SUV Car Sale: भारतामध्ये मागील काही वर्षांपासून SUV (स्पोर्ट्स युटिलिटी व्हेइकल) ची विक्री वाढत आहे. पहिल्यांदाच कार खरेदी करणाऱ्यांमध्ये SUV ची डिमांड सर्वाधिक आहे. पहिल्यांदाच कार खरेदी करणारा प्रत्येक तिसरा ग्राहक SUV घरी आणत आहे. चालू वर्षात 19 लाख SUV कार विक्रीचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
मागील दहा वर्षात एसयुव्ही गाड्यांची खरेदी चारपट वाढली आहे. जास्त ग्राउंड क्लिअरन्स, स्पर्धात्मक किंमती आणि गाड्यांमध्ये अनेक पर्याय उपलब्ध असल्याने ग्राहकांची SUV ला पसंती वाढत आहे. दहा वर्षांपूर्वी प्रत्येक 10 कार खरेदीमागे एक ग्राहक SUV खरेदी करत होता. ही परिस्थिती आता बदलली आहे. दहा वर्षांपूर्वी हॅचबॅक कारला डिमांड होती. मात्र, ही मागणी आता खाली आली आहे.
ग्राहकांची पसंती बदलली
परवडणाऱ्या किंमतीच्या एसयुव्ही गाड्यांची मागणीही वाढत आहे. एंट्री लेव्हल एसयुव्ही गाड्यांची विक्री 22% आहे. ग्राहकांचा ओढा पाहून आघाडीच्या कार कंपन्यांनी एसयुव्ही श्रेणीमध्ये नवनवीन मॉडेल्स लाँच करण्यावर भर दिला आहे. SUV गाड्यांचे इलेक्ट्रिक व्हर्जनही बाजारात येत आहेत.
ह्युंदाई व्हेन्यू, मारुती ब्रेझा, ग्रँड वितारा, क्रेटा या गाड्यांना पहिल्यांचा कार खरेदी करणाऱ्या ग्राहकांकडून चांगली पसंती मिळत आहे. सेदान गाड्यांची लांबी SUV पेक्षा जास्त असते. तसेच या कार जास्त आलिशान समजल्या जात. मात्र, आता SUV ने सेदानला विक्रीमध्ये मागे टाकले आहे.
47% वाटा SUV गाड्यांचा
2018-19 साली बाजारातील SUV गाड्यांचा विक्रीतील वाटा 22% होता. त्यात वाढ होऊन 47% झाला आहे. जुलै महिन्यातील देशातील एकूण कार विक्रीची आकडेवारी पाहिली तर SUV चा हिस्सा 49% आहे. हॅचबॅक आणि सेदान त्या खालोखाल आहेत.