मुलांचा सांभाळ करणे, त्यांना शिक्षण देणे अशा सर्व गोष्टींचा जबाबदारी ही पालकांची असते. परंतु, सध्याच्या महागाईच्या काळात मुलांच्या पालनपोषणाचा खर्च पालकांच्या आवाक्याबाहेर गेल्याचे दिसून येत आहे.
मुलांच्या शिक्षणापासून ते त्यांच्या वैद्यकीय खर्चापर्यंत, अशा विविध गोष्टींवर दरवर्षी लाखो रुपये खर्च करावे लागतात. या लेखातून महागाईसोबत मुलांच्या संगोपनाच्या खर्चात कशाप्रकारे वाढ होत गेली आहे व खर्च कमी करण्यासाठी काय करू शकता, याविषयी सविस्तर जाणून घेऊया.
बाल संगोपनाच्या खर्चात प्रचंड वाढ
दिवसेंदिवस वाढणाऱ्या महागाईमुळे मध्यमवर्गीय कुटुंबांना अडचणीचा सामना करावा लागतो. एकीकडे महागाई वाढत असली तरीही उत्पन्नात मात्र कोणतीही वाढ होत नाही. भारतात सरासरी महागाई दर हा 5 ते 6 टक्के आहे. मात्र, मुलांच्या पालनपोषणाचा खर्च हा दुप्पटीने वाढला आहे.
ECA International च्या रिपोर्टनुसार, जगभरात डे केअरच्या खर्चात 2023 मध्ये मागील वर्षीच्या तुलनेत 6 टक्क्यांनी वाढ झाली आहे. भारतातही पाळणाघरासाठी (Day Care Centres) डे केअरसाठी पालकांना महिन्याला हजारो रुपये खर्च करावे लागतात. मुंबई-पुण्यासारख्या शहरांमध्ये पाळणाघरासाठी महिन्याला सरासरी 20 ते 30 हजार रुपये खर्च करावे लागतात. काही ठिकाणी हाच आकडा लाखो रुपयांपर्यंतही आहे.
याशिवाय, मुलांच्या वैद्यकीय खर्चासाठीही पालकांना हजारो रुपये खर्च करावे लागतात. लसीकरणापासून ते औषधांपर्यंत, मुलांच्या आरोग्यासाठी पालकांकडून दरमहिन्याला हजारो रुपये खर्च केले जातात. मात्र, एकीकडे बाल संगोपनाच्या खर्चात प्रचंड वाढ होत असताना, पालकांचे उत्पन्न वाढत नाही.
शिक्षणासाठी खर्च करावे लागतायत लाखो रुपये
भारतात मुलांच्या शिक्षणासाठी प्रचंड पैसा खर्च करावा लागतो. इकोनॉमिक टाइम्सच्या रिपोर्टनुसार, खासगी शाळांमध्ये शिकण्यासाठी 3 ते 17 वयोगटातील मुलांसाठीचा सरासरी खर्च तब्बल 30 लाख रुपये आहे. उच्च शिक्षणाचा खर्च वेगळाच. तसेच, दरवर्षी शालेय खर्चात बदल होत असल्याने त्यामुळे खर्चाचे नियोजन करणेही शक्य होत नाही.
बाल संगोपनाच्या खर्चाचे नियोजन कसे कराल?
मुलांच्या पालनपोषणाच्या खर्चाचे योग्य नियोजन करणे गरजेचे आहे. मुलांचे शिक्षण व इतर गोष्टींसाठी आधीपासूनच बचत करण्यास सुरुवात करायला हवी. मूल होण्याआधीपासूनच बचतीस सुरुवात करावी. याशिवाय, अनेक कंपन्यांमध्ये कर्मचाऱ्यांच्या मुलांसाठी विशिष्ट सुविधा उपलब्ध असतात. शिक्षण व आरोग्यासाठी अनेक तरतुदी असता. या सुविधांचा फायदा घेतल्यास खर्चात बचत होईल. तसेच, सरकारकडून बाल संगोपनासाठी विविध योजना राबवल्या जातात, ज्याचा तुम्ही लाभ घेऊ शकता.