केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बजेटमध्ये महिलांसाठी विशेष गुंतवणूक योजनेची घोषणा केली होती.महिला सन्मान सेव्हिंग स्कीम (Mahila Samman Saving Scheme) या योजनेतून मिळणाऱ्या व्याज उत्पन्नावर TDS लागू होणार आहे. यासंदर्भात केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने अधिसूचना जारी केली आहे.
आयकर विभागाने 16 मे 2023 रोजी महिला सन्मान सेव्हिंग स्कीम योजनेतील व्याज उत्पन्नावर टीडीएस लागू करण्याची अधिसूचना जारी केली आहे. आयकर सेक्शन 194 A नुसार हे नोटीफिकेशन जारी करण्यात आले आहे.महिला सन्मान सेव्हिंग स्कीम योजनेतील उत्पन्नावर कोणतीही कर सवलत नाही. व्याज उत्पन्न मर्यादेपेक्षा जास्त असेल तर त्यावर टीडीएस वजावट केला जाणार असल्याचे आयकर विभागाने स्पष्ट केले आहे.
महिलांसाठी एकवेळ गुंतवणूक करता येणारी महिला सन्मान सेव्हिंग स्कीम (Mahila Samman Saving Scheme)ही योजना अर्थमंत्री सितारामन यांनी 1 फेब्रुवारी 2023 रोजी जाहीर केली.मार्च 2025 पर्यंत महिलांना या योजनेत गुंतवणूक करता येणार आहे.
महिला सन्मान सेव्हिंग स्कीम ही दोन वर्ष मुदतीची गुंतवणूक योजना असून यात महिला जास्तीत जास्त दोन लाख रुपयांची गुंतवणूक करु शकतात.या योजनेत महिलांना 7.5% व्याज मिळणार आहे.या योजनेत महिला स्वत:किंवा मुलीच्या नावे गुंतवणूक करु शकतात. दोन वर्ष 7.5% व्याज मिळणार आहे. यात किमान 1000 रुपये ते 2 लाख रुपयांच्या दरम्यान गुंतवणूक करता येणार आहे. बजेटमधील घोषणेनुसार सुरुवातीला केवळ दोन वर्ष ही योजना सुरु राहणार आहे.
किती रकमेवर लागतो टीडीएस
आयकर सेक्शन 194 A नुसार मुदत ठेव किंवा इतर व्याजातून मिळणाऱ्या उत्पन्नावर आयकर सेक्शन 194A नुसार टीडीएस कापला जातो. बँका, पोस्ट ऑफिस, को-ऑपरेटिव्ह बँकांमधील मुदत ठेवींवर व्याज उत्पन्नावर टीडीएस लागू होतो. एका आर्थिक वर्षात सर्वसाधारण व्यक्तीसाठी व्याजातून मिळणारे उत्पन्न 40000 रुपयांवर गेले तर त्यावर टीडीएसची वजावट केली जाते. ज्येष्ठ नागरिकांसाठी ही मर्यादा एका वर्षासाठी 50000 रुपये इतकी आहे.
‘महिला सन्मान बचत योजना’ काय आहे?
महिलांनी जास्तीत जास्त गुंतवणूक करावी म्हणून सरकारने ‘महिला सन्मान बचत योजना’(MSSC) सुरु केली आहे. या योजनेत फक्त महिला गुंतवणूक करू शकतात. या योजनेत महिलांना 2 वर्षासाठी (2025 पर्यंत) गुंतवणूक करता येणार आहे. कमीत कमी 1000 रुपये ते कमाल 2 लाख रुपयांची गुंतवणूक करता येऊ शकेल. यातील गुंतवणुकीवर 7.5% व्याजदर (Interest) देण्यात येत आहे. गुंतवलेल्या रकमेवर मिळालेले व्याजदर तिमाही (Quarterly) स्वरुपात खात्यामध्ये जमा केले जाईल. त्यासाठी तुम्हाला पोस्ट ऑफिसमध्ये अकाऊंट ओपन (MSSC Account Open) करावे लागेल. कोणतीही महिला ‘महिला सन्मान बचत योजना’ खाते ओपन करू शकते आणि त्यामध्ये गुंतवणूक करू शकते.
कर सवलत मिळेल का?
महिला सन्मान बचत योजनेत गुंतवणूक केल्यावर कोणत्याही प्रकारची कर सवलत (Tax Benefit) मिळणार नाही. याशिवाय नियमानुसार व्याजदरातून मिळालेल्या उत्पन्नावर देखील कर (Tax) भरावा लागणार आहे. त्यामुळे कर सवलतीचा विचार करून तुम्ही देखील गुंतवणूक करणार असाल, तर ही योजना तो लाभ करदात्याला देत नाही. जर महिलांनी या योजनेत 2 लाखाची गुंतवणूक केली, तर त्यावर त्यांना 7.5 टक्के व्याजदर मिळणार आहे. दर तीन महिन्यांनी व्याजाची रक्कम त्यांच्या खात्यात जमा केली जाईल. 2 वर्षानंतर त्या महिलेला 2.32 लाख रुपये मिळतील.