क्लिनिक प्लस, लाइफबॉयपासून क्लोज-अप, पेप्सोडेंट आणि अशा अनेक घरगुती उत्पादनांची निर्मिती करणारी कंपनी म्हणजे हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड... एफएमसीजी (Fast moving consumer goods) कंपनी हिंदुस्तान युनिलिव्हरचं नाव भारतातल्या सर्वांनाच परिचित आहे. कंपनीची अनेक उत्पादनं देशातल्या जवळपास सर्वच घरांमध्ये दररोज वापरली जातात. असा भला मोठा विस्तार असलेली ही कंपनी केवळ याच कारणासाठी ओळखली जात नाही. तर इतरही अनेक कारणं आहेत. त्यातलच एक कारण म्हणजे कंपनीतले कर्मचारी. कंपनीतले अनेक कर्मचारी करोडपती आहेत. याविषयी एपीबीनं वृत्त दिलंय.
Table of contents [Show]
वार्षिक अहवालात माहिती
हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेडच्या वार्षिक अहवालानुसार, 2022-23 या आर्थिक वर्षात त्यांच्या लक्षाधीश कर्मचार्यांच्या संख्येत 25 टक्क्यांनी वाढ झाली होती. ती संख्या आता 205 झाली आहे. यापूर्वी 2021-22 या आर्थिक वर्षात ही एकूण संख्या 163 होती. या कर्मचाऱ्यांना एचयूएल करोडपती क्लब असंही म्हटलं जातं. या करोडपती क्लबमध्ये असे कर्मचारी आहेत, ज्यांचं वार्षिक वेतन एक कोटी रुपये किंवा त्याहून अधिक आहे.
अनेक करोडपती 40हून कमी वयाचे
कंपनीच्या वार्षिक अहवालात याविषयी सविस्तर माहिती देण्यात आली आहे. दिलेल्या माहितीनुसार, 1 कोटींहून अधिक पगार मिळवणाऱ्या एकूण कर्मचाऱ्यांपैकी एक तृतीयांश कर्मचारी तरूण असल्याचं समोर आलंय. म्हणजेच या कर्मचाऱ्यांचं वय 40 वर्षांपेक्षा कमी आहे. जवळपास एक दशकापासून सुरू असलेल्या ट्रेंडपेक्षा हे वेगळे आहे कारण आतापर्यंत करोडपती क्लबचे जवळपास निम्मे सदस्य 40 वर्षांपेक्षा कमी वयाचे होते.
...म्हणून म्हणतात सीईओंचा कारखाना
हिंदुस्थान युनिलिव्हर ही एफएमसीजी क्षेत्रातली देशातली एक आघाडीची कंपनी आहे. यामुळेच एकदा का कोणी एक्झिक्युटिव्ह हिंदुस्थान युनिलिव्हरमध्ये काम करेल, त्या अधिकाऱ्याची एफएमसीजी क्षेत्रात आपोआपच मागणी वाढते. अलीकडच्या काळात एफएमसीजी क्षेत्रातले अनेक सीईओ आहेत, ज्यांनी यापूर्वी हिंदुस्थान युनिलिव्हरमध्ये काम केलं आहे. त्यामुळेच हिंदुस्थान युनिलिव्हरला उद्योग जगतात सीईओचा कारखाना असंही म्हटलं जातं.
कोणकोणते टॉप एक्झिक्युटिव्ह?
गोदरेज कन्झ्युमर प्रॉडक्ट्सचे व्यवस्थापकीय संचालक सुधीर सीतापती (Godrej Consumer Products MD Sudhir Sitapati) हे यापूर्वी हिंदुस्तान युनिलिव्हर याठिकाणी फूड्स आणि रिफ्रेशमेंट्सचे कार्यकारी संचालक होते. त्याचबरोबर हिंदुस्तान युनिलिव्हरसोबत 18 वर्षे काम केल्यानंतर, गीतिका मेहता हर्षे इंडियाच्या (Hershey India Head Geetika Mehta) प्रमुख बनल्या. मागच्या वर्षी, कोलगेट पामोलिव्हनं प्रभा नरसिम्हन (Colgate Palmolive India Head Prabha Narasimhan) यांना आपल्या भारतीय युनिटच्या व्यवस्थापकीय संचालक बनवलं. त्या आधी हिंदुस्थान युनिलिव्हरमध्ये कार्यकारी संचालक होत्या. त्यामुळे हा एक प्रकारे एफएमसीजी सेगमेंटमध्ये ट्रेंडच बनत चालला आहे.
हिंदुस्तान युनिलिव्हरविषयी...
हिंदुस्तान युनिलिव्हर ही मूळ इंग्लंडची कंपनी आहे. भारतातलं तिचं मुख्यालय मुंबईत आहे. भारतात तिचा मोठा विस्तार झाला आहे. एका सर्वेक्षणानुसार तीनमधील दोन भारतीय या कंपनीचे प्रॉडक्ट वापरतात. तर कंपनीचा 67 टक्के लाभांश इंग्लंडला जातो. भारतात विविध प्रॉडक्ट्स विकले जात असल्यानं कंपनीला मोठा नफा मिळत असून बहुतांश भाग इंग्लंडमध्ये जातो. याचा थेट फायदा इंग्लंडच्या अर्थव्यवस्थेला होत असल्याचं दिसून येतं.