देशात इलेक्ट्रिक वाहनांना (EV) सरकारकडून प्रोत्साहन (Subsidy) दिले जात आहे. बॅटरीवर चालणाऱ्या स्कुटर्स आणि वाहनांसाठी सरकारकडून रोड टॅक्स माफ केला जातो. त्याशिवाय इलेक्ट्रिक वाहने खरेदी केल्यास ग्राहकांना अनुदान देखील दिले जाते.भारतातील अनेक राज्यांमध्ये इलेक्ट्रिक वाहनांचे धोरण अंमलात आले आहे. त्यानुसार त्यांना 5000 रुपयांपासून 25000 रुपयांपर्यंत अनुदान दिले जाते.आतापर्यंत 16 राज्यांनी इलेक्ट्रिक वाहनांवर अनुदान आणि कर सवलतीची घोषणा केली आहे.
कार्बन उत्सर्जन कमी करणे, वायू प्रदूषण कमी करण्याबरोबरच पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी मागील दोन वर्षांपासून भारतात इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराला प्रोत्साहन दिले जात आहे. इलेक्ट्रिक वाहनांसाठी परिसंस्था तयार करण्याबाबत सरकारने यासंदर्भात एक व्यापक धोरण तयार केले आहे. इलेक्ट्रिक किंवा हायब्रीड वाहनांचा जलदगतीने स्वीकार करणे(FAME Policy) या धोरणांतर्गत सरकारकडून इलेक्ट्रिक वाहन उत्पादकांना आणि ग्राहकांना कर सवलत देण्यात आली आहे. या धोरणाच्या पहिल्या टप्प्यात ई वाहनांची मागणी वाढवण्यासाठी प्रचार करणे, नव्या तंत्रज्ञानाचा वापर करणे,चार्जिंग स्टेशन्स उभारण्यावर भर देण्यात आला होता.
याच धोरणातील दुसऱ्या टप्य्यात सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला ईलेक्ट्रिक इंधन पर्यायात परावर्तीत करणे, इलेक्ट्रिक दुचाकी उत्पादकांना आणि ग्राहकांना अनुदान दिले जाणार आहे. केंद्र सरकारने फेम धोरणासाठी 10000 कोटींची तरतूद केली आहे. सरकारकडून 10 लाख नोंदणीकृत इलेक्ट्रिक वाहनांना प्रत्येकी 20000 रुपयांचे अनुदान दिले जाणार आहे.
इलेक्ट्रिक वाहनांवर दिल्या जाणाऱ्या अनुदानाचा राज्यनिहाय तपशील
इलेक्ट्रिक वाहन खरेदी करण्यापूर्वी ती स्कुटर किंवा वाहन FAME योजनेत अनुदानासाठी पात्र आहे का याची खातरजमा करणे आवश्यक आहे. ते असेल तरच तुम्हाला त्यावर अनुदान मिळणार आहे. याशिवाय इलेक्ट्रिक वाहनांसाठी अनुदानाबरोबरच रोड टॅक्सवर सुद्धा सवलत दिली जाणार आहे. शिवाय इलेक्ट्रिक स्कुटरसाठी विमा हा तुलनेने स्वस्त असतो. त्यामुळे वाहन विम्यात देखील ग्राहकांची बचत होते.
महाराष्ट्र, गुजरात, पश्चिम बंगाल, बिहार, राजस्थान, आसाम, मेघालय या राज्यांमध्ये इलेक्ट्रिक व्हेइकलवर 5000 रुपयांपासून 25000 रुपयांपर्यंत अनुदान दिले जाते. याशिवाय बिहार, केरळ या राज्यांत इलेक्ट्रिक वाहनांसाठी रोड टॅक्स 50% सवलत असून उर्वरित राज्यांमध्ये 100% रोड टॅक्स सवलत देण्यात येते.