Tesla Car: एलॉन मस्क यांच्या मालकीची टेस्ला कंपनी इलेक्ट्रिक कार निर्मितीमध्ये आघाडीवर आहे. टेस्लाच्या गाड्यांचा लूक आणि त्यातील फिचर्स सर्वांना भुरळ पाडतील असे आहेत. गाडीतील ऑटो पायलट फिचर्स तर सर्वाधिक चर्चिले गेले आहे. मात्र, या ऑटो पायलट मोडमधील बिघाडामुळे टेस्ला कंपनीने 3 लाख 63 हजार कार माघारी बोलावल्या आहेत. सॉफ्टवेअरमधील बिघाडामुळे अपघात होण्याचा धोका असल्याचे लक्षात आल्यानंतर कंपनीने हा निर्णय घेतला.
रस्ते सुरक्षा विभागाकडून फिचर्सची तपासणी( US regulatory Tesla car inspection)
अमेरिकेतील वाहतूक आणि रस्ते सुरक्षा विभागानेही याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. टेस्ला कंपनीच्या ऑटो पायलट फिचरची (driver-assistance software) सरकारकडून कठोर तपासणी करण्यात येत आहे. या तपासणीतून काही त्रुटी समोर आल्या आहेत. ज्यामुळे अपघाताची शक्यता वाढते. 2016 ते 2023 दरम्यान विक्री झालेल्या Model S, Model X, Model 3 and Model Y Tesla गाड्या माघारी बोलावण्यात आल्या आहेत.
या गाड्यांमध्ये 'फुल सेल्फ ड्राइव्हिंग' हे फिचर दिले आहे. म्हणजेच विना चालक सॉफ्टवेअरद्वारे गाडी चालवता येते. मात्र, वाहतुकीचे नियम, रस्त्यांची रचना, लेनची शिस्त हे पाळताना गाडीतील सॉफ्टवेअरमध्ये मालफंक्शन (बिघाड) होत असल्याचे समोर आले आहे. अनेक गाडी मालकांनी यासंबंधीचे व्हिडिओही सोशल मीडियावर शेअर केले आहेत. माघारी बोलावलेल्या गाड्यांमध्ये सॉफ्टवेअर अपडेट करून देण्यात येणार आहे. त्यानंतरच या गाड्या पुन्हा रस्त्यांवर धावतील. अमेरिकेतील रस्ते वाहतूक विभागाच्या नियमांनुसार गाड्यांमध्ये बदल करण्यात येणार आहे.
अपघाताची शक्यता?(Tesla car malfunction)
रस्त्यांवरील 'थांबा' या सिग्नलला गाडीकडून अचूक प्रतिसाद दिला जात नाही. बऱ्याच वेळा गाडी स्टॉप साइनच्या पुढे जाऊन थांबते. विना चालक हे फिचर अचूक काम करत नाही. चालकाला मध्येच गाडीचा ताबा घेण्याची गरज पडत असल्याचे समोर आले आहे. सोबतच रस्त्यांवर वाहनांच्या वेग मर्यादेचेही ऑटो पायलट मोडमध्ये पालन होत नसल्याचे निदर्शनास आले.
निर्णयाचा कंपनीच्या शेअर्सवर परिणाम? (Tesla Shares fall back)
टेस्ला कंपनीने साडेतीन लाखांपेक्षा जास्त कार माघारी बोलवण्याचा निर्णय घेतल्यानंतर कंपनीचे शेअर्स 5% घसरले. गुंतवणुकदारांमध्ये टेस्लाच्या या निर्णयामुळे संभ्रम निर्माण झाला. त्यामुळे अनेकांनी कंपनीचे शेअर्स विकून टाकले. गाडीतील किरकोळ सॉफ्टवेअर बिघाडासाठी" recall" हा शब्द वापरण्यात येऊ नये, असे कंपनीचे मालक एलॉन मस्क यांनी ट्विटरवर म्हटले आहे. अमेरिकेच्या वाहतूक विभागाकडून टेस्लाचे ऑटो ड्राइव्हर फिचर्स बारकाईने तपासण्यात येत आहे.