दर वर्षी ऑक्टोबर महिन्यात ऊस गाळप हंगाम सुरु केला जातो मात्र, यंदा मान्सून पावसाने ओढ दिल्याने ऊस पिकाची अपेक्षित अशी वाढ झालेली नाही. तसेच यंदाच्या लागवडीमध्ये देखील मोठ्या प्रमाणात घट दिसून येत आहे. दरम्यान, साखर उद्योग क्षेत्राकडून यंदाचा(2023-24) गळीत हंगाम उशिराने सुरू करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.मात्र, गाळप हंगाम सुरू झाल्यास पावसा अभावी शेतकऱ्यांच्या पीक वाळून आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे.
ऊस पिकाची वाढ नाही-
राज्यात यावर्षी मान्सून पाऊस उशिरा दाखल झाला त्यानंतरही पावसाने ओढ दिली. त्यामुळे गेल्यावर्षी उसाच्या लागवडीमध्ये वाढ होऊन देखील पिकाची वाढ न झाल्याने उत्पादनात घट होणार आहे. तसेच उसाची वाढ न झाल्याने साखर उताऱ्यावर फरक पडू शकतो त्यामुळे साखर कारखानदारांकडून यंदाचा गाळप हंगाम उशुराने सुरू करण्याच्या हालचाली सुरू आहेत. या हंगामात राज्यात सुमारे 940 लाख मेट्रिक टन उस गाळपासाठी उपलब्ध आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत हे प्रमाण अत्यल्प आहे. त्यामुळे यंदा साखर उत्पादनातही घट होण्याची शक्यता आहे. गेल्यावर्षीच्या गाळप हंगाममध्ये राज्यात 2653 लाख टन उसाचे गाळप झाले होते.
गाळप हंगाम उशिरा
साखर कारखानदार यंदाचा ऊस गाळप हंगाम एक महिना उशिरा म्हणजेच ऑक्टोबर ऐवजी 15 नोव्हेबरच्या पुढे सुरू करण्यासाठी आग्रही आहेत. मात्र, अद्याप या संदर्भात साखर आयुक्तालय आणि मंत्री समितीची बैठक झालेली नाही. ही बैठक सप्टेंबरच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे. त्या बैठकीत यंदाचा गाळप हंगाम सुरू करण्याबाबत निर्णय होणार आहे.
शेतकऱ्यांचे नुकसान -
यंदा मान्सूनचा पाऊस चांगला न झाल्याने उसाचे वजन घटण्याची शक्यता आहे. हंगाम लवकर सुरू झाला तरी उसाची वाढ न झाल्याने वजनामध्ये घट होणार आहे. तसेच जर हंगाम लांबला तरीही शेतकऱ्यांना नुकसानीला सामोरे जावे लागणार आहे. कारण सध्य स्थितीत धरणांमध्ये पाणीसाठा उपलब्ध नाही. तसेच पावसाळा अंतिम टप्प्यात आहे. उरलेल्या दिवसात पाऊस झाला तरीही उसाची म्हणावी अशी वाढ होणार नाही. त्यामुळे यंदाच्या वर्षी शेतकऱ्यांना उत्पादनात फटका बसण्याची शक्यता आहे.