भारतात अनेकांश भागात पावसाने दडी मारली आहे. देशातील बऱ्याच राज्यांमध्ये यावर्षी ऑगस्ट महिना कोरडाच गेला आहे. शेतीप्रधान भारताला हे परवडणारे नाही. याचे कारण म्हणजे पाऊस नसल्याने अनेक भागांमध्ये पेरण्या झाल्या नाहीत, जिथे पेरण्या झाल्या तिथे दुबार पेरणी करण्याची वेळ आली आहे. याचा थेट परिणाम गेल्या काही दिवसांपासून भारतीय अर्थव्यवस्थेवर होताना पाहायला मिळाला आहे. किरकोळ महागाईच्या दरात वाढ नोंदवली गेली असून, अन्नधान्यांच्या किमती देखील वाढल्या आहेत. कडधान्ये,गहू, तांदूळ, हिरव्या पालेभाज्या महागल्या आहेत. वाढती महागाई नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकार त्यांच्या पातळीवर उपाययोजना करण्याच्या प्रयत्नात आहे.
सध्या ही परिस्थिती असली तरी, सप्टेंबर महिन्यात वरुणराजाची कृपा होण्याची चिन्हे आहेत. ऑगस्टमध्ये पावसाने दडी मारली असली तरी, सप्टेंबर महिन्यात समाधानकारक पाऊस पडेल आणि पिकांना जीवदान मिळेल असा अंदाज अभ्यासकांनी वर्तवला आहे.
सोयाबीन आणि तांदूळ उत्पादन समाधानकारक
मागील महिन्यात शेतकऱ्यांना कमी कालावधीत उत्पन्न देणारे तांदुळाचे वाण शेतकऱ्यांनी वापरावे असा सल्ला ICAR म्हणजेच राष्ट्रीय तांदूळ संशोधन संस्थेने शेतकऱ्यांना दिला होता. तसेच यावर्षी तांदळाचे 5% उत्पादन कमी निघेल असा अंदाज देखील वर्तवला होता. शेतकऱ्यांनी देखील या सूचनेकडे गांभीर्याने लक्ष दिले असून तांदळाच्या उत्पादनात फारशी घट होणार नाही अशी अपेक्षा वर्तवली जात आहे. सरकारी आकडेवारीनुसार 8 सप्टेंबरपर्यंत भातपिकाखालील पेरणी क्षेत्र वार्षिक 2.7 टक्क्यांनी वाढून 40.3 दशलक्ष हेक्टरवर पोहोचले आहे.
याशिवाय सोयाबीनची लागवड देखील यावर्षी समाधानकारक असून त्याचे भाव देखील नियंत्रणात असतील असे जाणकारांचे म्हणणे आहे. सरकारी आकडेवारीनुसार सोयाबीनचे पेरणी क्षेत्र 1.3 टक्क्यांनी वाढून 12.54 दशलक्ष हेक्टरवर पोहोचले आहे.
तांदळाच्या वाढत्या किमती लक्षात घेता मागच्या महिन्यात केंद्र सरकारने बासमती आणि बिगर बासमती तांदळाच्या निर्यातीवर बंदी घातली आहे. देशांतर्गत पुरवठा कमी पडू नये म्हणून सरकारी पातळीवर देखील प्रयत्न सुरु आहेत.