Tata Motors Share Price: टाटा मोटर्स कंपनीचा शेअर्स शुक्रवारी (7 जुलै) आठ वर्षांच्या उच्चांकावर पोहचला. जून तिमाहीती जॅग्वार आणि लँडरोव्हर गाड्यांची जगभरातील विक्री वाढल्याने कंपनीच्या नफ्यात वाढ झाली आहे. 400 मिलियन डॉलर कंपनीकडे खेळते भांडवल राहणार असल्याचा अंदाज वर्तवल्यानंतर शेअर्सवर सकारात्मक परिणाम दिसून आला. टाटा कंपनीचे बाजार भांडवल 2 लाख कोटींच्या वर गेले आहे.
टाटा मोटर्सच्या शेअरची किंमत किती?
मुंबई शेअर बाजारावर काल शुक्रवारी टाटा मोटर्सचा शेअर 2.94 टक्क्यांनी वाढून 622 रुपयांवर गेला होता. टाटाच्या शेअरचे मूल्य वाढण्यामागे जॅग्वार आणि लँडरोव्हर गाड्यांची विक्री हे मुख्य कारण आहे. जून तिमाहीत या गाड्यांची विक्री 29 टक्क्यांनी वाढली. जगभरात 1,01,994 गाड्यांची विक्री झाली. चीनसोबतही जॅग्वार लँडरोव्हरचे जॉइंट व्हेंचर आहे. सेमीकंडक्टरचा तुटवडा असल्याने वाहन निर्मितीचा वेग मंदावला होता. मात्र, आता सेमीकंडक्टरचा पुरवठा सुरळीत झाल्याने गाड्यांच्या निर्मितीला वेग आला आहे. त्याचे परिणाम कंपनीच्या ताळेबंदावरही दिसून येत आहेत.
सौजन्य - गुगल
जगभरात टाटाची सर्वाधिक विकली जाणारी मॉडेल कोणती?
रेंज रोव्हर, रेंज रोव्हर स्पोर्ट्स आणि रेंज रोव्हर डिफेन्डर या तीन गाड्यांची जगभरात सर्वाधिक विक्री होते. मागील वर्षीच्या तुलनेत या वर्षी जून तिमाहीत किरकोळ बाजारात या तीन मॉडेल्सला मोठी मागणी होती. रेंज रोव्हर या मॉडेलची मागणी सुमारे 200 टक्क्यांनी वाढली. 185,000 लाख ग्राहकांनी तिमाहीच्या शेवटी गाड्यांची बुकिंग केली आहे. त्यामुळे गाड्यांचे उत्पादनही वेगात सुरू आहे.
टाटा मोटर्सने जून तिमाहीत जगभरात 3,22,159 गाड्यांची होलसेल विक्री केली. यामध्ये जॅग्वाह, लँडरोव्हर गाड्यांचाही समावेश आहे. मागील वर्षातील जून तिमाहीच्या तुलनेत ही वाढ 5 टक्क्यांनी जास्त आहे. टाटा मोटर्सचा शेअर्स येत्या काही दिवसांत 700 रुपयापर्यंत जाईल, असा अंदाज बाजार विश्लेषक वर्तवत आहेत. तसेच चांगली वाढ पाहता हा शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला देत आहेत.