Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Career Tips : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना पुण्यात शिक्षण घेण्यासाठी मदत करतेय, Student Helping Hand Foundation

Student Helping Hand Foundation

Image Source : www.aromaticandalliedhelpinghands.org/

Student Helping Hand Foundation : महाराष्ट्रातील अनेक विद्यार्थी उच्च शिक्षण घेण्यासाठी पुण्यात जातात. वाढत्या महागाईमुळे त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्याच अडचणींवर मात करण्यासाठी विद्यार्थ्यांना Student Helping Hand Foundation च्या माध्यमातून मदत केली जाते.

Student Helping Hand Foundation : उच्च शिक्षण घेऊन स्वतःच्या बळावर उभे राहणे हे प्रत्येकाचे स्वप्न असते. पण, प्रत्येकाचे हे स्वप्न पूर्ण होत नाही. काही वेळा पैशाच्या अभावी स्वप्न अपूर्ण राहते. महाराष्ट्रातील बहुतांश विद्यार्थी शिक्षणासाठी पुणे शहरात जातात. तिथे गेल्यानंतर सर्व सामान्य विद्यार्थ्यांच्या दोन वेळच्या जेवणाची व्यवस्था राहत नाही. कित्येकदा तर विद्यार्थ्यांना उपाशी राहण्याची वेळ येते. हा सर्व त्रास सहन करून कुलदीप आंबेकर यांनी विद्यार्थ्यांच्या समस्या स्वतः अनुभवल्या आणि इथून पुढे विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी पुण्यात आल्यानंतर त्रास होऊ नये म्हणून Student Helping Hand Foundation सुरू केले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना पुण्यात उत्तम शिक्षण घेण्याची संधी आता ते उपलब्ध करून देतात. 

कुलदीप आंबेकर (संस्थापक / अध्यक्ष )  Student Helping Hand Foundation यांच्याशी 'महामनी'ने चर्चा केली असता ते सांगतात, माझे मूळ गाव आंबी, ता. भूम, जि. उस्मानाबाद, माझं  शिक्षण एमएस्सी रसायनशास्त्र ( आबासाहेब गरवारे महाविद्यालय, पुणे) पत्रकारिता पदविका (रानडे इन्स्टिट्यूट, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ) एलएलबी, वर्ष तिसरे (शंकरराव चव्हाण लॉ कॉलेज, पुणे) येथे झालेले आहे.

साधे परीक्षा शुल्क भरण्यासाठीही गावाकडून पैसे आले नव्हते… 

मी 2014 ला प्रथमच पुण्यात आलो होतो. त्यावेळी स्पर्धा परीक्षांची तयारी करत होतो. सोबतच पदव्युत्तर शिक्षणही सुरू होते. 2016 साली राज्यात दुष्काळ पडला त्याची दाहकता मी स्वतः अनुभवली. साधे परीक्षा शुल्क भरावलाही गावाकडून पैसे आले नव्हते. यावेळीअनेक आर्थिक अडचणी आल्या होत्या. परत गावी जाण्याची परिस्थिती माझ्यावर ओढवली होती; पण या आलेल्या प्रसंगावर मात करून जिद्दीनं उभा राहिलो. 

internal-2.jpg
विद्यार्थ्यांच्या समस्या मांडतांना कुलदीप आंबेकर 

नंतर विचार केला, पुढे जाऊन प्रशासनात व खाजगी केमिकल कंपनीत काम करायचं नाही. आपल्यासारख्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे प्रश्न आणि अडीअडचणी जाणून घ्यायच्या. त्यांच्या शैक्षणिक आणि मूलभूत गरजा पूर्ण करण्याचा प्रयत्न करायचा.

यासाठीच सामाजिक संस्थेच्या माध्यमातून काम करायचं ठरवलं. मित्रपरिवाराच्या साहाय्याने स्टुडंट हेल्पिंग हँडस् संस्थेची नोंदणी केली. ही संस्था फक्त विद्यार्थ्यांना मदत करत नाही, तर त्यांच्या हक्क आणि अधिकारासाठी संविधानिक मार्गानी लढा उभा करते. विद्यार्थ्यांच्या हिताच्या गोष्टींचा सातत्याने पाठपुरावा करते. 

संस्थेमार्फत आतापर्यंत 2000 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना  मोफत मेसची सेवा पुरवली आहे. तसेच 300 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांचा शैक्षणिक खर्च देगणीदारांच्या मदतीतून संस्थेने उचलला आहे. 200 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना खाजगी वसतिगृह मिळवून दिले. शेकडो विद्यार्थ्यांना पार्ट टाइम नोकरी  मिळवून दिली आहे.

फाऊंडेशनमार्फत केले जाणारे काम पुढीलप्रमाणे, 

गरजू विद्यार्थ्यांना मोफत मेसची सुविधा उपलब्ध करून देणे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना  खाजगी आणि शासकीय वसतिगृह मिळवून देणे. विद्यार्थ्यांना शासकीय, खाजगी आणि देशातील व परदेशातील शिष्यवृत्तीची माहिती देऊन त्यासाठी महाविद्यालये आणि विद्यापीठस्तरावर जनजागृती करणे. शैक्षणिक प्रश्नासंदर्भात संविधानिक  सत्याग्रह करणे. शासनाच्या वेगवेगळ्या विदयार्थी हिताच्या उपक्रम आणि योजनाची अंमलबजावणी कडक व्हावी, यासाठी सातत्यानं पाठपुरावा करणे.

internal-4.jpg
विद्यार्थ्यांची शैक्षणिक फी करण्यासाठी विद्यापिठावर मोर्चा 

होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक फी संदर्भात आर्थिक मदत करणे. विद्यापीठ आणि कॉलेज स्तरावरील विद्यार्थ्यांना शिक्षण घेत असतानाच पार्ट टाइम नोकरी मिळवून देणे. विद्यार्थ्यासाठी कमवा आणि शिका योजना राबवणे. विद्यार्थीनींच्या आरोग्य आणि सुरक्षाविषयक कार्यशाळा आयोजित करणे. उद्योजक विकास, कौशल्य विकास आणि माहिती अधिकार कायदा या योजनांचे मार्गदर्शन शिबिर घेणे. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या गरजू विद्यार्थ्यांना मोफत पुस्तके आणि अभ्यासिकेची सोय उपलब्ध करून देणे.

संस्थेने हाती घेतलेले भविष्यातील मोठे प्रकल्प 

पुण्यात 50 गरजू विद्यार्थ्यांना राहण्यासाठी वसतिगृह बांधणे किंवा भाडे तत्त्वावर इमारत घेऊन विद्यार्थ्यांना राहण्याची सुविधा उपलब्ध करून देणे. ग्रामीण भागातील पदवी पदवीत्तर विद्यार्थ्यांना कौशल्य विकास योजनेचे ट्रेनिंग सेंटर उभे करणे. विद्यार्थ्यांना मोफत मेस उपलब्ध करून देण्यासाठी शहराच्या मध्यवर्ती भागात डब्बा चळवळ योजना राबविणे.

internal-1-1.jpg

या फाऊंडेशन सोबत संपर्क साधण्यासाठी सध्याचा पत्ता यश बिल्डिंग, भिडे हॉस्पिटलसमोर, सेनादत्त पोलीस चौकीमागे, शास्त्री रस्ता, नवी पेठ, पुणे 30 असा आहे. संपर्क करायचा असल्यास 9689794776 या नंबरवर कॉल करू शकता. पुण्यात शिक्षण घेत असतांना काही समस्या आल्यास kuldeepambekar123@gmail.com या मेल आयडीवर लिहून पाठवू शकता.