Taxation of Minor Children in India: आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की भारत सरकार आपल्याकडून वेगवेगळ्या गोष्टींवर कर(Tax) आकारत असते. आपल्या पगारानुसार कर भरण्यासाठी टॅक्स स्लॅब(Tax Slab) देण्यात येतो. फेब्रुवारी मार्च आला की आपण सगळेच जण आयकर भरण्यासाठी धावाधाव करतो. जसे मोठ्या लोकांना कर भरावा लागतो त्याचप्रमाणे लहान मुलांना देखील कर भरावा लागतो का? काय आहेत यासंदर्भातील नियम चला जाणून घेऊयात.
भारतात बालमजुरीवर(Child labor) बंदी आहे हे आपल्या सगळ्यांनाच ठाऊक आहे. पण सध्या सोशल मीडियावर कन्टेंट क्रिएशन(Content Creation) हे कमाईचे लोकप्रिय साधन बनले असल्याने लहान मुलंही कायदेशीर मार्गाने कमाई करत आहेत. आपण कोणतीही गुंतवणूक(Investment) केल्यानंतर त्यावर कर हा भरावा लागतोच. त्याच प्रमाणे जेव्हा लहान मुलांच्या नावाने गुंतवणूक केली किंवा कमाई केली तर त्यांना देखील कर हा भरावा लागतोच, पण यासंदर्भात बऱ्याच जणांना माहिती नसते. याबाबचे आयकर नियम काय आहे आणि कर भरण्याची ही प्रक्रिया कशी असते समजून घेऊयात.
मुख्यतः कोणत्या गोष्टीवर 'आयकर' आकारला जातो?
लहान मुलांच्या उत्पन्नाचे(Income) दोन प्रकार पडतात. पहिले कमावलेले उत्पन्न जे त्याने स्वतः कमावले असते. दुसरे उत्पन्न म्हणजे जे त्याने स्वतः कमावले नाही परंतु त्यावर मालकी मुलाचीच असते. जर लहान मुलाने कोणत्याही स्पर्धा किंवा रिअॅलिटी शोमधून(Reality show), सोशल मीडियाद्वारे(Social Media) किंवा अर्धवेळ नोकरीद्वारे कमाई केली तर ती त्याची कमाई मानली जाते. परंतु मुलाला जर कोणाकडून कोणतीही मालमत्ता भेट म्हणून मिळाली तर ते त्याचे अनर्जित उत्पन्न मानले जाते. जर पालकांनी मुलाच्या नावावर कोणतीही गुंतवणूक केली तर त्यावर मिळणारे व्याज देखील मुलाचे अनर्जित उत्पन्नच मानले जाते.
लहान मुलांसाठीचा 'आयकर' नियम काय सांगतो?
मोठया व्यक्तींना ज्याप्रमाणे कराचा नियम आहे, त्याचप्रमाणे आयकर कायदा 1961 च्या कलम 6A (1A) नुसार लहान मुलांना मिळालेले पैसे आयकर विभागाअंतर्गत येतात. लहान मुलाने 1500 रुपयांपर्यंत कमाई केली असेल तर त्याला कर भरावा लागत नाही. परंतु जर त्याने 1500 रुपयांपेक्षा जास्त कमाई केली तर तो कर भरण्यासाठी पात्र ठरतो. अशा वेळी लहान मुलाचे उत्पन्न त्याच्या पालकांच्या उत्पन्नाशी जोडले जाते. त्यानंतर पालकांना कर स्लॅबनुसार एकूण उत्पन्नावर आयकर भरावा लागतो. आई आणि वडील दोघेही काम करत असतील तर त्यांच्या उत्पन्नाशी मुलाचे उत्पन्न जोडून कर मोजण्यात येतो. मुलाच्या उत्पन्नावर पालकांना वार्षिक 1500 रुपयांपर्यंत करामध्ये सूटही देण्यात येते. यामध्येही पालक जास्तीत जास्त दोन मुलांसाठी कर सूट मागू शकतात.
पालक नसतील तर काय?
जर मुलाच्या पालकांचा घटस्फोट(Divorce) झाला असेल तर मुलाचे उत्पन्न मुलाचा ताबा असलेल्या पालकांच्या उत्पन्नाशी जोडला जातो. याशिवाय जर मूल अनाथ असेल तर त्याला त्याचा आयटीआर स्वतःचं भरावा लागतो. कलम 80U मध्ये नमूद केल्यानुसार कोणत्याही मुलाला अपंगत्व असेल आणि अपंगत्व 40 टक्क्यांपेक्षा जास्त असेल, तर त्याचे उत्पन्न पालकांच्या उत्पन्नात जोडले जात नाही.