तुमचे ग्राहक जर तुमच्या सेवेपासून खुश नसतील तर समजून जा की तुमच्या व्यवसायात बदल करणे गरजेचे आहे, हा एक सर्वात मोठ्या धडा असतो जो कुठल्याही व्यावसायिकाला पुढे जाण्यासाठी महत्वाचा ठरतो. व्यवसाय सुरू करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे स्वप्न असते की यश त्याच्या पायांचे चुंबन घेईल. परंतु व्यवसायातील यश हे आपल्या कामाच्या गुणवत्तेवर अबलंबून असते हे विसरू नका. अपयश ही यशाची पहिली पायरी असते हे वाक्य आपण अनेकदा ऐकलं असेल, वाचलं असेल. परंतु अपयश न येता देखील आपण आपल्या व्यवसायाचे नियोजन करू शकतो हे लक्षात घ्या. व्यवस्थापन गुरू डॉ. पीटर एफ. ड्रकर म्हणतात की, एक यशस्वी कंपनी संपूर्ण समाजासाठी आशीर्वाद असू शकते आणि अयशस्वी कंपनी - एक ओझे असू शकते. तेव्हा कोणत्याही शहाण्या व्यावसायिकाने काही महत्वाच्या मुद्द्यांचा विचार केलाच पाहिजे, कारण महागाईच्या जमान्यात आर्थिक नुकसान भरून काढणे महाकठीण काम होऊन बसले आहे.
आज आपण पाहणार आहोत की काही व्यवसाय कधीच का चालत नाहीत किंवा काही चांगल्या प्रकारे चालणाऱ्या व्यवसायात अचानक समस्या येतात. या सगळ्यांची कारणमीमांसा होणे गरजेचे आहे. जोवर आपण कारणांच्या मुळाशी जाणार नाही तोवर आर्थिकदृष्ट्या देखील सक्षम बनणार नाही. त्यामुळे यशस्वी व्यवसाय उभा करण्यासाठी काय केले पाहिजे आणि काय करायला नको हे समजून घ्यायला हवे.
सर्व प्रयत्न करून देखील, व्यवसाय चालत नसेल तर यामागे कोणतेही एक असे कारण नसून अनेक कारणे असू शकतात हे लक्षात घ्या. हे अगोदरच्या काही काळातच समजून घेतल्यास, तुम्ही अपयशाचे प्रमाण कमी करू शकता.
Table of contents [Show]
चुकीचे नियोजन आणि व्यवस्थापन (Poor Planning and Management)
सर्वात सामान्य कारणांपैकी एक म्हणजे खराब नियोजन आणि व्यवस्थापनाचा अभाव. येथे खराब व्यवस्थापन म्हणजे विशेषतः खराब आर्थिक, मानवी संसाधने आणि विपणन (Marketing) व्यवस्थापन.
अनेक व्यवसाय कोणत्याही स्पष्ट योजनेशिवाय सुरू केली जातात. अनेक व्यवसायांकडे योजना अंमलात आणण्यासाठी योग्य टीम नसते.त्यामुळे हे व्यवसाय कमी कालावधीत बंद पडतात.
जागतिक स्तरावर याची उदाहरणे एनरॉन आणि लेहमन ब्रदर्स ही अशी काही उदाहरणे आहेत जी चुकीचे नियोजन आणि व्यवस्थापन अभावी तोट्यात गेली .भारतात 'टाटा नॅनो' प्रकल्प हे एक उत्तम उदाहरण आहे, जे पहिल्या दिवसापासून खराब नियोजनामुळे टीकेचे धनी बनले.
वित्ताचा अभाव, अडथळे आणि गैरव्यवस्थापन (Lack of Finance, Constraints and Mismanagement )
व्यवसाय सुरू ठेवण्यासाठी पुरेसे भांडवल नसल्यामुळे अनेक व्यवसाय सुरुवातीला किंवा कठीण काळात अपयशी ठरतात. हे खराब आर्थिक व्यवस्थापन, पुरेसे गुंतवणूकदार नसणे किंवा स्पष्ट आर्थिक योजना नसणे यामुळे असू शकते.जगभरात आणि भारतात अशा शेकडो कंपन्या आहेत.
