घरात महिन्याभराला लागणाऱ्या वस्तू आपण एकदाच मार्केटमध्ये जाऊन खरेदी करतो. त्यातही ही खरेदी अनेक कुटुंबामध्ये महिलाच करतात. घरातील पैशांचा हिशेब हा अनेकवेळा घरातील गृहिणीच पाहाते. ठरावीक रक्कम पतीने दिल्यानंतर या रकमेत घरातील प्रत्येक खर्च ती भागवते. कोणत्या दुकानातून वस्तू घेतली तर ती कमी किमतीत मिळेल हे गृहिणींना चांगलेच माहिती असते. घरातल्या वस्तूंची खरेदी करण्याबाबत काही खास टिप्स आज आम्ही तुम्हाला देणार आहोत. याचा वापर करून तुम्ही पैशांची नक्कीच बचत करू शकता.
अन्नधान्य-कडधान्य
घरात लागणारे अन्नधान्य, कडधान्य महिन्यातून, दोन महिन्यातून एकदाच आणले जाते. अनेकवेळा आपल्याला दैनंदिन जीवनात किती वेळा कोणते कडधान्य लागणार, तांदूळ-गहू किती लागणार याचा अंदाज लागत नाही आणि त्यामुळे आपण महिन्याला लागणाऱ्या वस्तूंपेक्षा अधिक वस्तू खरेदी करतो. तांदूळ, गहू, ज्वारी यांसारखी धान्य वर्षभर तरी खराब होत नाही. पण कडधान्याला एक-दोन महिने झाल्यानंतर कीड लागते आणि ते फेकून द्यावे लागते. त्यामुळे खरेदीला जाण्याआधी या सगळ्या गोष्टींचा अंदाज बांधूनच जावे. कोणकोणते कडधान्य घ्यायचे आहे, किती किलो घ्यायचे आहे याची लिस्ट बनवूनच खरेदीला जावे. तसेच पॅकिंगमधील अन्नधान्य अथवा कडधान्य घेण्यापेक्षा सुट्टे घेण्याचा प्रयत्न करा. कारण एखाद्या ब्रँडची अन्नधान्यं तसेच कडधान्यं ही तुलनेने महाग असतात.
फळे-भाज्या
फळे तसेच भाज्या आठवडाभरातच खराब होतात. त्यामुळे खरेदीला गेल्यानंतर आठवड्याभरासाठी जितकी फळे-भाज्या लागतात तितकीच खरेदी करावी.
एक्सपायरी डेट
प्रत्येक वस्तूवर एक्सपायरी डेट लिहिलेली असते. त्यामुळे कोणत्याही गोष्टीची खरेदी करताना त्या वस्तूची एक्सपायरी डेट काय आहे हे पाहावे. दही, ताक, ब्रेड, पॅकिंगमध्ये मिळणारे चिकन यांची एक्सपायरी डेट गेल्यानंतर त्या वस्तू वापरता येत नाही. त्यामुळे आपल्याला आवश्यक तितक्याच प्रमाणात या वस्तू खरेदी कराव्यात आणि एक्सपायरी डेट जवळ असेल तर त्या वस्तू घेणे टाळावे.
ब्रँडमध्ये तुलना
शॉपिंग मॉलमध्ये एकाच प्रकारच्या विविध वस्तू मिळतात. त्यामुळे एखादी वस्तू विकत घेण्याआधी त्याच वस्तूच्या दुसऱ्या ब्रँडच्या किंमती काय आहेत हे तपासावे आणि त्यातून आपल्याला स्वस्त आणि योग्य वाटणारी वस्तू खरेदी करावी. तसेच काही वेळेला एखाद्या वस्तूसोबत दुसरी वस्तू फ्री मिळते. त्यामुळे आपल्याला ज्या वस्तूची खरेदी करायची, त्यासोबत काही फ्री आहे का हे तपासावे.
सेल
सणाच्या निमित्ताने अनेक ऑनलाइन वेबसाईट, शॉपिंग मॉलमध्ये सेल घोषित केला जातो. सेलच्या दरम्यान एमआरपी (वस्तूंची किंमत) पेक्षा कमी दरात अनेक वस्तू मिळतात. त्यामुळे अधिक काळ खराब होणार नाहीत अशा वस्तू जास्त संख्येने घेऊन त्या घरात तुम्ही ठेवू शकता.
नाश्त्यासाठी लागणारे पदार्थ
सकाळी अथवा संध्याकाळी न्याहारीसाठी लागणाऱ्या अनेक गोष्टी आपण मॉलमधून खरेदी करतो. बिस्कीटं, चिवडा, वेफर्स यांसारखे अनेक स्नॅक्स आपण घरी आणून ठेवतो. महिन्याभरासाठी हे पदार्थ आपल्याला किती लागणार आहेत याची कधीही यादी बनवा. अनेकवेळा यादी बनवली नसल्याने समोर दिसणाऱ्या अनेक वस्तू आपण गरज नसताना देखील खरेदी करतो.