A daily Expense-Tracking App: सचिन फरफड पाटील याने संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातून मार्केटिंग विषयात एमबीए केले. आज तो एका मल्टिनॅशनल कंपनीत मोठ्या पदावर कार्यरत आहे. शेतकऱ्यांचे कष्ट वाचावे, त्यांच्या उत्पन्नात भर पडावी, त्यांची फसवेगिरी होऊ नये, हा उद्देश डोळ्यापूढे ठेऊन त्याने 'स्मार्ट यू' कृषी ॲप सुरु केले. त्याच्या या स्टार्टअप कंपनीमध्ये त्याच्यासोबत एकूण बारा लोकांची टीम आहे. या ॲपचे वैशिष्ट्य म्हणजे हे वापरायला अतिशय सरळ, साधे आणि सोपे आहे. 'स्मार्ट यू कृषी खाता' या अकाउंटद्वारे शेतकरी आपला दैनंदिन खर्च आणि उत्पन्नाची नोंद ठेवू शकतो.
Table of contents [Show]
स्टार्टअपची प्रेरणा कशी मिळाली
सचिन फरफड पाटील यांचा जन्म एका शेतकरी कुटुंबातच झाला, त्यामुळे त्याने शेती फार जवळून अनुभवली. त्याच्या संपूर्ण कुटुंबाचा उदरनिर्वाह आणि इतर खर्च हा शेतीमधून मिळालेल्या उत्पन्नावरच अवलंबून असायचा. आज त्याच्यासह त्याचे अनेक मित्र शिक्षण घेऊन शहरात स्थायिक झालेत. तर काही अद्यापही गरीब परिस्थितीमुळे शेतीच करीत असल्याचे सचिनने बघितले. परंतु आताच्या शेतकऱ्याला नापिकी, कर्जबाजारीपणा, वेळीअवेळी पडणारा पाऊस, सतत किटकनाशकांचा वापर केल्याने मिळणारे कमी उत्पन्न यासारख्या समस्यांना सतत तोंड द्यावे लागते. त्यामुळे देश कितीही प्रगत झाला असला, तरी अनेक शेतकरी आज तिथेच आहे. यासगळ्या गोष्टींचा विचार केला असता, सचिनला शेतकऱ्यांसाठी काहीतरी करावे असे वाटले. त्यानंतर अनेकांशी चर्चा करुन त्याने व्हॉट्सअपच्या सहाय्याने हाताळता येणारे 'स्मार्ट यू कृषी खाता' ॲप तयार करण्याचे ठरवले.
हे ॲप तयार करण्यामागचा उद्देश
शेतकर्यांना त्यांच्या शेतीचे योग्य आणि यशस्वीरित्या नियोजन करण्यासाठी आवश्यक असलेल्या साधनांचा आणि माहितीचा पुरवठा करून प्रत्येक शेतकरी वर्गाला सक्षम करणे हे 'स्मार्ट यू' स्टार्टअपचे प्राथमिक ध्येय आहे.
स्मार्टयूचा व्हाट्सअप बॉट शेतकऱ्यांना आर्थिक नोंदी ठेवण्यासाठी, पिकांच्या आरोग्याच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी, स्थानिक हवामानाच्या परिस्थितीबद्दल, कृषीविषयक बातम्यांची आणि त्यांच्या उत्पादनांच्या बाजारभावाबाबत माहिती देण्यासाठी बनवलेला आहे. हे वापरण्यास अगदी सहज आणि सोपे आहे, याद्वारे शेतकऱ्यांना माहितीपूर्ण आणि योग्य निर्णय घेण्यास, तसेच त्यांचे उत्पन्न आणि नफा सुधारण्यास मदत करण्याचे उद्दिष्ट आहे.
एकूण किती खर्च आला
सुरुवातीला जवळपास 1 ते 2 लाख रुपये इतका खर्च आला, ज्यामध्ये मायक्रोसॉफ्टचे लायसन्स मिळवणे व इतर खर्चांचा समावेश आहे. त्यानंतर आजपर्यंत या खर्चामध्ये वेगवेगळ्या पध्दतीने वाढ होतच आहे, कारण हे काम करण्यास एका टीमची गरज असते. यामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रातील उच्च शिक्षित आणि तज्ज्ञ लोक काम करत आहेत. या सर्वांचे वेतनमान वेगळे आहे आणि मुख्यतः यामुळेच आत्तापर्यंतच्या झालेल्या खर्चात सातत्याने बदल होत आहे. तसेच अद्यापही दर महिन्याला 30 ते 40 हजार रुपये खर्च लागतो, अशी माहिती सचिनने दिली.
महिन्याचे उत्पन्न किती
23 फेब्रुवारी 2023 ला हे ॲप सुरु केले. सध्यातरी यामधून कोणतेच उत्पन्न मिळत नाही. 'स्मार्ट यू' हा एक सामाजिक जीवनावर प्रभाव टाकणारा स्टार्टअप प्रोजेक्ट आहे. पण भविष्यात, जाहिराती आणि सबस्क्रिप्शनच्या माध्यमातून उत्पन्न मिळेल, तेव्हा ते सर्व या प्रोजेक्टकरीताच उपयोगात आणले जाईल.