Sovereign Gold Bond 2023:रिझर्व्ह बँक ऑफ इंडियातर्फे राबविल्या जाणाऱ्या सॉवरेन गोल्ड बॉण्डचा 2023-24 या आर्थिक वर्षातील पहिला टप्पा 19 ते 23 जूनपर्यंत असणार आहे. या कालावधी दरम्यान गुंतवणूकदारांना स्वस्तात चोख सोने (Pure Gold) खरेदी करता येणार आहे. केंद्र सरकारने 2015 मध्ये सॉवरेन गोल्ड बॉण्ड ही योजना सुरू केली होती.
सरकारने सुरू केलेला हा एक विशेष उपक्रम आहे. या उपक्रमांतर्गत सर्वसामान्यांना बाजारभावापेक्षा कमी किमतीत सोने खरेदी करता येते. जर तुम्ही सणासुदीला आवर्जून सोने खरेदी करत असाल, तर सॉवरेन गोल्ड बॉण्ड योजनेमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करू शकता. सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याचा हा सर्वांत सुरक्षित, सोपा आणि स्वस्त मार्ग आहे. यातील दुसरा टप्पा सप्टेंबरमध्ये ओपन होणार असून त्याची तारीख 11 ते 15 सप्टेंबर आहे.
सॉवरेन गोल्ड बॉण्ड हे सरकारी-खाजगी बँका, शेड्युल्ड व्यावसायिक बँका, (स्मॉल फायनान्स बँक, पेमेंट बँक आणि प्रादेशिक ग्रामीण बँका वगळून) स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशन दि इंडिया लिमिटेड (SHCIL), क्लिअरिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (CCIL), पोस्ट ऑफिस आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज आणि बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (NSE & BSE) यांच्याद्वारे विक्रीसाठी उपलब्ध आहेत.
Table of contents [Show]
सॉवरेन गोल्ड बॉण्ड कोण आणि किती खरेदी करू शकतं?
सॉवरेन गोल्ड बॉण्ड हे वैयक्तिक भारतीय नागरिक, तसेच हिंदु अविभक्त कुटुंबे (HUF), ट्रस्ट, विद्यापीठे आणि धर्मादाय संस्था खरेदी करू शकतात. गुंतवणूकदाराला किमान 1 ग्रॅम आणि जास्तीत जास्त 4 किलोपर्यंतच्या बॉण्डची खरेदी करता येते. हिंदू अविभक्त कुटुंबांनाही 4 किलोची मर्यादा असून, ट्रस्टला 20 किलोपर्यंत गुंतवणूक करता येते.
हे वाचा: सॉव्हरिन गोल्ड बॉण्डमध्ये गुंतवणूक करताना हे नियम लक्षात ठेवा!
गोल्ड बॉण्डमधील गुंतवणुकीचा कालावधी किती?
सॉवरेन गोल्ड बॉण्डमधील गुंतवणुकीचा कालावधी हा 8 वर्षांचा असून, गुंतवणूकदार 5 वर्षांनंतर यातून बाहेर पडू शकतात किंवा त्याची विक्री करू शकतात. या योजनेंतर्गत गुंतवणूकदारांना सरकारकडून वार्षिक 2.50 टक्के व्याज दिले जाते.
गोल्ड बॉण्डमधील गुंतवणुकीवर टॅक्स लागतो का?
इन्कम टॅक्स कायद्यातील तरतुदीनुसार सॉवरेन गोल्ड बॉण्डमधून येणाऱ्या व्याजावर टॅक्स आकारला जातो. पण बॉण्डच्या गुंतवणुकीतून बाहेर पडल्यानंतर त्यावर कॅपिटल गेन टॅक्स लागू होत नाही.