Rural Smartphone Sale: भारतातील शहरी बाजारापेठा सुरळीतपणे सुरू असल्या तरी ग्रामीण अर्थव्यवस्था कोरोनानंतर गटांगळ्या खात आहे. वाहन विक्री मागील काही महिन्यांपासून वाढल्याने आशेचा किरण दिसू लागला आहे. दरम्यान, यंदा मान्सून जर पुरेसा झाला नाही तर बळीराजा आणि त्याचं आर्थिक गणित पुन्हा एकदा बिघडू शकतं. मग खाद्यपदार्थ दरवाढीच्या झळा शहरातही पोहचतील. मागील दोन वर्षांपासून ग्रामीण भागातील स्मार्टफोनची विक्री रोडावल्याचं एका अहवालातून समोर आलं आहे.
स्मार्टफोन किंमतवाढीमुळे विक्री रोडावली
शहरांच्या तुलनेत ग्रामीण भागातील स्मार्टफोनची मागणी रोडावली आहे. 2021 नंतर ही मागणी दिवसेंदिवस कमी होत आहे. स्मार्टफोनच्या वाढत्या किंमती या मागचे एक कारण असल्याचे बोलले जात आहे. शहरी भागात स्मार्टफोनची विक्री वाढत आहे. तर ग्रामीण भागातील खरेदीदारांनी 5G फोनकडे पाठ फिरवली आहे. दर दहा 5G फोन विक्रीतील फक्त 3 फोन ग्रामीण भागात विक्री होत आहेत.
महागाईमुळे ग्रामीण भागातील नागरिकांची खरेदी क्षमता कमी झाली आहे. 2022 वर्षात देशभरात 12 कोटी 20 लाख स्मार्टफोनची विक्री झाली. त्यापैकी फक्त 35-40% फोन ग्रामीण भागात विक्री झाले. IDC या आघाडीच्या रिसर्च फर्मने याबाबतची आकडेवारी जाहीर केली आहे. 2023-24 आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत 2 कोटी 40 लाख फोन देशात विकले गेले त्यापैकी फक्त 37.2% स्मार्टफोन ग्रामीण, छोट्या गावातील नागरिकांनी खरेदी केले.