मार्च महिना हा आर्थिक वर्षातील शेवटचा महिना करदात्यांसाठी महत्वाचा महिना आहे. नोकरदार, व्यावसायिक, प्रोफेशनल व्यक्ती जास्तीत जास्त कर बचतीसाठी याच महिन्यात गुंतवणुकीचे निर्णय घेतात. कर बचतीसाठी आयकर सेक्शन 80 मधील सेक्शन 80 सी, 80 जी अशा मोजक्याच कर वजावटीच्या कलमांची माहिती सर्वसाधारणपणे सगळ्यांना माहिती आहे. मात्र या सेक्शन 80 मध्ये आणखी इतर कर वजावटीचे उपकलम आहेत. ज्यातून आयकर भरताना कर सवलत मिळू शकते.
आयकर सेक्शन 80 डीडी करदात्याला कर वजावटीचा लाभ देतो. सेक्शन 80 डीडीनुसार कुटुंबातील दिव्यांग व्यक्तीवरील खर्च कर वजावटीस पात्र आहे. (tax-saving-ideas-tax-deduction-under-section-80dd) दिव्यांग व्यक्ती कुटुंबातील ज्या व्यक्तीवर अवलंबून आहे त्या व्यक्तीला (Individual) आणि हिंदु अविभक्त कुंटुंबाला (HUF)आयकरातून सूट मिळेल. सेक्शन 80 डीडीमध्ये केवळ भारतीय करदात्याला कर सवलत मिळणार आहे. यात अवलंबून असणारी दिव्यांग व्यक्ती ही पती किंवा पत्नी, मुले, पालक, करदात्याची बहिण, भाऊ आणि एचयूएफ असेल तर कुटुंबातील व्यक्तींचा समावेश असावा. दिव्यांगचे प्रमाण 40% कमी असू नये. तसेच पर्सन ऑफ डिजॅबिलिटीस अॅक्ट 1995 च्या सेक्शन 2(i)मध्ये स्पष्ट केलेल्या अटींची पूर्तता केलेली असावी.
करदात्यावर अवलंबून असलेल्या दिव्यांगासाठी केलेल्या उपचारांचा खर्च आयकर सेक्शन 80 डीडीनुसार कर वजावटीस पात्र ठरणार आहे. मात्र कर वजावटीची रक्कम ही अपंगत्वावर देखील अवलंबून आहे. अपंगत्व 40% हून अधिक आणि 80% पेक्षा कमी असेल तर करदात्याला वर्षाला 75000 रुपयांची कर वजावट मिळेल.
जर करदात्यावर अवलंबून असणाऱ्या दिव्यांगाचे अपंगत्व 80% हून जास्त असेल तर करदात्याला वर्षाला 125000 रुपयांची कर वजावट मिळणार आहे. मात्र दिव्यांग व्यक्तीने जर आयकर सेक्शन 80 यू नुसार कर वजावटीचा लाभ घेतला असल्याचे करदात्याला 'सेक्शन 80 डीडी'मध्ये करलाभ मिळणार नाही, असे आयकर विभागाने स्पष्ट केले आहे.
'सेक्शन 80 डीडी'मध्ये समावेश असलेले अपंगत्वाचे प्रकार
मानसिक आजार, कर्णबधीर, मानसिक दुर्बलता, सेरेब्रल पाल्सी, कुष्ठरोगी, ऑटिझम, स्वमग्नता, अंधत्व, अल्प दृष्टी यासंबधीच्या व्यक्ती अवलंबून असतील आणि त्यांच्या राहणीमानावर खर्च केला तर करदात्याला वार्षिक करातून सेक्शन 80डीडीमध्ये सवलत मिळते.