Post office term deposit scheme: नोकरदार वर्गापासून व्यावसायिक असे सर्वजण कर बचतीचे पर्याय शोधत असतात. आयकर कायद्यातील विविध सेक्शन नुसार गुंतवणुकीवर करबचत घेता येऊ शकते. पोस्टाच्या दीर्घकालीन मुदत ठेवीमध्ये गुंतवणूक करुनही तुम्ही कर वाचवू शकता. आयकर कायद्यातील 80C चा फायदा तुम्हाला घेता येईल. मात्र, त्यासाठी पोस्टाची मुदत ठेव योजना काय आहे, हे समजून घ्यावे लागेल.
भारतीय पोस्ट विविध कालावधीसाठी मुदत ठेवीमध्ये गुंतवणूक करण्याचा पर्याय उपलब्ध करून देते. 1, 2, 3 आणि 5 वर्ष असे पर्याय उपलब्ध आहेत. मात्र, यातील दीर्घकालीन 5 वर्षांच्या गुंतवणुकीवर 80C सेक्शन नुसार कर वजावट मिळवता येईल. पूर्ण पाच वर्ष पोस्टाच्या मुदत ठेवीत (टर्म डिपॉझिट) मध्ये गुंतवणूक अनिवार्य आहे.
पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट व्याजदर (Post Office Time Deposit Interest Rates)
पोस्टातील एक वर्षाच्या मुदत ठेवीवर 6.6% व्याजदर मिळतो. तर 2 आणि 3 वर्षाच्या मुदत ठेवीवर अनुक्रमे 6.8% आणि 6.9% व्याजदर मिळतो. पाच वर्षांच्या ठेवींवर 7% व्याजदर मिळतो. पोस्टातील गुंतवणूक योजनांचे व्याजदर दर तीन महिन्यांना अपडेट होत असतात. वर नमूद केलेले दर 1 जानेवारी 2023 ते 31 मार्च 2023 पर्यंत लागू आहेत. या ठेवींवरील व्याज वार्षिक पद्धतीने मिळते.
80C अंतर्गत करसवलतीचा फायदा
80C अंतर्गत विविध पर्यायांतील गुंतवणुकीवर करवजावट मिळवता येते. EPF, PPF, ELSS सारख्या योजनांचा यात समावेश आहे. पोस्टातील गुंतवणुकीचाही यात समावेश आहे. दीड लाख रुपयापर्यंतच्या गुंतवणुकीवर कर वजावट मिळवता येते. पोस्टाच्या दीर्घ मुदतीच्या ठेवींमध्ये केलेली गुंतवणुकही करवजावटीसाठी पात्र आहे. पोस्टामध्ये 5 वर्ष गुंतवणूक केल्यास हा लाभ मिळवता येईल. त्यापेक्षा कमी कालावधीच्या पोस्टाच्या मुदत ठेव योजनांना 80C लागू नाही.
वेळेआधीच खाते बंद केले तर (Premature account closure)
पोस्टाने संकेतस्थळावर दिलेल्या माहितीनुसार, मुदत ठेवींमधील गुंतवणूक सहा महिन्यांच्या आत काढून घेता येणार नाही. 2, 3 आणि 5 वर्षांच्या मुदत ठेवीचे खाते एक वर्षानंतर बंद केले तर ठरलेल्या व्याजदरापेक्षा 2% कमी व्याजदर मिळेल. पाच वर्षांचे मुदत ठेव खाते 4 वर्षानंतर बंद केले तर 3 वर्षांच्या मुदत ठेवीवर जेवढा व्याजदर मिळतो, तेवढा व्याजदर मिळेल.
पोस्ट मुदत ठेव गुंतवणूक मर्यादा (POTD Investment Limit)
पोस्टाच्या या योजनांमध्ये कमीतकमी 1000 रुपये गुंतवता येतील. किंवा 100 च्या पटीत कितीही रक्कम गुंतवू शकता. कमाल मर्यादा यासाठी नाही. मात्र, 80C नुसार करवजावटीसाठी फक्त दीड लाख रुपये ग्राह्य धरले जातील. त्यापुढील रक्कम करवजावटीस पात्र ठरणार नाही.
मुदत ठेवींचा कालावधी वाढवता येतो का?
पोस्टाच्या मुदत ठेवींमध्ये केलेल्या गुंतवणुकीचा कालावधी वाढवता येतो. गुंतवणुकीचा कालावधी मॅच्युअर झाल्यानंतर कार्यकाळ वाढवता येतो. त्यावेळी जो व्याजदर सुरू असेल त्यानुसार पुढील काळासाठीही गुंतवणुकीवर व्याजदर मिळेल. पोस्टातील मुदत ठेवींमधील गुंतवणुकीवर ज्येष्ठ नागरिकांना अतिरिक्त व्याजदर मिळत नाही. मात्र, बँकांतील FD वर ज्येष्ठ नागरिकांना सर्वसामान्य नागरिकांपेक्षा जास्त व्याजदर मिळतो.