सोलापूर येथून विमान सेवा सुरू करण्यासाठी अडथळा ठरणारी सिद्धेश्वर साखर कारखान्याची चिमणी जमीनदोस्त करण्यात आली आहे. त्यानंतर आता सोलापुरातून विमानसेवा सुरू करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. स्टार एअरलाइन्स या कंपनीकडून सोलापूरमधून विमान सेवा सुरू करण्यासाठी हालचाली वाढल्या आहेत. सरकारकडून परवानगी मिळताच सोलापुरातून विमानसेवा सुरू होईल, अशी माहिती स्टार एअरलाइन्स आणि सोलापूरच्या चेंबर ऑफ कॉमर्सने दिली आहे.
स्टार एअरलाइन्सला पत्र-
सोलापूर विमानतळाचा (Solapur Airport) समावेश हा केंद्र सरकारच्या उडाण योजनेमध्ये यापूर्वीच करण्यात आलेला आहे. मात्र, साखर कारखान्याच्या चिमणीचा अडथळा होत असल्याने येथून विमानसेवा रखडली होती. दरम्यान आता चिमणीचा अडथळा दूर झाल्याने सोलापूर चेंबर ऑफ कॉमर्सकडून आणि खासदार जयसिद्धेश्वर महास्वामी यांनी स्टार एअरलाईन्सचे चेअरमन संजय घोडावत यांना विमानसेवा सुरू करण्यासंदर्भात पत्र दिले आहे. त्यामध्ये स्टार एअरलाईन्सचे सोलापुरातून मुंबई, तिरुपती, दिल्ली, जयपूर व चेन्नई या ठिकाणी विमानसेवा सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे.
व्हाया सोलापूर विमानसेवा
स्टार एअरलाईन्सकडून सोलापुरातून विमान सेवा सुरू करण्याबाबत सकारात्मक संकेत देण्यात आले आहेत. त्यासाठी कंपनीने बंगळूर आणि बेळगावातून टेकऑफ करणाऱ्या विमानांचा प्रवास व्हाया सोलापूर विमानतळ सुरू करण्याबाबत विचार करण्यात येईल, असे स्पष्ट केले आहे. तसेच स्टार एअरलाईन्सच्या ताफ्यात दोन 80 आसनाची विमाने दाखल होत आहेत. त्यामुळे सोलापूर विमानतळावरून मुंबईसाठी सेवा सुरू करण्याचा विचार आम्ही करत आहोत. त्यासाठी मुंबईला स्लॉटची उपलब्धता याबाबतची माहिती घेण्यात येणार असल्याची माहिती स्टार एअरलाईन्सचे चेअरमन संजय घोडावत यांनी दिली.
स्पाईस जेट, अलाईन्सला परवानगी
केंद्र सरकारच्या उडाण योजनेतून स्पाईस जेट आणि अलाईन्स कंपनीला यापूर्वीच विमान सेवा सुरु करण्याची परवानगी देण्यात आली आहे. या कंपन्यांना बंगळुरू आणि हैदराबादसाठी विमानसेवा सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे.
पर्यटन व्यवसाय आणि उद्योगांना मिळणार चालना-
सोलापूर शहर कापड उद्योगात अग्रेसर आहे. तर जिल्ह्यात साखर कारखानदारी बरोबरच द्राक्षे आणि डाळींबाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. त्यामुळे येथील माल निर्यात करण्यासाठी सोलापूरची विमानसेवा फायद्याची ठरणार आहे. तसेच दक्षिण आणि उत्तर भारताला जोडले जाणाऱ्या या शहरात अनेक नवीन उद्योग दाखल होऊ शकतात असा विश्वास चेंबर ऑफ कॉमर्सने व्यक्त केला आहे. याच बरोबर सोलापूर जिल्हा हा धार्मिक आणि पर्यटनस्थळ म्हणून ओळखला जातो. पंढरपूर अक्कलकोट तुळजापूर आणि गाणंगापूर या धार्मिकस्थळाला भेटी देण्यासाठी दरवर्षी लाखो भाविक पर्यटक सोलापूरमध्ये येतात. त्यामुळे या ठिकाणी विमानसेवा सुरू झाल्यास सोलापूरमध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल होण्यास मदत होणार आहे.