Home Insurance Package Policy Benefits: आपल्यापैकी बहुतेकांसाठी घर ही भावनिक आणि आर्थिकदृष्ट्या मौल्यवान संपत्ती असते. घर हे स्वत: असो किंवा भाड्याने घेतलेलं तिथे आपल्याला आराम आणि आनंदच मिळतो. घर हे आपल्यासाठी एक सुरक्षित ठिकाण असते. अशा घराला 'गृह विमा पॅकेज पॉलिसी' ही सुरक्षा प्रदान करते. दुदैवाने कधी-कधी आग, चोरी आणि आणि नैसर्गिक आपत्तींमुळे आपल्या घरांचे आणि त्यात ठेवलेल्या वस्तूंचे नुकसान होत असते. असे कुठलेही नुकसान झाल्यास मानसिक तसेच आर्थिक समस्या निर्माण होतात. त्यामुळे, आपल्या घराचे कोणत्याही प्रकारच्या नुकसानीपासून संरक्षण करण्यासाठी गृह विमा पॉलिसी अत्यंत महत्त्वाची आहे. आर्थिक सुरक्षितता आणि मनःशांती सुनिश्चित करण्याचा हा एक योग्य मार्ग आहे.
घरमालक हे स्वत: च्या घरासाठी गृह विमा खरेदी करतात, ही एक सामान्य बाब झाली. परंतु आजच्या काळात,भाडेकरूंनी देखील घरातील सामग्रीसह त्यांच्या वस्तू आणि वैयक्तिक वस्तूंचे आर्थिक संरक्षण करण्याचा विचार केला पाहिजे. 'गृह विमा पॅकेज पॉलिसी' मध्ये पॉलिसी कव्हरचे वेगवेगळे प्रकार येतात.
Table of contents [Show]
कोणकोणत्या गोष्टी होतात कव्हर
घरगुती पॅकेज पॉलिसीमध्ये इलेक्ट्रॉनिक गॅझेट्स, गृहोपयोगी उपकरणे, स्वयंपाकघरातील उपकरणे, मौल्यवान वस्तू, विद्युत उपकरणांचे आणि घरातील फर्निचरचे नुकसान, नैसर्गिक आपत्ती, जसे की पूर, भूकंप, चक्रीवादळ, वादळ, घरफोडी, चोरी यामुळे नुकसान झाल्यास विविध प्रकारच्या दायित्वांचा (liabilities) म्हणजेच नुकसान भरपाईचा समावेश असतो.
आग लागल्यास
आजकाल इमारतींना आग लागणे, ही नित्याची बाब झाली आहे. शॉर्ट सर्किटमुळे आणि दुसरीकडे लागलेली आग पसरल्याने हे घडत असते. मोठ्या आगीमुळे इमारतीच्या संरचनेचे आणि नंतर आपल्या घरातील सामग्रीचे प्रचंड नुकसान होऊ शकते,परिणामी तुमचे भावनिक आणि आर्थिक नुकसान होत असते. त्यामुळे, भाडेकरूंकडे विमा पॉलिसी असल्यास, मौल्यवान घरगुती वस्तूंचे नुकसान हे काढलेल्या गृह विम्याद्वारे कव्हर केले जाऊ शकते.
नैसर्गिक आपत्तींपासून संरक्षण
पूर,चक्रीवादळ आणि वादळ यांसारख्या नैसर्गिक आपत्तींमुळे तुमच्या भाड्याच्या घरातील सामग्रीचे नुकसान होण्याची शक्यता असते. जर असे कधी झाले तर, गृह विमा ते आर्थिक नुकसान भरून काढेल आणि खराब झालेल्या वस्तूंच्या दुरुस्ती तसेच बदलीच्या खर्चासाठी तुम्हाला आर्थिक मदत करेल.
याशिवाय, तुम्ही पॉलिसी घेतांना पर्यायी निवासासाठी अॅड-ऑन पर्याय देखील निवडू शकता. तुमच्या भाड्याच्या निवासस्थानाचे काही कारणाने नुकसान झाल्यास, त्या निवासस्थानाची दुरुस्ती होत असताना तुम्हाला तात्पुरते पर्यायी निवासस्थानामध्ये जाऊन राहावे लागेल. अशावेळी अचानक घेतलेल्या पर्यायी निवास स्थानाचे भाडे जास्त असू शकते. परंतु तुम्ही पॉलिसीमध्ये अॅड-ऑन कव्हरचे ऑपशन निवडल्यास, भाड्यातील फरक कव्हर केला जाईल आणि विमा कंपनीद्वारे भरला जाईल.
घरफोड्या आणि चोरींपासून संरक्षण
घरफोड्या सामान्यतः जेव्हा आपण बाहेर असतो तेव्हा होतात,ज्यामुळे चोरांना घरातून काहीही चोरणे सोपे होते आणि यावेळी घरातील सामानांचा देखील उपद्रव होतो. तेव्हा घरफोडीमुळे तसेच चोरीमुळे होणारे नुकसान पॅकेज पॉलिसीमध्ये संपूर्णपणे समाविष्ट केले जाऊ शकते.
वैयक्तिक अपघात
एक भाडेकरू म्हणून तुम्ही दुर्दैवी मृत्यूच्या घटनेत स्वत:सह जोडीदारासाठी वैयक्तिक अपघात कव्हरेज देखील घेऊ शकता.
अनपेक्षित अपघात
पॅकेज पॉलिसी तुम्हाला शारीरिक इजा आणि नैसर्गिक आपत्ती, आग, चोरी आणि घरातील व्यक्तींच्या अनपेक्षित अपघातांमुळे झालेल्या मृत्यूपासून संरक्षण देते. उदाहरणार्थ, तुमची मोलकरीण किंवा तुमच्या घरातील पाहुणे जखमी झाल्यास, तुमच्याकडे हे कव्हर असल्यास तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही.
लक्षात ठेवण्यासारखे काही मुद्दे
- गृह विमा पॉलिसी खरेदी करताना संपूर्ण गोष्टींची नीट चौकशी करा.
- जबर अपघातामुळे घरातील सामग्रीचे कोणतेही भौतिक नुकसान किंवा इतर नुकसान होताच, तुम्ही विमा कंपनीला नुकसानीची तात्काळ माहिती द्यावी.
- वस्तुंचे भौतिक नुकसान झाल्यास, विमाकर्ता तुम्हाला दुरुस्तीचा खर्च देईल आणि वस्तुंचे एकूण नुकसान झाल्यास, तुम्हाला वस्तूंच्या मूल्यमापनावर आधारित एकूण विमा रक्कम परत दिली जाईल.
- तुमच्या भाड्याने घेतलेल्या निवासाचा मालक केवळ इमारतीच्या संरचनेसाठी गृह विमा पॉलिसी खरेदी करू शकतो. तथापि, भाडेकरू म्हणून तुम्हाला तुमच्या घरातील सामग्रीचे आर्थिक संरक्षण करण्यासाठी पॉलिसी खरेदी करणे आवश्यक आहे.