉर्पोरेशननं मार्केटला दिलेल्या माहितीत सांगितलं, की मार्च 2023च्या तिमाहीत कंपनीचा एकूण नफा 7.61 कोटी रुपये होता. मागच्या वर्षीच्या मार्च तिमाहीत तो 185.78 कोटी रुपये होता. मार्चच्या तिमाहीत कंपनीचं एकूण उत्पन्न 1667.07 कोटी रुपये इतकं होतं. मागच्या वर्षी मार्च तिमाहीत ते 1885.87 कोटी रुपये होतं. एबिट्डा (EBITDA) 55.37 कोटी रुपये होता. मागच्या वर्षी मार्च तिमाहीत तो 379.03 कोटी रुपये होता.
(डिसक्लेमर : शेअर बाजार/म्युच्युअल फंड SIPमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी सेबी अधिकृत आर्थिक सल्लागारांचा सल्ला घ्यावा. या बातमीद्वारे वाचकांना फक्त माहिती दिली जात आहे. 'महामनी' शेअर्स आणि म्युच्युअल फंड खरेदी-विक्रीचा सल्ला देत नाही.)