Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Solar Panel: घरासाठी सोलर पॅनेल खरेदी करताय? मग ‘या’ गोष्टी ठेवा लक्षात, होईल फायदा

Solar Panel

Image Source : https://unsplash.com/

घरासाठी सोलर पॅनेल खरेदी करताना बजेटपासून वॉरंटीपर्यंत अनेक गोष्टींचा विचार करायला हवा. याशिवाय, सरकार देखील सोलर पॅनेलच्या खरेदीवर सबसीडी देत आहे.

प्रश्न – मला घरासाठी सोलर पॅनेल खरेदी करायचे आहे? सोलर पॅनेल खरेदी करताना कोणत्या गोष्टींचा विचार करावा याबाबत मार्गदर्शन करावे.  

महामनीचे उत्तर -  दरमहिन्याला प्रचंड वीज बिल येते, अशी अनेकांची तक्रार असते. वाढीव वीज बिलापासून सुटका हवी असल्यास सोलर पॅनेल नक्कीच उपयोगी ठरू शकते. तुम्ही अनेक घरांवर, इमारतीवर सोलर पॅनेल पाहिले असेल. सोलर पॅनेलच्या माध्यमातून वीज निर्मिती केली जाते व या विजेद्वारे तुम्ही घरातील इलेक्ट्रॉनिक वस्तू जसे की टीव्ही, लॅपटॉप, फ्रीज, पंखे यांचा सहज वापर करू शकता. सरकार देखील सौर उर्जेला प्राधान्य देत आहे. यामुळे सौर पॅनेलच्या खरेदीवर सबसीडी देखील मिळते.  

तुम्हाला दरमहिन्याला येणाऱ्या भरमसाठ वीज बिलापासून सुटका हवी असल्यास सोलर पॅनेल नक्कीच खरेदी करावे. सोलर पॅनेल खरेदी करताना कोणत्या गोष्टींचा विचार कराल, त्याविषयी सविस्तर जाणून घ्या.  

घरासाठी सोलर पॅनेल खरेदी करताना या गोष्टी नक्की पाहा  

वीजेची गरज – तुम्ही महिन्याभरात वीजेचा किती वापर करता, तुमच्या घराचा आकार केवढा आहे, यानुसार तुम्ही सोलर पॅनेलची निवड करू शकता.  

घराचा प्रकार  

दरमहिना विजेचा सरासरी वापर (kWh)  

सोलर पॅनेलची क्षमता (kW)  

1BHK House  

200-300 kWh  

2-3 kW  

2BHK House  

300-500 kWh  

3-5 kW  

3BHK House  

500-800 kWh  

5-8 kW  

ही सरासरी आकडेवारी आहे. विजेच्या वापरानुसार यात बदल होऊ शकतो.  

सोलर पॅनेलसाठी जागा – तुमच्या घराच्या टेरेसवर सोलर पॅनेलसाठी किती जागा हे देखील पाहा. सर्वसाधारणपणे 1  kilowatt क्षमतेच्या सोलर सिस्टमसाठी 3 ते 4 सोलर पॅनेलची गरज असते. तुम्ही जागेनुसार सोलर पॅनेलची निवड करू शकता.  

सूर्यप्रकाश – सूर्यप्रकाश कोणत्या दिशेने येत आहे, यावर देखील सोलर पॅनेल घ्यावा की नाही हे ठरते. समजा तुमच्या घराच्या दिशेने सुर्याचा प्रकाश पडत नसल्यास अशावेळी महागडे सोलर पॅनेल तुमच्या काहीही उपयोगी येणार नाहीत.  

सोलर पॅनेलचा प्रकार – सर्वात आधी सोलर पॅनेलचे प्रकार monocrystalline, polycrystalline, thin-film हे काय आहेत , त्यांचे फायदे-तोटे काय आहेत हे समजून घ्या. त्यानंतर जागा व बजेटनुसार यापैकी एकाची निवड करा.  

बजेट आणि वॉरंटी – कोणती सोलर सिस्टम खरेदी करावी हे तुमच्या बजेटवर देखील ठरते. बाजारात 70 हजार रुपयांपासून ते दीड लाख रुपयांपर्यंत किंमतीच्या सोलर सिस्टम उपलब्ध आहेत. यावर तुम्हाला सबसीडी देखील मिळेल. तसेच, यावर 10 वर्षांपासून ते 25 वर्षांची वॉरंटी देखील मिळते.  

सरकारी योजनेचा घ्या फायदा  

सोलर पॅनेल खरेदी करण्यासाठी तुम्ही राज्य सरकारच्या संबंधित विभागाशी संपर्क साधू शकता. याद्वारे तुम्हाला सोलर पॅनेलच्या खरेदीवर सबसीडीचा फायदा मिळेल. सबसीडीचा फायदा घेण्यासाठी तुम्ही https://solarrooftop.gov.in/ या वेबसाइटवर जाऊन अर्ज करू शकता. अर्ज करताना तुम्हाला ओळखपत्र, रहिवासी पुरावा, उत्पन्न दाखला, वीज बिल अशी कागदपत्रे द्यावी लागतील. यानंतर अर्ज मंजूर झाल्यास सबसीडीची रक्कम तुमच्या खात्यात जमा होईल.  

सोलर पॅनेलवरील वॉरंटी आणि विमा  

सोलर पॅनेलवरील वॉरंटी - सोलर सिस्टम खरेदी करण्याआधी त्यावरील वॉरंटीबाबत देखील जाणून घेणे गरजेचे आहे. सर्वसाधारणपणे पॅनेलची वॉरंटी 10 ते 25 वर्षांची असते. समजा, पॅनेलमध्ये काही त्रुटी असेल तर अशा स्थितीमध्ये तुम्ही कंपनीकडे याबाबत विचारणा करू शकता. तसेच, सोलर पॅनेलवर पॉवर वॉरंटी देखील मिळते. वेळेनुसार, सोलर पॅनेलची क्षमता कमी होत जाते. तुम्ही पॅनेलवर 5, 10, 15 वर्षांची पॉवर वॉरंटी मिळते. जर नमूद केल्याप्रमाणे पॅनेल काम करत नसेल तर तुम्ही वॉरंटी अंतर्गत ते बदलून घेऊ शकता.  

सोलर पॅनेलचा विमा – तुम्हाला सोलर पॅनेल खरेदी केल्यास त्यावर वॉरंटी मिळते. परंतु, तुम्ही या व्यतिरिक्त विमा देखील घेऊ शकता. ज्या गोष्टींचा वॉरंटीमध्ये समावेश नाही, अशांसाठी विमा काढू शकता. तुम्ही नुकसान, चोरी यासाठी विमा काढू शकता. यामुळे सोलर पॅनेल सुरक्षित राहतील. सोलर पॅनेलच्या विम्याची रक्कम ही आकारानुसार ठरत असते. तुम्ही जर सोलर पॅनेल खरेदी करत असाल तर यासाठी विमा काढणे नक्कीच फायद्याचे ठरेल.