देशातील मोठ्या उद्योग समूहापैकी एक टाटा समूहातील टाटा प्ले या कंपनीकडून लवकरच खुल्या समभाग विक्री योजनेची घोषणा केली जाण्याची शक्यता आहे. कंपनीने समभाग विक्रीसाठीचा (IPO) गोपनीय प्रस्ताव सेबीला सादर केला आहे. टाटा समूहाकडून टाटा प्लेसाठी 2000 ते 2500 कोटींचा निधी उभारला जाण्याची शक्यता आहे.
टाटा प्ले जी पूर्वी टाटा स्काय म्हणून ओळखली जात होती. या कंपनीत टाटा सन्सची तब्बल 62.2% हिस्सेदारी आहे. तर उर्वरित हिश्शामध्ये सिंगापूरची टेमासेक होल्डिंग, टाटा अपॉच्युर्निटीज फंड आणि वॉल्ट डिस्ने या कंपन्यांची हिस्सेदारी एकूण 37.8% आहे. टाटा प्लेकडून सेबी, बीएसई आणि एनएसई या तीनही महत्वाच्या संस्थांना IPO चा गोपनीय प्रस्ताव 30 नोव्हेंबर रोजी सादर केला आहे. मात्र टाटा प्ले किंवा टाटा सन्सकडून याबाबत दुजोरा देण्यात आलेला नाही.
18 वर्षांनंतर टाटा समूहातील कंपनी आणणार आयपीओ
टाटा प्ले कंपनीने IPO साठी सेबीकडे अर्ज सादर केला आहे. या प्रस्तावाला मंजुरी मिळाली तर तब्बल 18 वर्षांनंतर टाटा समूहातील एखादी कंपनी भांडवली बाजारात प्रवेश करणार आहे. 2004 मध्ये टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) या कंपनीचा IPO बाजारात दाखल झाला होता. टाटा हा सर्वात विश्वसनीय ब्रॅंड म्हणून ओळखला जातो. त्यामुळे 18 वर्षांनी एखादी टाटा समूहातील कंपनी आयपीओ आणणार असल्याने गुंतवणूकदारांची उत्सुकता वाढली आहे.
DTH मध्ये 'टाटा प्ले'चे वर्चस्व
डायरेक्ट टू होम बाजारपेठेत टाटा प्लेचे वर्चस्व आहे. सर्वाधिक 33.23 % हिस्सा टाटा प्लेचा असून त्याखालोखाल 26.24% भारती टेलिमिडियाचा आहे. या बजारपेठेत सन टीव्ही आणि डिश टीव्ही यांचाही मोठा ग्राहकवर्ग आहे. टाटा प्लेला आर्थिक वर्ष 2022 मध्ये 69 कोटींचा नफा झाला होता. या वर्षात कंपनीने 4741 कोटींचा महसूल मिळवला होता.