सोमवारी (दि. 19 डिसेंबर) शेअर मार्केटमध्ये साखर कंपन्यांसोबत युटीआय एएमसी (UTI AMC) ला मार्केटमधून चांगला रिस्पॉन्स मिळाला आहे. या दोन्ही प्रकारच्या शेअर्समध्ये आज तेजी दिसून आली. साखर कंपन्यांच्या शेअर्समध्ये मागील आठवड्यापासून सातत्याने वाढ होताना दिसत आहे. गेल्या आठवड्यातील आणि आजच्या आठवड्यातील पहिल्या दिवसाचा विचार केला तर साखर कंपन्यांच्या शेअर्समध्ये 10 ते 20 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
साखर कंपन्यांच्या शेअर्समध्ये 10-20 टक्के वाढ!
केंद्र सरकारने पेट्रोलसह इथेनॉलवरील जीएसटी कमी केला आहे. इथेनॉलवर यापूर्वी 18 टक्के जीएसटी आकारला जात होता. त्यात सरकारने कपात करून तो 5 टक्क्यांवर आणला आहे. त्याचबरोबर इंडियन शुगर मिल असोसिएशनने (Indian Sugar Mill Association-ISMA) यावेळी साखरेच्या उत्पादनाच चांगलीच वाढ झाल्याचे सांगितले आहे. या सकारात्मक बातम्यांमुले साखर कंपन्यांच्या शेअर्सची वाढ झाल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. इंडियन शुगर मिल असोसिएशनने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, यावर्षीच्या साखर उत्पादनात वाढ झाली आहे. गेल्यावर्षी 78 लाख टन साखरेचे उत्पादन झाले होते. ते वाढून यावेळी 82 लाखांपर्यंत जाऊ शकते, असा अंदाज असोसिएशनने मांडला आहे. या आकडेवारीमुळे राजश्री, शक्ती, सिंभावली यासारख्या साखर कंपन्यांच्या शेअर्सच्या भावामध्ये 20 टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर दालमिया भारत, पोनी, धामपूर साखर कंपनीमध्ये 10 टक्क्यांची वाढ झाली.
टाटा ग्रुपची बातमी आणि युटीआय एएमसी तेजीत!
युटीआय एएमसी (UTI AMC)मध्ये सोमवारी 15 टक्क्यांची वाढ दिसून आली. मिळालेल्या माहिती अनुसार, युटीआय एएमसी कंपनीतील 4 सरकारी कंपन्यांकडे असलेला सुमारे 45 टक्के हिस्सा टाटा ग्रुप विकत घेणार असल्याचे समजते. युटीआयमध्ये पंजाब नॅशनल बॅंक (Punjab National Bank), एलआयसी (LIC), स्टेट बॅंक ऑफ इंडिया (State Bank of India), बॅंक ऑफ बडोदा (Bank of Baroda) या 4 बॅंकांचा 45.16 टक्के हिस्सा आहे. टाटा ग्रुप हा हिस्सा विकत घेणार असल्याचे नक्की मानले जात आहे. ही डील पूर्ण झाली तर टाटा ग्रुप भारतातील चौथी सर्वांत मोठी एएमसी होईल.
युटीआय एएमसीच्या शेअर्सवर नजर टाकली तर दुपारी अडीचपर्यंत याच्या शेअर्समध्ये 13.52 टक्क्यांची वाढ दिसून आली. युटीआयचा आजचा सर्वांत कमी भाव 799.25 रुपये आणि दिवसभरातील उच्चांकावर असलेला भाव 890 रुपये होता. तर 52 आठवड्यातील उच्चांक भाव 1,109.35 रुपये आणि निचांकी भाव 595 रुपये आहे. युटीआय एएमसीचा व्हॉल्यूम 3,931,245 शेअर्स असून त्याचे मार्केटमधील भांडवल 11,211 कोटी रुपये इतके आहे.
मार्केटमधील बातम्यांचा शेअर मार्केटमधील कंपन्यांवर असा प्रभाव पडत असतो. दोन बातम्यांमुळे साखर कंपन्यांचे शेअर्स आणि युटीआय एएमसी या कंपन्यांचे शेअर्स सोमवारी तेजीमध्ये होते.