Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Job opportunities: नोकरकपातीचं टेन्शन? आता 'या' क्षेत्रात निर्माण होत आहेत नव्या संधी

Job opportunities: नोकरकपातीचं टेन्शन? आता 'या' क्षेत्रात निर्माण होत आहेत नव्या संधी

Image Source : www.withintent.com

Job opportunities: नोकरकपातीच्या या दिवसांमध्ये काही क्षेत्रात नव्या रोजगाराच्या संधी निर्माण होत आहेत. एकीकडे माहिती तंत्रज्ञान म्हणजेच आयटी क्षेत्रात सर्वात जास्त लेऑफ म्हणजेच नोकरकपात केली जात आहे. तर या क्षेत्राशी संबंधित काही विभागांत रोजगार उपलब्ध होण्याची आशा निर्माण झाली आहे.

जगभरात खासगी क्षेत्रात (Private sector) काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळत आहे. भारतातही अनेकांना आपला रोजगार मागच्या वर्षभराच्या कालावधीत गमवावा लागला. मंदीचं (Recession) कारण यामागे सांगितलं जात आहे. कंपन्या खर्चकपात करण्याच्या उद्देशानं कर्मचाऱ्यांना घरी पाठवत आहेत. अशी एकूण परिस्थिती असताना एका क्षेत्रात मात्र भविष्यात चांगली संधी मिळण्याची शक्यता आहे. सायबर सुरक्षा (Cyber security) हे असं क्षेत्र आहे, ज्याठिकाणच्या गरजा अधिक वाढत चालल्या आहेत. त्यासाठी मनुष्यबळ आवश्यक ठरत आहे. टीव्ही 9नं हे वृत्त दिलं आहे.

आकडेवारीवरून स्पष्ट

डिजिटल इंडियाला गती मिळत आहे. त्यासोबत देशात सायबर सुरक्षा हा महत्त्वाचा मुद्दा ठरत आहे. त्यामुळे या क्षेत्रात नव्या नोकऱ्यादेखील मोठ्या प्रमाणावर निर्माण होत आहेत. मे 2023पर्यंतच्या आकडेवारीवर नजर टाकली असता देशात सायबर सिक्युरिटीमध्ये सुमारे 40,000 नोकऱ्या आहेत. विशेष म्हणजे या पदांसाठीचा पगारदेखील प्रचंड आहे.

टिमलीजचा रिपोर्ट

टीमलीज डिजिटलनं यासंदर्भात एक रिपोर्ट केला आहे. या रिपोर्टनुसार, देशात सायबर सुरक्षा कौशल्यांची मागणी झपाट्यानं वाढत आहे. मात्र या उद्योगासाठी कुशल कामगारांचं अजूनही आव्हान आहे. नोकरीच्या या बाजारपेठेत प्रतिभेचा पुरवठा मागणीच्या तुलनेत जवळपास 30 टक्क्यांनी कमी आहे. त्यामुळे सातत्यानं वाढत जाणाऱ्या या क्षेत्रात काही करण्याची इच्छा असेल तर त्यादृष्टीनं तयारीला लागणं फायद्याचं आहे तसंच वेळीच आपल्यातली कौशल्य ओळखणंही गरजेचं आहे.

80 लाखांपर्यंत पॅकेज

सायबर सिक्युरिटी प्रोफेशनल्सना मार्केटमध्ये चांगलं सॅलरी पॅकेज मिळत आहे. व्हाइस प्रेसिडेंट इन्फॉर्मेशम सिक्युरिटी किंवा मुख्य माहिती सुरक्षा अधिकारी (Chief information security officer) स्तरावर लोकांना 50 लाख ते 80 लाख रुपयांपर्यंतचं पॅकेज ऑफर केलं जातं. यासोबतच 12 वर्षांचा अनुभव असलेल्या आयटी ऑडिटरसाठी (IT Auditor) 30 लाख रुपयांपर्यंतचं पॅकेज मिळत आहे, असं या रिपोर्टमध्ये देण्यात आलं आहे.

फ्रेशर्सनाही चांगलं पॅकेज

ही तर झाली अनुभवी पदांसाठीची पॅकेजची रेंज. नवख्यांनादेखील अत्यंत चांगल्या प्रकारचं पॅकेज ऑफर केलं जातं. या क्षेत्रात फ्रेशर्सना 6 ते 10 लाख रुपये पगार दिला जातो. हा पगार अनुभव वाढण्याबरोबर वाढत जाणारा आहे. समजा, 3 ते 5 वर्षांचा अनुभव असलेल्यांसाठी 15 लाखांपर्यंत आणि 5 ते 8 वर्षांचा अनुभव असलेल्यांसाठी 40 लाखांपर्यंतचं पॅकेज ऑफर केलं जाऊ शकतं.

सातत्यानं वाढ

सायबर सुरक्षा क्षेत्र झपाट्यानं वाढताना दिसत आहे. सतत वाढत जाणारे सायबर हल्ले यामुळे या क्षेत्रात अधिकाधिक संधी निर्माण होत असल्याचं दिसतं. 2023च्या पहिल्या तिमाहीत, भारतीय संस्थांना दर आठवड्याला 2000हून अधिक सायबर हल्ल्यांना सामोरं जावं लागलं आहे. हेच प्रमाण मागच्या वर्षीच्या याच कालावधीपेक्षा 18 टक्के अधिक आहे. त्यामुळे अशा स्थितीत सायबर सिक्युरिटी मार्केट आणखी वाढणार आहे, यात शंकाच नाही. 2027पर्यंत ही बाजारपेठ दरवर्षी 8.05 टक्के दराने 3.5 अब्ज डॉलरपर्यंत वाढू शकते.