ATM Withdrawal: हल्ली आपण बरेच व्यवहार हे ऑनलाईन(Online) करत असलो तरीही आपल्याला कॅशची गरज ही भासतेच. त्यामुळे थोडे का असेनात आपण पैसे एटीएम(ATM) मधून काढतोच. बऱ्याचवेळी आपण आपल्याकडे असणाऱ्या बँकेच्या ATM मधून पैसे काढण्याऐवजी बऱ्याचवेळा दुसऱ्या बँकेच्या ATM मधून पैसे काढतो. तशी आपल्याला सोयही देण्यात आलेली असते. याच सोयीला ‘थर्ड पार्टी एटीएम’ असे म्हटले जाते. त्याच्या वापराबाबत रिझर्व्ह बँकेने(RBI) काही नियम घालून दिले आहे. तुम्हीही दुसऱ्या बँकेच्या ATM मधून पैसे काढत असाल तर काही गोष्टींकडे नक्की लक्ष द्या.
पहिले 5 व्यवहार मोफत त्यानंतर...(First five transactions free)
दुसऱ्या बँकांच्या ATM मधून केवळ पहिले पाच व्यवहारच मोफत करता येतात. यात आर्थिक व्यवहारांव्यतिरिक्तच्या व्यवहारांचा (‘अकाउंट स्टेटमेंट’ किंवा ‘मिनी स्टेटमेंट’ पाहणे, ‘बॅलन्स चेक’) समावेश करण्यात आलेला असतो. पूर्वी बिगर आर्थिक व्यवहारांवर कोणतीही मर्यादा नव्हती. मात्र आता अशा व्यवहारांवर शुल्क आकारले जाऊ शकते. जो आपला ग्राहक नाही अशा व्यक्तीला रोख पैसे देण्यासाठी बँकेला बऱ्याच वेळा वेगळी व्यवस्था करावी लागते. त्यासाठी काही सेवाशुल्क आकाराले जाते. ग्राहकाची ‘थर्ड पार्टी एटीएम(Third Party ATM)’ मोफत वापरण्याची मर्यादा संपल्यावर बँकेकडून वेगळे शुल्क आकारले जातात. त्याचे दर रिझर्व्ह बँकेच्या धोरणांनुसार ठरलेले असतात. मात्र खासगी बँका बऱ्याचदा स्वतःचे वेगळे दरही आकारतात.
ATM कार्डचा स्वाइप कार्ड म्हणून वापर(Use of ATM card as a swipe card)
आपले ATM कार्ड हे एक डेबिट कार्ड(Debit Card) सुद्धा आहे. त्यामुळे दुसऱ्या बँकेच्या ATM मधून पाच वेळा पैसे काढून सेवा शुल्क आकारण्यापेक्षा कार्ड स्वाइप(Card Swipe) करून तुम्ही तुमचे व्यवहार पूर्ण करू शकता.आपले कार्ड किती वेळा स्वाइप करावे यावर निदान अजून तरी कोणतीही मर्यादा घालण्यात आलेली नाही. ATM मधून पैसे काढण्याऐवजी कार्ड स्वाइप करून एटीएम कार्डाच्या वापराची गरजच आपल्याला कमी करता येते.
अलीकडच्या काळात अनेक दुकानदारांकडे कार्ड स्वाइप करण्यासाठी लागणारी उपकरणे उपलब्ध झाली आहेत. त्यामुळे डेबिट कार्ड म्हणून एटीएम कार्डाचा वापर करून आपण या शुल्कापासून सुटका करून घेऊ शकतो. आपल्याभोवतीचे बँकिंग व्यवहार ‘स्मार्ट’ होत असताना आपण देखील थोडे स्मार्ट होणे गरजेचे आहे.