आर्थिक अनियमितता आणि गैरव्यवस्थापनामुळे भारतातील अनेक व्यवसाय अयशस्वी झाले आहेत. यामध्ये किंगफिशर एअरलाइन्स, सत्यम कॉम्प्युटर्स आणि रॅनबॅक्सी लॅबोरेटरीजचा समावेश आहे . त्यातही अनेकांनी फसवणूक केली होती हेही खरे आहे.
सदोष मार्केटिंग (Flawed Marketing)
कोणत्याही व्यवसायाचा आधार हा त्याचे ग्राहक असतो, ज्यांच्याशिवाय त्या व्यवसायाची कल्पनाही व्यर्थ असते. खराब आणि सदोष मार्केटिंगमुळे व्यवसायात ग्राहकांच्या सहभागाचा अभाव असतो, ज्यामुळे व्यवसाय अपयशी ठरू शकतो. व्यवसाय यशस्वी होण्यासाठी बाजारपेठेत प्रभावीपणे पोहोचण्यास सक्षम असणे आणि बाजारपेठेत आपले वेगळे अस्तित्व उभे करणे आवश्यक आहे.
एखादा व्यवसाय आपला संदेश ग्राहकांपर्यंत पोहोचवू शकत नसल्यास किंवा ब्रँड ओळख निर्माण करण्यास सक्षम नसल्यास, ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी आणि टिकवून ठेवण्यासाठी व्यवसायात संघर्ष करावा लागतो. उदाहरणार्थ एचएमटी (Hindustan Machine Tools) इ.
तीव्र स्पर्धा (Intense Competition)
व्यवसाय अयशस्वी होण्याचे आणखी एक कारण म्हणजे आजच्या बाजारपेठेतील तीव्र स्पर्धा. यशस्वी होण्यासाठी, आपण आपल्या उद्योगातील इतर कंपन्यांशी स्पर्धा करण्यास सक्षम असणे आवश्यक आहे. मोठ्या कंपन्यांशी स्पर्धा करण्यासाठी संसाधने किंवा कौशल्य नसलेल्या छोट्या व्यवसायांसाठी हे आव्हानात्मक असू शकते. उदाहरणार्थ हिंदुस्थान मोटर्स (ज्याने अँबेसिडर कार बनवली), BPL मोबाईल, निरमा इ.
बाह्य घटक (External Factors)
या सामान्य कारणांव्यतिरिक्त, अर्थव्यवस्थेतील बदल, नैसर्गिक आपत्ती, सरकारी नियमांमधील बदल किंवा नवीन शोध यासारख्या बाह्य कारणांमुळे देखील व्यवसाय अयशस्वी होऊ शकतात. व्यवसायांना टिकून राहण्यासाठी या बदलांशी जुळवून घेणे महत्त्वाचे आहे. सरकारी कंपन्यांसाठी, सरकारकडून सतत पाठिंबा, आणि नवीन व्यवस्थापन शैलीमधले बदल आदी गोष्टी कारणीभूत ठरू शकतात. उदाहरण म्हणून पहायचे ठरल्यास BSNL आज भारताची नंबर वन टेलिकॉम कंपनी बनू शकली असती, पण ती मागे राहिली कारण सरकारी यंत्रणेला व्यवसायाची व्याप्ती कळली नाही.
तीव्र स्पर्धेमुळे आर्थिक नुकसान भोगाव्या लागलेल्या कंपन्या म्हणून BSNL, MTNL, Kodak Films इ. कंपन्यांचे उदाहरण देता येईल.
व्यवसाय चालवणे म्हणजे सतत शर्यतीत धावण्यासारखे असते, ज्यामध्ये नवीन आयाम समजून घेत आपली रणनीती बदलत राहावी लागते. व्यवसायातील अपयश टाळण्यासाठी, व्यवसायाची उद्दिष्टे आणि ध्येये तसेच ते साध्य करण्याच्या धोरणांची रूपरेषा देणारी स्पष्ट व्यवसाय योजना असणे आवश्यक आहे. व्यवसाय मालकांना त्यांच्या व्यवसायाच्या आर्थिक स्थितीची जाणीव असणे आवश्यक आहे आणि त्यांच्याकडे कठीण काळात व्यवसाय टिकवून ठेवण्यासाठी पुरेसे भांडवल आहे याची खात्री करण्यासाठी पावले उचलली पाहिजेत. त्यांनी त्याच्याकडे एक चांगली टीम असल्याची आणि ते बाजारात स्पर्धात्मक राहतील याचीही खात्री करावी.