केंद्र सरकारला चालू आर्थिक वर्षात प्रत्यक्ष करातून 5.84 लाख कोटींचे उत्पन्न मिळाले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा कर महसुलात 17% वाढ झाली आहे. कर संकलनात वाढ झाल्याने केंद्र सरकारला दिलासा मिळाला.
सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस या विभागाने कर संकलनाची आकडेवारी जाहीर केली आहे. त्यानुसार 10 ऑगस्ट 2023 अखेर कर परतावा वगळता ढोबळ प्रत्यक्ष कर संकलन 6.53 लाख कोटींपर्यंत वाढले आहे. त्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत 15.73% वाढ झाली. या कर संकलनात कर परतावा वगळला आहे.
सरकारने चालू वर्षासाठी 18.2 लाख कोटींचे प्रत्यक्ष कर संकलनाचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. 10 ऑगस्ट 2023 अखेर हा आकडा 5.84 लाख कोटींपर्यंत गेला.
कंपनी करातून यंदा 9.2 लाख कोटींचा कर महसुली उद्दिष्ट्य निश्चित करण्यात आले आहे. वैयक्तिक करातून 9 लाख कोटी रुपयांचा महसूल मिळेल असा विश्वास सरकारने व्यक्त केला आहे.
आर्थिक वर्ष 2022-23 साठी आयकर विवरण प्रक्रिया नुकताच पूर्ण झाली. यंदा रिटर्न फाईल करणाऱ्या करदात्यांची संख्या वाढल्याचे दिसून आले आहे. इन्कम टॅक्स विभागाने आयटीआर फायलिंगची प्रक्रिया सोपी आणि सुटसुटीत केल्याने फायदा झाल्याचे बोलले जाते.
सीबीडीटीच्या आकडेवारीनुसार 31 जुलै 2023 अखेर 6 कोटी 77 लाख इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करण्यात आले. त्यात 16.1% वाढ झाली.
सरकारने इन्कम टॅक्स रिटर्न प्रोसेस तंत्रज्ञानस्नेही केली असून यात कृत्रिम बुद्धीमत्तेचा देखील व्यापक प्रमाणात वापर केला आहे. यामुळे रिटर्न फायलिंग, व्हेरिफिकेशन आणि रिफंड ही संपूर्ण प्रक्रिया गतीमान झाली आहे. छोट्या रकमेचा परतावा रिटर्न फायलिंगनंतर आठवडाभरात करदात्यांना प्राप्त होत आहे.