न्यायमूर्ती डी वाय चंद्रचूड यांनी बुधवारी (दि. 9 नोव्हेंबर) देशाचे 50वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली. डी वाय चंद्रचूड हे या पदावर 10 नोव्हेंबर 2024 पर्यंत राहतील. न्यायमूर्ती चंद्रचूड यांनी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश आणि अलाहाबाद उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणूनही काम पहिले आहे. 2016 मध्ये सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून त्यांची नियुक्ती झाली होती. यापूर्वी न्यायमूर्ती उदय लळीत हे या पदावर कार्यरत होते. त्यांनी 41 दिवस भारताचे सरन्यायाधीश म्हणून काम पाहिले. सरन्यायाधीशांना निवृत्तीनंतर अनेक प्रकारच्या सुविधा सरकारद्वारे मिळतात. या सुविधा कोणकोणत्या प्रकारच्या असतात, ते आपण जाणून घेणार आहोत.
Table of contents [Show]
24 तास सुरक्षा
केंद्र सरकारने भारतीय न्याय व्यवस्थेतील मुख्य न्यायाधीशांना मिळणाऱ्या सुविधेविषयी 23 ऑगस्ट, 2022 ला एक अधिसूचना जारी केली. या अधिसूचनेनुसार, निवृत्त सरन्यायाधीशांना 24 तास सुरक्षा पुरवली जाते. निवृत्तीच्या पुढच्याच दिवशी त्यांना पुढील पाच वर्षापर्यंत पर्सनल सिक्युरिटी गार्ड ठेवता येऊ शकतो. सर्वोच्च न्यायालयाच्या इतर न्यायाधीशांनाही ही सुविधा निवृत्तीनंतर मिळते. मात्र त्यांना ही सुविधा केवळ 3 वर्षासाठी मिळते. या सर्व न्यायाधीशांची सुरक्षा ही उच्च दर्जाची असते.
हे सुद्धा वाचा : भारताच्या सरन्यायाधिशांचा पगार पंतप्रधानांपेक्षा अधिक!
बंगला आणि कर्मचारी मिळतात
सरन्यायाधीश या पदावरून निवृत्त झालेल्या व्यक्तीला दिल्लीमध्ये राहण्यासाठी रेंट फ्री बंगला दिला जातो. हा बंगला टाईप-7 प्रकारचा बंगला असतो. यामध्ये कर्मचाऱ्यांना राहण्यासाठी 3 क्वार्टरही असतात. यामध्ये दोन गॅरेज, लॉन अशा प्रकारच्या सुविधा ही असतात. बंगल्याची देखभाल करण्यासाठी तसेच इतर कामांसाठी सरकारकडून कर्मचारीही दिले जातात. ज्यामध्ये सहायक, कार्यलयीन सहायक आणि चालक यांचा समावेश असतो.
दरमहा 70 हजार रुपये पेन्शन!
सुप्रीम कोर्टातून निवृत्त झाल्यावर सरन्यायाधीशांना दर महिन्याला 70 हजार रुपये पेन्शन मिळते. तर अन्य न्यायाधीशांना 39 हजार रुपये मिळतात. सुप्रीम कोर्टातून दरवर्षी तीन न्यायाधीश निवृत्त होतात. या सुविधांबरोबरच निवृत्त सरन्यायाधीश आणि अन्य न्यायाधीशांना टेलिफोन सुविधाही मोफत मिळते.