टाटा मोटर्सने आपल्या विविध श्रेणीतील गाड्यांच्या किंमती वाढवल्या आहेत. त्यामुळे जर तुम्ही टाटाची गाडी घेण्याचा विचार करत असाल तर आता तुम्हाला जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. मागीलवर्षी डिसेंबर महिन्यातच अनेक आघाडीच्या वाहननिर्मिती कंपन्यांनी किंमत वाढीची घोषणा केली होती. त्यानुसार आता 1 फेब्रुवारीपासून टाटाच्या प्रवासी गाड्या महागणार आहेत.
1 फेब्रुवारीपासून दरवाढ लागू (Price hike of Tata motors cars)
टाटा मोटर्सने आपल्या विविध श्रेणीतील गाड्यांच्या किंमती 1.2% वाढवल्या आहेत. 1 फेब्रुवारीपासून ही दरवाढ लागू होणार आहे. या महिन्याच्या सुरुवातीला आघाडीची कार निर्मिती कंपनी मारुती सुझुकीने विविध वाहनांच्या किंमती 1.1 टक्के वाढवल्या होत्या.
टाटा मोटर्सच्या गाड्यांची किंमती (एक्स शोरुम किंमत)
टाटा नेक्सॉन 7.69 लाखांपासून पुढे
टाटा पंच 6 लाखांपासून पुढे
टाटा अल्ट्रॉझ 6.34 लाखांपासून पुढे
टाटा हॅरियर 14.79 लाखांपासून पुढे
टाटा टियागो EV - 8.49 लाखांपासून पुढे
टाटा टिगॉर - 6.09 लाखांपासून पुढे
किंमत वाढीमागील कारण? (Reason behind price Hike)
महागाईमुळे वाहन निर्मितीसाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या किंमती भरमसाठ वाढल्या आहेत. त्यामुळे सुट्या भागांच्या किंमतीही वाढल्या आहेत. पुरवठा साखळीमधील खर्चाचा परिणामही निर्मिती खर्चावर झाला आहे. तसेच केंद्र सरकारने प्रदूषण नियंत्रणासाठी विविध उपाययोजना लागू केल्या आहेत. त्यानुसार वाहनांना इंधन किती लागते याबाबतचे उपकरण बसवावे लागणार आहे. भारत-6 चे दुसऱ्या टप्प्यातील नियम येत्या एप्रिलासून लागू होणार आहेत. त्यामुळे हा खर्चही कंपन्यांना उचलावा लागणार आहे. पर्यायाने सर्वच वाहन निर्मिती कंपन्यांनी किंमत वाढ केली आहे.
टाटा मोटर्सचा नफा वाढला ( Tata Motors Profit)
टाटा मोटर्स ही भारतातील तिसऱ्या क्रमांची वाहन निर्मिती कंपनी आहे. कंपनीचे तिमाही निकाल जाहीर झाले आहेत. तोट्यातील टाटा मोटर्सने नफा नोंद केल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. त्यामुळे कंपनीच्या शेअर्समध्ये 8.2% वाढ झाली. मागील दोन वर्षांपासून पहिल्यांदाच कंपनीने नफा नोंदवला आहे.
लक्झरी कारची डिमांड वाढली( Demand surged for Tata luxury cars)
मागील काही दिवसांपासून टाटा कंपनीच्या लँड रोव्हर आणि जॅग्वार गाड्यांची मागणी वाढली आहे. एकूण वाहन विक्रीच्या 60% गाड्या लक्झरी श्रेणीतील आहेत. तसेच सेमिकंडक्टरचा तुटवडा कंपन्यांना भासत होता. हा पुरवठाही सुरळीत झाला आहे. त्यामुळे वाहननिर्मितीची गतीही वाढली आहे. या सर्व गोष्टी टाटा कंपनीच्या पथ्यावर पडल्या.