लग्नानंतर घरात नवी व्यक्ती आली की काही जबाबदार्या वाढणं सहाजिक असतं. त्यामुळे खर्च वाढणंही स्वाभाविक असतं. अनेकदा घरात दोघं कमावती असूनही योग्य आर्थिक नियोजनाअभावी घराचं बजेट कोलमडताना दिसतं. मग नव्या संसारात वाद सुरू होतात. कोण किती कमावतो आणि किती खर्च करतो यावरून वाद विकोपाला जाण्याची शक्यता असते. त्यामुळे नात्यातही वितुष्ट येतं. मग अशा वेळी कर्जाचा विचार केला जातो. हिशेब असा की, दर महिन्याला हप्त्याचे दोन-चार हजार कसेही मॅनेज होतील; पण आत्ताची चणचण तरी थांबेल. छान आयुष्य जगता येईल. स्मार्ट टीव्ही, अॅटोमॅटिक वॉशिंग मशिन, एसी, कुलर, डबलडोअर फ्रीज, कार या वस्तू हल्ली गरजेच्याच आहेत, असं ‘मानलं’ जातं आणि त्यासाठी मग वैयक्तिक कर्जाचा पर्याय निवडून लाख-दोन लाख रुपये घेतले जातात.
वास्तविक, यामुळं समस्या कमी होण्याऐवजी वाढतात. कारण आर्थिक समस्यांचं मूळ पैशांत किंवा कमाईत नसतं तर खर्च करण्यात असतं. पैसा कितीही असला तरी पुरत नाही, असं आपल्याकडं म्हटलं जातं आणि ते खरंच आहे. त्यामुळं खर्च करण्याची कला ही आर्थिक नियोजनात सर्वोत्तम मानली गेली आहे. पण त्याकडे दुर्लक्ष करून तुम्हीही वैवाहिक आयुष्याची सुरुवात करताना वैयक्तिक कर्ज घेत असाल तर सावधान!
कारण वैयक्तिक कर्जासाठीचा व्याजदर अधिक असल्याने आणि ते जास्तीत जास्त पाच वर्षांसाठी दिलं जात असल्यामुळं मासिक हप्ताही अधिक असतो. साहजिकच यामुळं आपलं महिन्याचं अर्थकारण कोलमडतं. त्यातून एखादा मासिक हप्ता चुकल्यास दंड आणि अधिक व्याज आकारणीचा भुर्दंड सोसावा लागतो.
आपण वैयक्तिक कर्ज घेताना काही तरी खटपट करून उत्पन्न वाढवू असं गृहितक मांडलेलं असतं. पण ते प्रत्यक्षात उतरलं नाही तर काही महिन्यांनी या कर्जाचा हप्ता देणंही कठीण होऊन जातं. उदाहरणार्थ, कोरोनासारखे एखादे संकट आले आणि उत्पन्नाचे मार्ग बंद झाले किंवा वेतनवाढ टळली, वेतनकपात झाली तर मोठा आर्थिक धक्का बसू शकतो. पण अशा प्रत्येक संकटात आपल्याला बँका सवलत देत नाहीत. त्यांचे हप्ते सुरूच राहतात. या हप्त्यासाठी पुन्हा उधारी, क्रेडिट कार्ड, गोल्ड लोन असे पर्याय अवलंबले जातात. पण यातून पाय अधिक खोला जातो.
हे सगळं टाळण्यासाठी लग्नाच्या आधी आणि नंतर काही फायनान्शिअल प्लॅनिंग करणं गरजेचं आहे. फायनान्शिअल प्लॅनिंग केवळ हे धोके टाळण्यासाठी उपयुक्त नाही तर लग्नानंतर पाहिली जाणारी स्वप्न पूर्ण करण्यासाठीही गरजेचं आहे. एकमेकांना विश्वासात घेऊन काहीं कामं केल्याने फायनान्शिअल प्लॅनिंग करणं सोपं होईल.
हे करत असताना किमान पुढील तीन महिन्याचा खर्च भागेल एवढा पैसे लिक्विड स्वरूपात वेगळे ठेवणं गरजेचं आहे. म्हणजे नोकरी बदलताना किंवा अपघात प्रसंगी कोणाकडे हात पसरावे लागणार नाहीत.
घरासाठी किती खर्च करायचा हे एकदा ठरलं की त्यावर अंमलबजावणी करण्याचा नियम पाळला पाहिजे. हौसेखातर, लोकांना खुष करण्यासाठी आपल्या बजेटवर परिणाम होऊ देऊ नका. भविष्यात थेेंबे थेंबे साठलेली संपत्तीच कामी येणार आहे हे लक्षात ठेवा.